Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

ऍग्रोसंवाद उपक्रमातून मिळतेय शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीची दिशा
टीम "ऍग्रोवन'
Thursday, July 26, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon,   farmer,   agriculture
"ऍग्रोवन'तर्फे प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम (ऍग्रोसंवाद) राज्यात विविध ठिकाणी घेतले जातात. विविध पिकांतील व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय आदी विविध विषयांवर या वेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. यंदाच्या जुलैमध्येही 20 तारखेला झालेल्या "ऍग्रोसंवाद' कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीची दृष्टी मिळाली.

शेतीकडे उद्योग म्हणूनच पाहिले पाहिजे
मुरूड येथील ऍग्रोसंवादात प्रगतिशील शेतकरी आवाड यांचे आवाहन
मुरूड (जि. लातूर)
शेतकऱ्यांनी शेती करण्याची पारंपरिक पद्धत बदलली तरच अनावश्‍यक खर्च कमी होऊन शेती व्यवसाय फायद्यात येईल. शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्याची नितांत आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन रांजणी येथील (ता. कळंब) एन - साई साखर कारखान्याचे संचालक व प्रगतिशील शेतकरी पांडुरंगआबा आवाड यांनी केले.

"सकाळ - ऍग्रोवन'च्या वतीने आयोजित ऍग्रोसंवाद उपक्रमात "ऊस व सोयाबीन व्यवस्थापन' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमचंद भोरकर अध्यक्षस्थानी होते. लातूरच्या मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ संदीप देशमुख, कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ सचिन कवडे, माजी सरपंच हरिभाऊ नाडे, तालुका कृषी अधिकारी डी. सी. सोळुंके, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष वैजनाथ नाडे, प्रगतिशील शेतकरी संजयतात्या नाडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. आवाड म्हणाले, की शेतीत आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. मातीचे परीक्षण करूनच खताच्या मात्रा द्याव्यात. अभ्यास व नियोजन करून शेती केली तरच ती फायद्यात राहणार आहे. श्री. देशमुख यांनी हमखास सोयाबीन उत्पादनासाठी पंचसूत्री सांगितली. यात उगवणशक्ती असलेल्या बियाण्यांची योग्य जमिनीत योग्य वेळी पेरणी, बीजप्रक्रिया, पेरणी वेळी फोरेटसारख्या कीटकनाशकांचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांसोबत गंधकयुक्त खतांचा वापर आणि नियमित निरीक्षण व पीक-रोग निदान करून संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी देणे या सूत्रांचा समावेश होता. श्री. कवडे यांनी ऊसरोपांची लागवड करून चांगले उत्पादन शक्‍य असल्याचे सांगून शाश्‍वत ऊस उत्पादन पद्धतीची माहिती दिली. यातून उसाच्या उत्पादनात वीस टक्के वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. सोळुंके यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. या वेळी वैजनाथ कोपरकर, भागवत नाडे, चंद्रकांत कणसे, मोतीराम कणसे, बबनअप्पा कणसे, नारायण सापसोड, मोहन चांडक, राजेंद्र नाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "ऍग्रोवन'चे क्षेत्रीय सहायक बालाजी थोडसरे व "सकाळ'चे बातमीदार विकास गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.

कांचनवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर)
सुधारित तंत्रातून वाढवा भात उत्पादन : डॉ. पिसाळ
कांचनवाडी (प्रतिनिधी) : आजही 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच भात लागवड करतात. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान होते. उत्पादनात वाढ मिळण्यासाठी सुधारित तसेच संकरित जातींची निवड, सुधारित लागवड तंत्राचा वापर करावा, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ यांनी केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता दिघे होत्या.

चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ. पिसाळ म्हणाले, की सुधारित तंत्रातून पीक उत्पादन वाढ शक्‍य आहे. यासाठी सुधारित आणि संकरित भात जातींची निवड, बीजप्रक्रिया, शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर, वेळीच कीड, रोगांचे नियंत्रण या बाबी महत्त्वाच्या आहेत. लागवड चारसूत्री पद्धतीने करावी. लावणीच्यावेळी युरिया- डीएपी ब्रिकेट्‌सचा वापर करावा. भात लावणीनंतर 27 ते 30 व्या दिवशी फुटवा फुटायला सुरवात होते. यानंतर कीड, रोगाच्या प्रादुर्भावाची शक्‍यता असते. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाची उपाययोजना करावी.

या वेळी वसुंधरा शेतकरी विज्ञान मंडळातर्फे उपस्थितांना 500 झाडांचे वाटप करण्यात आले. चर्चासत्राच्या तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, मंडल कृषी अधिकारी आर. पी. कामत, कृषी पर्यवेक्षक श्री. माने, "ऍग्रोवन'चे राजकुमार चौगुले, विशाल जाधव, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोसले, श्रीपती भोसले, कृष्णात भोसले, लक्ष्मण पाटील, सदाशिव पाटील, तानाजी पाटील, महिपती कांबळे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन नामदेव माने यांनी केले. डी. बी. भोसले यांनी आभार मानले.

सकारात्मक दृष्टिकोन, सुधारित तंत्राची हवी कास
विकास पाटील, विंग (जि. सातारा)
शेतकऱ्यांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, सुधारित तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती केली पाहिजे. ऊस उत्पादनवाढीसाठी उत्तम दर्जाचे बेणे आणि पाणी व्यवस्थापन या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.

विंग (जि. सातारा) येथे ऊस लागवडीचे सुधारित तंत्र व पाणी व्यवस्थापन याविषयी चर्चासत्रात श्री. पाटील बोलत होते. या वेळी प्रगतिशील शेतकरी अनिल कुलकर्णी, कृषी अधिकारी शरद दोरगे, सरपंच बबनराव शिंदे, उपसरपंच दादासाहेब होगले, मंडल अधिकारी एस. बी. डिसले, उपविभागीय पर्यवेक्षक सुनील ताकटे आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की शेतीला अति पाणी दिल्यामुळे जमिनी क्षारपड होत आहेत. त्याचबरोबर सध्या दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याचीही अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाचा पिकांसाठी उपयोग करणे काळाची गरज बनली आहे, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन एकरी उत्पादन वाढण्यास मदत होईल.

श्री. कुलकर्णी म्हणाले, की ज्ञान आणि दूरदृष्टी ठेवून आजची शेती केली पाहिजे, त्यामुळे शेती परवडत नाही अशी मानसिकता कमी होईल. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशीच आपली परंपरा सुरू राहिली पाहिजे. शेतीला प्रतिष्ठा नाही असे म्हणणाऱ्यांनी स्वतःपासून बदल करण्यास सुरवात केली पाहिजे, तरच शेती जीवन सुधारेल. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरात देशी गाय पाळली पाहिजे. तिचे मूत्र, शेण शेतीसाठी संजीवनी आहे. शेतकऱ्यांसाठी दैनिक "ऍग्रोवन' हे ज्ञानाचे भांडार असून प्रत्येकाने दररोज "ऍग्रोवन' वाचला पाहिजे, असेही ते म्हणाले. शरद दोरगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी "ऍग्रोवन'चे प्रतिनिधी विकास जाधव, संजय देसाई, तानाजी शिंदे, महादेव पाटील, आबासाहेब पाटील, जयवंत खबाले, सुनील पाटील, नंदकुमार माने, सौ. एम. जी. साळुंखे, व्ही. बी. नाळे यांच्यासह मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शेतकरी या वेळी उपस्थित होते. सरपंच श्री. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुनील ताकटे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.

डाळिंब पिकात समस्या अधिक, अजून संशोधन हवे
द्राक्षाप्रमाणे डाळिंबात रूट स्टॉक आल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत. डाळिंब शेतीत अनेक प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे अपेक्षित आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डाळिंब शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष प्रमोद शांताराम देशमुख यांनी मांडले.
तालुक्‍यातील निळवंडे येथे ऍग्रो संवाद कार्यक्रमात बदलत्या हवामानानुसार डाळिंबावरील कीड-रोगाचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब नवले होते. या वेळी प्रगतिशील शेतकरी माधवराव पगार, विष्णूपंत रहाटळ, भाऊसाहेब जऱ्हाड आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी वातावरणानुसार बदलले पाहिजे. गेल्या तीन- चार वर्षांपासून तापमान वाढ, थंडीची लाट, अनियमित पाऊस या गोष्टी डाळिंब शेतीस मारक ठरत आहेत. निर्यातक्षम 30 ते 40 टक्के मालाचे नुकसान केवळ "सन स्ट्रोक'मुळे होऊ शकते. त्यासाठी पेपर आच्छादनाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. कीडनाशकांच्या अति वापराने डाळिंब पिकास इजा पोचते. त्याचे दुष्परिणाम फळांवर डाग पडण्यात होतात.

डॉ. नवले म्हणाले, की मर, करपा, तेलकट डाग हे डाळिंबाचे शत्रू आहेत. अधिकाधिक सेंद्रिय खते दिल्याने जमिनीचा पोत चांगला राहतो. आपला शेतकरी कष्टाळू आहे. त्यामुळे डाळिंब शेतीत निळवंडेचे नाव जगाच्या बाजारपेठेत जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मर रोग अति पाण्यामुळे येतो. तेलकट डाग रोग हा जिवाणूंपासून होतो. या रोगांचा प्रादुर्भाव, कारणे, लक्षणे यांचा अभ्यास करून वेळेवर नियंत्रण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. चर्चासत्रात प्रगतिशील शेतकरी माधवराव पवार, दिलीप पवार, केरू पवार, शिवनाथ आहेर आदींनी विचारलेल्या प्रश्‍नांना डॉ. नवले व श्री. देशमुख यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक सकाळचे बातमीदार नंदकुमार सुर्वे यांनी केले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी शिवाजी गवारे, कृषी सहायक ए. टी. पवार आदी उपस्थित होते. प्रकाश पवार यांनी आभार मानले.

"ऍग्रोवन' शेतकऱ्यांचा सखा
ऍग्रोवन हा शेतकऱ्यांसाठी खरा आधार आहे. या दैनिकाचे महत्त्व आता सर्वांनाच पटले आहे. देशातील एकमेव अशा या कृषी दैनिकाचा प्रयोग निश्‍चितच कौतुकास्पद आहे. आज ऍग्रोवन तमाम शेतकरी बांधवांचा सखा झाला आहे, असे श्री. देशमुख व डॉ. नवले यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जामगाव (ता. पारनेर, जि. नगर)
"ऍग्रोवन' शेतकऱ्यांचा मार्गदर्शक : डॉ. ढगे
भाळवणी (प्रतिनिधी) ः दै. "ऍग्रोवन'मध्ये हंगामनिहाय पीक व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव याबाबत शास्त्रीय माहिती दिलेली असते. या माहितीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. घरात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आता "ऍग्रोवन'ला आले आहे. शेती क्षेत्रातील घडामोडींची माहिती, तसेच पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी या दैनिकाचे नियमित वाचन करावे, असे आवाहन लोणी प्रवरा येथील कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बायोटेक्‍नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. अशोक ढगे यांनी केले.

जामगाव येथे "आपत्कालीन पीक व्यवस्थापन' या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. ढगे बोलत होते. सरपंच दत्तात्रेय शिंदे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. ढगे म्हणाले, की शेतकऱ्यांनी जमीन, पाणी, दर्जेदार बियाणे, खते, कीड-रोग नियंत्रण या पंचसूत्रीचा योग्य अभ्यास करावा. शिफारशीनुसार पीक व्यवस्थापन करावे. सुधारित पद्धतीने पीक लागवड करावी. दिवसेंदिवस जमिनीचा कस कमी होत चालला आहे, त्याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. जादा पाणी व खते दिल्याने पीक उत्पादनात वाढ होते, हा चुकीचा भ्रम आहे. पीक लागवडीचे नियोजन आणि नियमितपणे माती परीक्षण करून शिफारशीत सेंद्रिय तसेच रासायनिक खते वापरावीत. बीजप्रक्रियेच्या वेळी जिवाणू संवर्धकांचा वापर करावा. येत्या काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन महत्त्वाचे आहे. वेळोवेळी पिकातील तणनियंत्रण करावे. चर्चासत्रामध्ये गोविंद शिंदे, मंडल कृषी अधिकारी दिलीप कुलकर्णी यांनीदेखील मार्गदर्शन केले. चर्चासत्राला कृषी सहायक आर. टी. शिंदे, आदिनाथ कुंदारे, श्रीमती एम. बी. पऱ्हे, गोविंद शिंदे, भाऊसाहेब धुरपते, तुकाराम खाडे, रामदास केदार, नारायण पवार, उत्तम सोबले, राजाराम पागिरे, सोमनाथ शिंदे, दादासाहेब मेहेर, दत्तात्रेय गुंजाळ आदी उपस्थित होते. केशव चेमटे यांनी सूत्रसंचालन केले.

रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा, जि. सांगली)
एकरी शंभर टन उसासाठी संतुलित खतमात्रा महत्त्वाची
नवेखेड (प्रतिनिधी) ः एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी दर्जेदार बेण्याची निवड, बेणेप्रक्रिया, पट्टा पद्धतीने लागवड त्याचबरोबरीने माती परीक्षणानुसार शिफारशीत रासायनिक व सेंद्रिय खतांचा योग्य वापर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पिकाचे व्यवस्थापन जेवढे काटेकोर असेल, तेवढी अपेक्षित उत्पादनात वाढ मिळते, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांनी दिला.

रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे आयोजित "ऍग्रोसंवाद' कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी ते म्हणाले, ""उसाचे पीक घेताना जमिनीची सुपीकता लक्षात घ्यावी. जमिनीचा सेंद्रिय कर्ब, सामू, विद्युतवाहकता या बाबी तपासून पाहाव्यात. लागवडीसाठी दर्जेदार - रोगमुक्त बेणे, पट्टा पद्धतीने लागवड, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. हंगामनिहाय शिफारशीत जातींची लागवड करावी. कीड - रोग नियंत्रणाच्यादृष्टीने बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे. उसामध्ये भाजीपाल्यासारख्या आंतरपिकांची लागवड करून ऊस व्यवस्थापन खर्चात बचत करता येते. सध्याच्या परिस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाचटाचे आच्छादन महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, तसेच तणांची वाढ होत नाही. उसाला माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, त्यामुळे अतिरिक्त खर्चात बचत होते, जमिनीचा पोत चांगला राहतो. उसाची भरणी 90 ते 100 दिवसांनी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे तपासून शिफारशीत प्रमाणात योग्य वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.
या वेळी जे. डी. मोरे, भीमराव पवार, दादासाहेब मोरे, दिलीप मोरे उपस्थित होते. गजानन पवार यांनी प्रास्ताविक केले.

निळवंडे (ता. संगमनेर, जि. नगर)
डाळिंबामध्ये हवे एकात्मिक कीड व रोग नियंत्रण : देशमुख
संगमनेर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात डाळिंबापासून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर लागवडीपासूनच पिकाचे शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. देशांतर्गत तसेच परदेशांत आपल्या डाळिंबांना चांगली मागणी आहे, यासाठी दर्जेदार फळ उत्पादनावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. वेळोवेळी तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डाळिंब शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष प्रमोद शांताराम देशमुख यांनी केले.

निळवंडे येथे आयोजित डाळिंब शेती चर्चासत्रामध्ये श्री. देशमुख यांनी पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब नवले होते. मार्गदर्शन करताना श्री. देशमुख म्हणाले, की सध्या हवामान बदलाचा परिणाम डाळिंबाच्या उत्पादनावरही दिसू लागला आहे. कीड - रोग नियंत्रणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्याचा फळांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीयदृष्टीने पीक व्यवस्थापन ठेवावे. वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कीड - रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा. अति फवारण्या करू नयेत. बागेला शिफारशीनुसारच खतांची मात्रा द्यावी. फळांवर कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम होऊ नये यासाठी तयार होणारी फळे कागदाने झाकावीत. द्राक्षाप्रमाणे डाळिंबातही खुंट रोपांबाबत संशोधन झाले पाहिजे.

मार्गदर्शन करताना डॉ. नवले म्हणाले, ""डाळिंबामध्ये मर, तेलकट डाग रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शेतकऱ्यांनी जागरूकपणे बागेतील प्रत्येक झाडाची पाहणी करून लक्षणांनुसार नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. रोगांचा प्रादुर्भाव ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. थंडीमध्ये फळात साखर वाढते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. पाण्याचा गरजेइतकाच वापर करावा. बागेला अति प्रमाणात पाणी देऊ नये.''

चर्चासत्राला परिसरातील प्रयोगशील शेतकरी माधवराव पगार, विष्णूपंत रहाटळ, भाऊसाहेब जऱ्हाड, माधवराव पवार, दिलीप पवार, केरू पवार, शिवनाथ आहेर, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी गवारे, कृषी सहायक ए. टी. पवार उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना डॉ. नवले आणि श्री. देशमुख यांनी उत्तरे दिली. चर्चासत्राचे प्रास्ताविक "सकाळ'चे बातमीदार नंदकुमार सुर्वे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले. सैफ शेख यांनी आभार मानले.

"ऍग्रोवन' शेतकऱ्यांचा मार्गदर्शक :
"ऍग्रोवन हा शेतकऱ्यांसाठी खरा आधार आहे. या दैनिकाचे महत्त्व आता सगळ्यांनाच कळू लागले आहे. देशातील कृषी दैनिकाचा प्रयोग हा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. "ऍग्रोवन' शेतकऱ्यांचा मार्गदर्शक झाला आहे,' असे प्रतिपादन देशमुख व नवले यांनी केले.

कपाशीवरील किडी-रोगांचे नियंत्रण वेळीच करावे
डॉ. झंवर यांचा सल्ला ः कौठा (जि. नांदेड)
कपाशीवरील किडी-रोग वेळीच ओळखून त्यांचे वेळेवर नियंत्रण केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल, असे प्रतिपादन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर यांनी केले.

"सकाळ - ऍग्रोवन'च्या वतीने "ऍग्रोसंवाद' कार्यक्रम कौठा (ता. कंधार) येथे घेण्यात आला, त्या वेळी "कापूस पिकावरील कीड-रोग नियंत्रण' या विषयावर ते बोलत होते. प्रगतिशील शेतकरी शंकरराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. श्री दत्त मंदिरात झालेल्या कार्यक्रमात तज्ज्ञ व शेतकऱ्यांत झालेल्या संवादामुळे शेतकऱ्यांना अनेक विषयांवर शास्त्रीय माहिती मिळाली. "ऍग्रोवन'चे वितरण प्रतिनिधी सुनील पतंगे यांनी "ऍग्रोवन'विषयी माहिती दिली.

डॉ. झंवर म्हणाले, की महागड्या किमतीची कीडनाशके वापरण्याऐवजी निंबोळी अर्काची फवारणी करावी. बीटी कपाशीच्या बियाण्यांसोबत देण्यात येणाऱ्या बिगर बीटी कापूस बियाण्याच्या (रेफ्युजी) पाच ओळी बीटी बियाण्यांभोवती लावाव्यात, त्यामुळे बोंड अळ्यांमध्ये बीटी कपाशीविरुद्ध प्रतिकारक्षमता लवकर विकसित होणार नाही. अधिक उत्पादनक्षमता असणारे, रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील, रोगांना बळी न पडणारे, धाग्याची प्रत चांगली असणारे अशा योग्य वाणांची निवड करावी. खताची मात्रा देताना खत फेकून देऊ नये. पेरणीद्वारे किंवा झाडाच्या मुळाशी खत द्यावे. तणनाशकासाठी वापरलेला पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. किडीचे प्रमाण ओळखण्यासाठी कापसाच्या झाडाला बुडापासून हलवून पाहावे, त्यामुळे बुडाच्या खालच्या पानावर असलेल्या किडी वरच्या भागात येतात. फवारणी करताना सकाळी अकरा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारवाजेपर्यंत करावी, त्यामुळे फवारणी योग्य वेळी होऊन किडीचे नियंत्रण होईल.

नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रातील तज्ज्ञ प्रा. ए. टी. पांडागळे यांनीही शेतकऱ्यांना कापूस पिकावर मार्गदर्शन केले. कपाशीवर लाल्या विकृती, तसेच दहिया रोग कशामुळे होतो याविषयी त्यांनी माहिती दिली. बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी, अन्नद्रव्य व्यवस्थापन संतुलित पद्धतीने करावे, असा सल्ला त्यांनी दिला. "ऍग्रोवन'च्या वतीने खुशाल कापसे, शिवराज देशमुख, खंदारे मामा, शंकरराव देशमुख, रामराव मोरे, प्रकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. "सकाळ'चे विक्रेते बळिराम नवघरे, जोशी तसेच सांगवी, चौकी, शिरूर येथील शेतकरी या वेळी उपस्थित होते. हनुमंत घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. "ऍग्रोवन'चे वितरण प्रतिनिधी सुनील पतंगे यांनी आभार मानले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: