Last Update:
 
ऍग्रो प्लस

स्पर्धा परीक्षांसाठी व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा
-
Thursday, June 28, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro plus

व्यक्तिमत्त्व विकास हा त्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. तर त्या व्यक्तीकडून भावी काळात प्रचंड सुधारणा होण्यासाठी असतो. स्वतःचे जीवनमान सुखकर करून इतरांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी तो असतो.
डॉ. रामचंद्र साबळे

स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांनी तयारी करताना नियोजित दिवसांचे, आठवड्यांचे, महिन्यांचे आणि पूर्ण वर्षाचे प्रातिनिधिक वेळापत्रक स्वतःच तयार करावे. आपल्या मनामध्ये संकल्प ठरवणे आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आपली दिनचर्या आतापासूनच ठरवावी.

1) कर्म -
प्रत्येकाचे जीवनाचे कर्म ठरलेले असते. एखाद्या उमेदवारास ज्या कामाची आवड आहे, अशा विषयात शिक्षण घ्यावे. त्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. साधकाने साध्य गाठून आपल्या जीवनातील कर्म अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, जोमाने, चिकाटीने पार पाडीत गेल्यास आपोआप दुसऱ्या बाजूस त्या व्यक्तीचा विकास घडत जातो.

2) व्यायाम -
आरोग्याच्यादृष्टीने व्यायामाची नितांत गरज असते. त्यासाठीच शाळेपासून पी.टी. आणि इतर खेळांचा समावेश आपल्या शैक्षणिक उपक्रमात केलेला असतो. सूर्यनमस्कार, पी.टी. आणि चालण्यावर आपला भर असावयास हवा. त्यामुळे शरीराची तंदुरुस्ती होते. शरीर सक्षम राहते. खेळामुळे मान-अपमान सहन करण्याची शक्ती वाढते. त्यासाठीच व्यायाम हा एक व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. शरीराचे तंदुरुस्ती बरोबरच शरीर सक्षम बनून स्पर्धात्मक युगात शरीर साथ महत्त्वाची असते. व्यायामासाठी दिवसातील काही वेळ राखून ठेवावा.

3) विश्रांती -
शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते. त्यानुसार आपली रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवणे महत्त्वाचे आहे. रात्री 10.30 वाजता झोपणे आणि सकाळी 5 ते 5.30 वाजता उठणे या क्रियेत सात तास झोप अथवा विश्रांती मिळते. झोपेमुळे मेंदू आणि शरीर या दोन्हीला विश्रांती मिळते. मात्र यापेक्षा झोप कमी करून ताण वाढवणे योग्य नसते. बऱ्याचदा विद्यार्थी जागरण अधिक करतात आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. पुढचा दिवस आळसात जातो. त्यासाठी आपण आपणासच शिस्त आणणे आवश्‍यक असते. त्यानुसार आपली दिनचर्या ठरवून त्यानुसार कामे पार पाडल्यास कर्म करण्यासाठी पुष्कळ वेळ मोकळा राहतो. त्यामुळे विश्रांतीचा काळ ठरवणे, वेळ ठरवणे आणि त्यानुसार शरीराला सवय लावणे गरजेचे असते. झोप अथवा विश्रांती सलग सात तास व्यवस्थित मिळाल्यास दुसरे दिवशी शरीर सक्षम बनून फार थोड्या वेळात अधिक कामे पूर्ण करणे सहज शक्‍य होते. दुपारी झोपण्याचे शक्‍यतो टाळणे हितावह असते. एकदा दुपारी झोपण्याची शरीराला सवय जडल्यास तीच सवय बळावते. त्यासाठीच दररोजचे वेळापत्रक तयार करावे. झोपण्यापूर्वी आपण ठरवलेल्या कामापैकी किती कामे पार पडली आणि उद्याची कामे कोणती याचा विचार करून झोपी गेल्यास दुसऱ्या दिवशीही कामे वेगाने पार पाडणे शक्‍य होते.

4) आहार -
दररोजचा आहार फार महत्त्वाचा असतो. त्यात वेळच्यावेळी आहार घेण्यास अधिक महत्त्व आहे. आहारामध्ये अति गोड, अति तिखट. अति आंबट, अति तेलकट पदार्थांचा वापर नसावा. सात्त्विक आहार असावा त्यामध्ये कडधान्ये, उसळी भाजीपाला, पोळी, आमटी, फळे, दूध यांचा प्रमाणशीर समावेश असावा. आहारात काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा कच्च्या स्वरूपात थोड्या प्रमाणात असणे हितावह आहे. आवश्‍यकतेनुसार आपल्या शरीराच्या आवश्‍यक कॅलरीज आपल्या दररोजचे आहारातून मिळावयास हव्यात. गरजेपेक्षा कमी कॅलरीजचा आहार घेतल्यास थकवा येतो. मात्र गरजेपेक्षा अधिक आहाराची सवय झाल्यास आहार जसा वाढवाल तसा तो वाढतच जातो आणि दिवसभर सुस्ती येते. अपचन होणार नाही, शरीर तंदुरुस्त राहील याची काळजी घेतल्यास दररोजच्या कामांसाठी शरीरातून योग्य त्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि ठरवलेली सर्व कामे पार पाडणे शक्‍य होते. आहाराचे वेळेत बद्दल झाल्यास शरीरावर लगेच परिमाण दिसतो कारण कॅलरीजची पूर्तता वेळीच झाल्यास शरीर थकल्याप्रमाणे होते आणि कामातील उत्साह कमी होतो. व्यक्तिमत्त्व विकासात आहारास फार महत्त्व आहे.
 
5) वेगवेगळ्या वक्‍त्यांची भाषणे ऐकणे -
वेगवेगळ्या वक्‍त्यांची भाषणाची शैली आपण अनुभवल्यास त्यांची मुद्दे मांडण्याची पद्धत, एखाद्या विषयाबाबतचे सर्वांगीण ज्ञान या सर्व बाबी आपणास थोड्या वेळात मिळतात. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या विषयावर भाषण करण्यासाठी त्यांनी सात ते आठ तासांची केलेली तयारी एखाद्या तासात आपणास अवगत होते. अशा वेळी अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी आवड निर्माण करून ज्या विषयावर व्याख्यान असेल त्याबाबतचे आपले ज्ञान आणि वक्‍त्यांचे भाषणानंतर त्या ज्ञानात पडलेली भर यामुळे आपला व्यक्तिमत्त्व विकास होत असतो.
 
6) वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणे -
विविध महाविद्यालयात वेगवेगळ्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धांतील एखाद्या विषयाची निवड करून आपण अशा स्पर्धात उतरणे गरजेचे असते. त्यामुळे भिडस्तपणा, भित्रेपणा कमी होऊन धीटपणा वाढतो. त्यातूनही व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. मात्र अशा स्पर्धात बऱ्याचदा ठराविक विद्यार्थी उतरताना दिसतात. बरेचजण भाषणे ऐकणे पसंत करतात. त्यामुळे आपणास शक्‍य असले तर आणि शक्‍य होईल तेव्हा अशा स्पर्धात भाग घ्यावा.

7) गटचर्चा आणि चर्चा सत्रे -
स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने गटचर्चा आणि चर्चासत्रेही महत्त्वाची ठरतात. काहीवेळा एखाद्या विषयावर अनेक जण आपापली मते मांडून वैचारिक देवाण- घेवाण होते. मात्र बऱ्याचदा यातही ठराविक उमेदवारच बोलत राहतात आणि बरेचजण ऐकणे पसंत करतात. त्याऐवजी प्रत्येकाचा सहभाग त्यात झाल्यासच सर्वांच्या ज्ञानात एखाद्या विषयाबद्दल भर भडून तो विषय अधिक चांगला होतो. त्यासाठी चर्चाही खेळीमेळीची असावी लागते. बऱ्याचदा आपण मांडलेल्या विचारामधून वाद-विवाद होतात. त्यासच आपण वाद-विवाद स्पर्धा असेही म्हणतो. मात्र अशा वादविवादात खोचकपणा, मिश्‍कीलपणा असणे अधिक गरजेचे ठरते.

8) चर्चा सत्रे -
चर्चा सत्रामध्ये एखाद्या विषयावर अनेक जण मते मांडतात. त्यातून आपणास ज्ञान नसलेले भागही समजतात. त्यातून आपल्या ज्ञानात अधिक भर पडून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.

9) कपडे आणि ड्रेस -
आपल्या आवडी निवडीनुसार आपले कपडे आणि ड्रेस ठेवणे हिताचे असते. मात्र त्याबरोबरच इतरांचे ड्रेस, त्यांचे रंग आणि त्यादृष्टीने आपले निरीक्षण ठेवल्यास आपणासही अधिक फायदा राहतो. सुटसुटीत कपडे आणि सर्वसाधारणपणे उच्चपदांना शोभतील असेच रंग निवडण्यास सुरवात करावी.

10) चांगले आणि वाईट गुण -
प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट गुण असतात. चांगल्या गुणांची संख्या वाढवणे आणि वाईट गुण कटाक्षाने टाळणे हे याचा सराव दररोज करावा लागतो. दररोजच्या रोजनिशीमध्ये आज आपण चांगले काय केले त्याचा आनंद जरूर घ्यावा. त्याशिवाय आपण काय चुका केल्या याचाही परामर्श घ्यावा. त्यातूनच आपल्या स्वतःत प्रचंड सुधारणा होते.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ""एस... इट ईज पॉसिबल'' या संदेशाद्वारे बहुमत प्राप्त करून सत्ता मिळवली. ""एस-इट ईज पॉसिबल'' हा संदेश देण्याच्या वेळी अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळत होती. ती थोपविण्यात त्यांना यश प्राप्त झाले. पूर्वीच्या राष्ट्राध्याक्षांपेक्षा हे निश्‍चितच वेगळेपण होते. त्यातूनच त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा लाभ अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला मिळाला. व्यक्तिमत्त्व विकास हा त्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. तर त्या व्यक्तीकडून भावी काळात प्रचंड सुधारणा होण्यासाठी असतो. स्वतःचे जीवनमान सुखकर करून इतरांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी तो असतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसावादी चळवळीने आणि "भारत छोडो' आंदोलनाने ब्रिटिशांना आपला देश सोडावा लागला. या महान व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आपण अभ्यासतो. त्याचे चिंतन करतो. अशा प्रकारच्या अनेक व्यक्तींची उदाहरणे देणे शक्‍य आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी हवामान शास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: