Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

मधमाश्‍यांना जपू या रोगांपासून
-
Tuesday, July 24, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro planing

मागील भागापासून आपण मधमाश्‍यांच्या रोगांविषयी जाणून घेत आहोत. त्यामध्ये ऍकेराइन रोगाची ओळख, उपाययोजना यांची माहिती आपण घेतली. या भागात आपण अन्य रोगांची माहिती घेऊन मधमाश्‍यांना रोगांपासून वेळीच रोखण्याचे प्रयत्न करावेत.

नोसेमा रोग -
हा रोग मधमाश्‍यांना नोसेमा एपिस कोळ्यामार्फत (माईट) होतो. त्याची अंडी मधमाश्‍यांच्या अन्ननलिकेतून आत प्रवेश करतात व शरीरातून मैल्याद्वारे बाहेर पडतात व वसाहतीत पसरतात, त्यामुळे रोगाचा प्रसार होतो.

रोगाची लक्षणे -
- मधमाश्‍यांना उडता येत नाही. त्यांच्या पातळ मैल्याचे थेंब पोळ्यावर, पेटीच्या तळपाटावर, पेटीच्या प्रवेशद्वारासमोर विखुरलेले दिसतात.
- मेलेल्या किंवा मरण्याच्या अवस्थेतील मधमाश्‍या पेटीजवळ दिसतात.
- वसाहतीतील कामकरी माश्‍यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली दिसते.
- मध उत्पादन कमी होते.
- रोगाची लागण झाल्यामुळे राणी माशी अंडी घालू शकत नाही, ती अंडी घालणे बंद करते.

उपाय -
- प्रतिजैविकांचे (ऍन्टिबायोटिक्‍स) उपचार, जसे फ्युमॅगिलीन किंवा फ्युमिडिल B वापरावे.
- डोस - 100 मिलीग्रॅम फ्युमॅगिलीन प्रति वसाहत या प्रमाणात 250 मिली. थंड साखरेच्या फिडिंगबरोबर दहा दिवस रोज द्यावे, तसेच मधमाश्‍यांच्या अंगावर त्याचा शिडकावा केल्यास परिणामकारक ठरते.
ऍसिटिक ऍसिड (98 टक्के) दोन मिली. प्रति 100 लिटर पाणी पेटीत फ्रेममध्ये ठेवून वाफारा दिल्यास रोगाची लागण रोखण्यास मदत होते.

ब्रूड डिसीज किंवा पिलावळाचे रोग -
1) युरोपियन फाउल ब्रूड (EFB)

मधमाश्‍यांना होणारा हा प्रमुख रोग आहे. या रोगाची लागण मेलिसोकॉकस प्लुटॉन या जिवाणूंमुळे (बॅक्‍टेरिया) होते. मधमाश्‍यांच्या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे अंडी, अळी व कोष या अवस्थांत या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. याचा प्रसार वसाहतीतील नर्स व स्वच्छता करणाऱ्या कामकरी माश्‍यांमुळे पसरतो, तसेच वसाहतीचे ड्रिफ्टिंग (एका वसाहतीतील मधमाश्‍या दुसऱ्या वसाहतींमध्ये उडून जाणे), रॉबिंग (दुसऱ्या वसाहतीतून साखरेचा पाक घेण्यासाठी येणाऱ्या माश्‍या), वसाहती एकत्र करणे (युनायटिंग), साखरपाक फिडिंगमुळे रोगाची लागण दुसऱ्या वसाहतीत पसरते.

रोगाची लक्षणे -
- सभोवताली चांगला बहर असला तरी वसाहतीतील मधमाश्‍यांची संख्या रोडावते. मधमाशी अशक्त होते.
- ब्रूड (अंडी व पिल्लांची जागा) विरळ झालेला दिसतो.
- अळ्या मेलेल्या दिसतात.
- लागण झालेल्या अळ्या (लार्व्हा) पारदर्शक दिसतात व त्या नंतर मृत पावतात.
- अशा कुजलेल्या लार्व्हा चिकट होतात व त्यानंतर वाळून पापुद्रे होतात आणि दुर्गंध येतो.

उपाय -
- प्रतिजैविक (अँटिबायोटिक) टेरामायसीनचा वापर करावा.
डोस -
- 250 मि.ग्रॅ. टेरामायसीन प्रति 150 - 300 मिली. साखरेच्या फिडिंगमधून तीन वेळा सात दिवसांच्या अंतराने द्यावे.

मधमाश्‍यांची व्यवस्थापन पद्धत कशी असावी?

1) अशक्त वसाहतींचे एकत्रीकरण करून त्यांना सशक्त करणे.
2) फुलोरा नसेल त्यावेळेस योग्य उपाय. यात फिडिंग किंवा स्थलांतर करणे.
3) रोगाची लागण झालेल्या वसाहतीला वेगळे करून इतर वसाहतींपेक्षा लांब व स्वतंत्र ठेवणे.
4) पोळ्यांची अदलाबदली, संपर्कात आलेल्या उपकरणांची योग्य निगा राखणे.
5) रोगांची लागण न झालेल्या वसाहतींची निवड करून त्यापासून नव्या वसाहती तयार करणे.

- थाई सॅक ब्रूड डिसीज (TSB) -
या रोगाच्या विषाणूंची (व्हायरस) अळीच्या सुरवातीच्या अवस्थेतच लागण होते व थोड्याच दिवसांत अळ्या मरतात. वसाहतीत या रोगाची लागण मधमाश्‍यांच्या आपापसांतील संपर्कामुळे पसरते. या रोगाची माहिती पुढील भागात सविस्तर घेऊ.
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: