Last Update:
 
ऍग्रो व्हिजन

आफ्रिकी उंदरांच्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले
-
Friday, July 20, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro vision

"एनआरजी- 1' प्रथिनांची अधिक पातळी ठरते मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची

सर्वसाधारणपणे उंदराचे आयुष्य हे सरासरी तीन वर्षांचे असते. त्या तुलनेत पूर्व आफ्रिकेत आढळणाऱ्या नेकेड मोल रॅट या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या उंदराचे आयुष्य हे 10 ते 30 वर्षांपर्यंत असल्याचे आढळले आहे. उंदीरवर्गीय प्राण्यांमध्ये मानवाच्या तुलनेत वार्धक्‍याच्या खुणा फार कमी प्रमाणात दिसून येतात. विशेषतः शेवटपर्यंत कार्यक्षमता, हाडांचे आरोग्य, प्रजननक्षमता व अन्य अनेक क्षमता मानवाच्या तुलनेत उंदरांमध्ये वार्धक्‍यामध्येही चांगल्या स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इस्राईल आणि अमेरिकेतील संशोधकांनी एकत्रितरीत्या या लहान सस्तन प्राण्याच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यामागील कारणांचा अभ्यास केला. त्यांना नेकेड मोल रॅट या उंदरांमध्ये "एनआरजी- 1' प्रथिनांची अधिक पातळी आयुष्यभरासाठी स्थिर राहत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन "एजिंग सेल' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

उत्क्रांतीमध्ये उंदरांच्या प्रजातीमध्ये विविध बदल होत गेले आहेत. उंदराच्या प्रत्येक प्रजातीचे आयुष्यकाळ हे वेगवेगळे आहेत. त्यामागील कारणांचा अभ्यास इस्राईल येथील तेल अविव विद्यापीठातील डॉ. डोरोथी हचोन आणि टेक्‍सास विद्यापीठातील रोचिल्ले बफेनस्टेन व न्यूयॉर्क शहर महाविद्यालयातील डॉ. येल ईड्रे यांनी एकत्रितरीत्या केला. त्यांच्या अभ्यासामध्ये नेकेड मोल रॅट (Heterocephalus glaber) या उंदरांचा आयुष्यकाळ हा 10 ते 30 वर्षे असून, अन्य उंदरांच्या प्रजातींमध्ये तो केवळ तीन वर्षांपर्यंत असतो. त्यामुळे नेकेड मोल रॅटवर अधिक संशोधन करण्यात आले. या उंदरांमध्ये "एनआरजी- 1' या प्रथिनांचे प्रमाण अधिक आढळून आले असून, ही प्रथिने मेंदूच्या चेतापेशींच्या संरक्षणासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. मानव आणि उंदीर यांच्यामध्ये 85 टक्के जनुकीय साम्य असल्याने या संशोधनातून निघालेले निष्कर्ष मानवासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत.

...असे झाले संशोधन
- डॉ. हचोन या उंदीरवर्गीय प्राण्यांतील तज्ज्ञ असून त्यांनी या प्रकल्पासाठी सात उंदरांच्या प्रजातींचा अभ्यास केला आहे. त्यात जिनेवा पिगस, माईस, मोल रॅट यांचा समावेश असून, त्यांच्यातील जनुकीय साम्य आणि फरकांचा अभ्यास केला आहे. मात्र, उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अन्य उंदरांच्या प्रजातींपेक्षा मोल रॅट यांची वेगळ्या प्रकारे उत्क्रांती झाल्याचे त्यांना दिसून आले आहे.
- मोल रॅट आणि अन्य उंदरांच्या जातींचे जनुकीय विश्‍लेषण करण्यात आले. त्यात "एनआरजी- 1' या प्रथिनांची प्रौढातील पातळी ही त्यांच्या दीर्घायुष्याशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांनी अभ्यासलेल्या सर्व उंदरांमध्ये नेकेड मोलमध्ये या प्रथिनांचे प्रमाण अधिक आढळले आहे, तसेच त्यांच्यामध्ये आयुष्यभर ते स्थिर राहत असल्याचे दिसून आले आहे. मेंदूच्या प्रक्रिया व्यवस्थित चालण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रथिन महत्त्वाचे असून, ते तीव्र अशा सेरेबेलियमच्या स्वरूपात असते.
- दुसऱ्या प्रयोगामध्ये बफेनस्टेन आणि इड्रे यांनी मोल रॅट उंदरातील जन्माच्या पहिल्या दिवसापासून 26 वर्षांपर्यंतच्या "एनआरजी- 1' च्या पातळीचा अभ्यास केला. त्यामध्ये या उंदरांच्या आयुष्यामध्ये पूर्ण काळात या प्रथिनांची पातळी स्थिर राहते. मेंदूतील चेतापेशींच्या संरक्षणासाठी, त्यांच्या कार्यक्षमतेसाठी हे प्रथिन महत्त्वाचे कार्य करते.

नेकेड मोल रॅट हा प्राणी मातीमध्ये विशेषतः मुंग्यांच्या वारुळामध्ये राहतो. या प्राण्यातील "एनआरजी- 1' प्रथिन मेंदूच्या एकसंधतेसाठी मदत करू शकते. या दीर्घायू प्राण्याच्या वार्धक्‍याच्या प्रक्रियेतील टप्पे ओळखण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे आहे. त्याच्यावरील संशोधन वार्ध्यक्‍याबरोबरच विविध जैववैद्यकीय कारणांसाठी महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात कर्करोगासाठी प्रतिबंधक आणि मेंदूशी संबंधित रोगावरील उपचारासाठी फायद्याचे ठरणार आहे. मानवी वार्ध्यक्‍य कमी करण्यासाठी भविष्यातील संशोधनात या निष्कर्षांचा वापर होऊ शकतो.
- डॉ. डोरोथी हचोन, तेल अविव विद्यापीठ, इस्राईल


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: