Last Update:
 
फुलोरा

शेती किफायतशीर आहे हे सिद्ध करावं लागणार आहे
इरगोंडा पाटील
Saturday, June 16, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: agri,   sakal,   agrowon,  
भाऊसाहेब एक प्रगतिशील शेतकरी आहेत. अलीकडच्या भाषेत त्यांना कृषी उद्योजक असंही म्हटलं जातं. त्यांनी शेती, शेतीमालावर वेगवेगळ्या प्रक्रिया करणं, पशुपालन, नर्सरी आणि फळबागा अशा शेतीशी पूरक व्यवसायांत स्वतः अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी काही ठिकाणी इतरांचं जरूर अनुकरण केलं आहे. अनुकरण करताना त्यांनी अंधानुकरण मात्र केलं नाही. वास्तवापासून ते कधीच फार दूर गेले नाहीत, त्यामुळे त्यांना व्यावहारिक असंही म्हणता येईल. हे काही त्यांनी सहज केलेलं नाही, त्यासाठी त्यांनी सतत अभ्यास केला आहे. स्वतःच्या अनुभवातून ते शिकत गेले आहेत. ते जरूर प्रगतिशील आहेत; तसेच ते आदर्शही आहेत.

आदर्श यासाठी आहेत, की त्यांचं अनुकरण कोणीही करू शकतो; पण त्यांची व्यथा ही आहे, की त्यांचं अनुकरण फारसं कोणी करीत नाहीत. ते तसे उपदेश करीत नाहीत, दुसऱ्याला उपदेश करणं त्यांना आवडत नाही, कारण त्यातून लोकांना अहंकाराचा वास येतो. अहंकाराचा वाराही आपल्या शरीराला लागू नये याची त्यांनी खबरदारी घेतली आहे. आपल्या कामात ते इतके गढून गेले आहेत, की त्यांना दुसरीकडे काही बघायला उसंतही नाही. काम करण्याची इच्छा असणाऱ्याला किती कामं असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण जे करतो त्याचं इतरांनीही अनुकरण करावं, असं त्यांना मनापासून वाटतं; पण तसं काही घडताना दिसत नाही, हे आमच्या मागासलेपणाचं लक्षण आहे. आपल्यावर कोणी तरी सतत अन्याय करीत आहे, या मानसिकतेतून लोक बाहेर पडताना दिसत नाही. याचा अर्थ असा कोणताच अन्याय होत नाही, असे अजिबात नाही; पण त्यांच्यामुळे हे दबून गेलेत व आपला आत्मविश्‍वासच गमावून बसत आहेत. जो समाज आपला आत्मविश्‍वासच गमावून बसतो, त्याला वरती काढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो जो वरती काढण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच घेऊन बुडतो. अशा बुडणाऱ्यांना वाचवता येत नाही. ते वाचविणाऱ्यांना घेऊन बुडतात. अशा सभोवतालच्या परिस्थितीत भाऊसाहेबांचं काम नजरेत भरणारं आहे. अशी माणसं कमी असतात. अशी माणसं कमी असतात याचा अर्थ ही माणसं कमी महत्त्वाची नाहीत, तर अशीच माणसं महत्त्वाची असतात.

भाऊसाहेबांनी आपल्या शेतकरी समाजासाठी कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना केली आहे. त्यांना त्याच्या अनुभवातून एक सत्य गवसलं आहे. ते म्हणजे, शेती आणि बाजारपेठ यांचा ताळमेळ जमला पाहिजे. अनेकदा भरपूर पिकवूनही शेतकरी बाजारपेठेचं ज्ञान नसल्याने नुकसानीत येतो. या अनुभवातून त्यांनी त्यातून काही मार्ग शोधले आहेत. सामुदायिक रीतीने यातून मार्ग काढता येतो, असं त्यांना वाटतं. हा प्रयोग ते गावपातळीवर करून पाहात आहेत. गावातील शेतीमाल एकत्र करून ग्राहकाला विकता येईल, यासाठी त्याचं वाणानुसार वर्गीकरण करावं लागतं. त्याला पॅकिंगची गरज असते. गावातच काही दिवस साठवणूक करण्याची व्यवस्था केली पाहिजे. नाशवंत माल जादा दिवस टिकून राहण्याची सुविधा गावातच केली पाहिजे. जेथे मागणी आहे तेथे माल थेट पोचविण्याची सुविधा करणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पदवीधरांचा सहभाग वाढविणे, स्थानिक पातळीवर हवामान अंदाज केंद्र चालविणे, माती परीक्षण, कीड - रोगाचे निराकरण याविषयी माहिती कृषी पदवीधरांकडून करून घेणे... पुढे काही गावांचा एक गटही करता येईल.
शेतीकडे एक उद्योग म्हणून आपण बघितलं पाहिजे, हा दृष्टिकोन अजून तयार झालेला नाही. त्याची सुरवात करणे आवश्‍यक आहे. शेती किफायतशीर आहे, हे सिद्ध करावं लागणार आहे. हे काही अशक्‍य नाही, यासाठी नियोजनाची गरज आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: