Last Update:
 
ऍग्रो गाईड

घटसर्प व फऱ्या रोगांबाबत माहिती द्यावी
-
Tuesday, July 24, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro guide

सदानंद सातकर, वाई, जि. सातारा

षीमहाविद्यालय, पुणे येथील तज्ज्ञ महेंद्र मोटे यांनी दिलेली माहिती - "उपचारापेक्षा प्रतिबंध बरा' या उक्तीप्रमाणे रोग झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय कधीही चांगलेच. त्याकरिता जनावरांना प्राणघातक रोगांपासून वाचविण्यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करणे आवश्‍यक आहे. कोणतीही लस देण्याचा खर्च हा रोगाची लागण झाल्यावर कराव्या लागणाऱ्या औषधोपचाराच्या खर्चापेक्षा फारच कमी असतो. दोन्ही रोगांकरिता पावसाळ्यापूर्वी मे-जून महिन्यात लसीकरण करणे गरजेचे आहे.

घटसर्प -
घटसर्प हा तीव्र स्वरूपाचा संसर्गजन्य रोग असून, या रोगाचे जंतू अशुद्ध पाणी, चाऱ्याद्वारे शरीरात प्रवेश करतात. हा रोग विशेषतः म्हशी आणि गाईंमध्ये आढळून येतो. हा रोग सहसा पावसाळ्यात होतो. जनावरांना ताप येतो, नाकातून पाणी येते, डोळे लाल होतात व श्‍वसननलिकेस सूज येते. गाभण जनावरांत गर्भपात होण्याची शक्‍यता असते. फुफ्फुसाचा दाह होऊन जनावरे दगावतात. गळ्याखालचा भाग सुजलेला दिसतो. जनावरांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. जनावरे तोंडाने श्‍वास घेऊ लागतात. त्यांच्या घशात घरघर आवाज येतो.

फऱ्या -
फऱ्या हा एकदम वाढणारा, संसर्गजन्य रोग आहे. हा रोग सर्वसाधारणपणे सहा महिने ते दोन वर्षे वयोगटातील जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा रोग सहसा पावसाळ्याच्या सुरवातीला होतो. जनावरांच्या मागच्या किंवा पुढच्या फऱ्याला सूज येते. सुरवातीला सूज हाताला गरम लागते व दुखते, काही दिवसांनी सूज दुखत नाही. जनावरे लंगडतात. जनावरांना ताप येतो. फऱ्यावरील सूज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगावर प्रभावी लस उपलब्ध असून, पावसाळ्यापूर्वी एकदा लस टोचली की वर्षभर प्रतिकारशक्ती असते. आजारी जनावरे वेगळी बांधून त्यांची चारा-पाण्याची वेगळी व्यवस्था करावी. जनावरांचे योग्य वेळी लसीकरण करणे, गोठे स्वच्छ ठेवणे, उत्कृष्ट खाद्य देणे, स्वच्छ पाणी पिण्याकरिता उपलब्ध करणे गरजेचे आहे. 
 
- महेंद्र मोटे, 9890123462


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: