Last Update:
 
बाजारभाव

श्रावणामुळे नाशिकला वाढली कोथिंबिरीस मागणी
-
Saturday, July 21, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: market rate

नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. 19) कोथिंबिरीच्या 85 हजार 700 जुड्यांची आवक झाली. या वेळी प्रति शंभर जुडीस कोथिंबिरीस 700 ते 4100 व सरासरी 3000 असे दर निघाले. मागील आठवड्यापासून कोथिंबिरीची आवक घटलेली असताना श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर कोथिंबिरीला स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारातून मागणी वाढली आहे.

या वेळी ढोबळी मिरचीच्या प्रति 10 किलो वजनाच्या 4000 क्रेटची आवक झाली. या वेळी प्रति क्रेटला 125 ते 300 व सरासरी 200 रुपये दर निघाले.
ढोबळी मिरचीच्या आवकेत घट झाली असून स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे. मागील पंधरवड्यापर्यंत ढोबळी मिरचीची 8000 ते 14000 क्रेटची आवक होत असे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून आवकेत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. टंचाईची स्थिती व जलपातळीत झालेली घट यामुळे ढोबळी मिरचीची नाशिक भागातील आवक घटली आहे. नाशिकच्या नाशिक, दिंडोरी, निफाड तालुक्‍यांत शेडनेटमध्ये मोठ्या प्रमाणावर ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. ढोबळीला वर्षभर मागणी असल्याने मागील वर्षभरात ढोबळीचे क्षेत्र वाढले आहे. ढोबळी बरोबरच टोमॅटो, फ्लॉवर व दोडका या शेतीमालाला स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी होत आहे. गुरुवारी नाशिक बाजार समितीत टोमॅटोची 700 क्विंटल इतकी आवक झाली. या वेळी टोमॅटोलाही 150 ते 400 दरम्यान व सरासरी 250 असे दर निघाले. सध्याचा हंगाम हा टोमॅटोचा नसल्याने बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक घटली आहे. सद्यःस्थितीत नाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यांतून नाशिक बाजार समितीत टोमॅटोची आवक होत आहे. नाशिक भागात प्रामुख्याने खरीप हंगामात टोमॅटोची लागवड होते. येथील टोमॅटो बाजाराचा हंगाम दसरा दिवाळी पासून सुरू होतो. सद्यःस्थितीत नाशिक बाजारात फ्लॉवरच्या आवकेतही जवळपास निम्म्याने घट झाली आहे. मागील सप्ताहापर्यंत फ्लॉवरची आवक 160 क्विंटल इतकी सरासरी राहिलेली आहे. गुरुवारी 75 क्विंटल फ्लॉवरची आवक झाली. या वेळी फ्लॉवरला 100 ते 150 व सरासरी 200 रुपये प्रति क्विंटल असे दर निघाले. नाशिक भागातील वेलवर्गीय भाज्यांची आवक व दर स्थिर असले तरी दोडक्‍याला मुंबईच्या बाजारपेठेतून विशेष मागणी वाढल्याचे शनिवारी चित्र होते. एकूण 40 क्विंटल दोडक्‍याची आवक झाली असता 160 ते 300 व सरासरी 300 असे प्रत्येक 15 किलो वजनाच्या दोडक्‍याच्या क्रेटला दर निघाले. दरम्यान, वांग्याची आवक सर्वसाधारण राहिली असताना वांग्याला दरही चांगले राहिले. या वेळी वांग्याची 400 क्विंटलची आवक झाली व 125 ते 250 व सरासरी 150 असे प्रति 18 किलो वजनाच्या वांग्याच्या क्रेटला दर मिळाले. मॉन्सून सुरू होऊनही अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने बाजारातील शेतीमालाची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे फळभाज्यांचे दर विशेष वधारले आहेत. ही परिस्थिती अजून दोन महिने तरी राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: