Last Update:
 
ऍग्रो प्लस

द्राक्ष सल्ला
-
Thursday, June 14, 2012 AT 01:15 AM (IST)
Tags: agro plus

डॉ. एस. डी. सावंत

अजूनही द्राक्ष विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. येत्या आठवड्यात सर्वच द्राक्ष विभागांमध्ये शुक्रवारनंतर संपूर्णपणे ढगाळ वातावरण राहील. नाशिकच्या उत्तर भागामध्ये रविवार आणि मंगळवारी चांगला पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. अशाच प्रकारचा पाऊस कळवण, सटाणा, चांदवड, निफाड, येवला, शिर्डी या भागांत शनिवारी, रविवारी आणि सोमवारी पाऊस होईल. निफाड भागात निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत भागांत रविवारी पाऊस होण्याची शक्‍यता आहे. सांगली विभागात कर्नाटक लगतच्या भागात तसेच सावळज, मणेराजुरी, खानापूर, पळशी भागांत रविवारी, सोमवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता आहे. असाच पण कमी प्रमाणात पाऊस तासगाव, पलूस, वाळवा या भागांतही होईल. सोलापूर विभागामध्ये नानज, सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, होटगी, अक्कलकोट या विभागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस शुक्रवारी व त्यानंतर मंगळवारी होण्याची शक्‍यता आहे. पंढरपूर भागात आठवडाभर वातावरण पावसाळी राहील. अधूनमधून रिमझिम पाऊसही होईल. बऱ्यापैकी पाऊस गुरुवार, शनिवारी व मंगळवारी राहील. अशाच प्रकारचा पाऊस तुळजापूर, उस्मानाबाद भागांतही होईल. लातूर, औसा या भागांत गुरुवारी आणि शुक्रवारी चांगला पाऊस होईल.

पुणे विभागामध्ये वातावरण ढगाळच राहील. आठवडाभर रिमझिम पाऊस होण्याची शक्‍यता आहे. पुणे शहर, फुरसुंगी, मुंढवा भागांत शनिवार ते मंगळवारपर्यंत बऱ्यापैकी पाऊस होईल. नारायणगाव व जुन्नर भागांत आठवडाभर पावसाचे वातावरण राहील. शनिवार, रविवार आणि मंगळवारी बऱ्यापैकी पाऊस पडेल.
सध्या सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने या वेळी पहिल्यांदा दुपारचे कमाल तापमान नाशिक, सांगली, पुणे व विजापूर जवळच्या काही भागांत 30 अंश से.पेक्षा कमी होऊन 25 ते 28 अंश से.च्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. पाऊस झालेल्या बागांमध्ये कमी तापमानाबरोबरीने कॅनॉपीमध्ये ओलसरपणा व रात्रीच्या वेळी जास्त आर्द्रता राहण्याची शक्‍यता वाढते. अशाच वातावरणामध्ये वर्षातील पहिली डाऊनी मिल्ड्यूची शक्‍यता असते. म्हणूनच नाशिक, सांगली, पुणे भागांतील व विजापूरच्या जवळपासच्या भागातील ज्या भागांमध्ये पाऊस पडेल त्या भागांमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी पहिली संरक्षणात्मक फवारणी आम्ही शिफारशीत करीत आहोत.

1) डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी या वेळी बोर्डो मिश्रण अर्धा टक्का किंवा कॉपर हायड्रॉक्‍साईड दीड ते पावणे दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड (सीओसी) तीन ग्रॅम प्रति लिटर फवारणीस वापरावे.

2) बऱ्याच ठिकाणी फक्त रिमझिम पाऊस होईल. अशा पावसामध्ये ढगाळ वातावरण जास्त वेळ राहिल्यास भुरी वेगाने वाढते. भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (80 डब्ल्यूडीजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अशा प्रकारची फवारणी मागील काही दिवसांमध्ये केली असल्यास मागील फवारणीनंतर दुसरी फवारणी सात ते दहा दिवसांनंतर करावी.

3) ज्या ठिकाणी पाऊस कमी- जास्त प्रमाणात पडतो आहे, अशा ठिकाणी डाऊनीसाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक तर भुरीसाठी सल्फर या दोन्हींच्या फवारण्या आवश्‍यक असतात. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या ताम्रयुक्त बुरशीनाशकांच्या बरोबरीने सल्फर मिसळून फवारणे शक्‍य आहे.

4) सांगली भागामध्ये येत्या आठवड्यातसुद्धा हलक्‍या पावसाची पुन्हा आठवडाभर शक्‍यता आहे. म्हणूनच येत्या शुक्रवारपर्यंत सुचविलेल्या ताम्रयुक्त बुरशीनाशकाच्या फवारणीला विशेष महत्त्व आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: