Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

पाण्याचा प्रत्येक थेंब मुरवू या जमिनीची जलधारणाशक्ती वाढवू या
-
Saturday, July 28, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro planing
निसर्ग चक्रीकरणामध्ये पावसाचे प्रमाण, किंबहुना पाऊस पडण्याची तीव्रता, खंडता, लहरीपणा यामध्ये बदल दिसून येत आहे. पावसाअभावी वेळेवर पेरण्या करता येत नाहीत. अशा परिस्थितीत पूर्वनियोजन म्हणून जमिनीतील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा. यातून जमिनीची जलधारणाशक्ती वाढवून उपलब्ध ओलावा पुढील पिकासाठी फायदेशीर ठरतो.
डॉ. अजितकुमार देशपांडे, डॉ. अनिल दुरगुडे

गुरुत्वाकर्षणामुळे मुक्त पाण्याचा जमिनीतून निचरा झाल्यानंतर जमिनीतील सूक्ष्म पोकळ्यांमधील पृष्ठीत ताणामुळे जे पाणी मातीच्या कणांनी सैलसर धरून ठेवलेले असते, त्यास जमिनीची जलधारणाशक्ती म्हणतात किंवा केशाकर्षण पाणी म्हटले जाते. यामध्ये आंतरकेशिकाजल व बाह्यकेशिकाजल असे दोन प्रकार पडतात. बाह्यकेशिकाजल मातीच्या कणाने कमी वातावरणीय दाबाने (0.33 बार ते 15 बार) या दरम्यान जे पाणी धरून ठेवलेले असते, ते पाणी पिकांना सहजपणे उपलब्ध होऊन पिके शोषून घेतात; परंतु आंतरकेशिकाजल जास्त वातावरणीय दाबाने (16 बार ते 31 बार) या दरम्यान धरून ठेवलेले पाणी वनस्पतींना मंदगतीने उपलब्ध होते. म्हणजेच जमिनीच्या वाफसा (0.33 बार) अवस्थेपासून पीक सुकण्याच्या जलमर्यादेपर्यंत (15 बार) या दरम्यानच्या अवस्थेमधील फरकास उपयुक्त किंवा उपलब्ध असणारे पाणी म्हणतात. जलधारणाशक्ती ही जमिनीत असणारे सेंद्रिय कर्ब, जमिनीची खोली, उतार, मातीचा पोत, संरचना यावर अवलंबून असते. पाऊस पडल्यानंतर जमीन वाफशावर आल्यानंतर पिकाच्या वाढीच्या पुढील अवस्थेत जमिनीतील ओल खालच्या थरातून वरच्या थरात हळूहळू बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने मुळ्याच्या सान्निध्यात येते. त्याचा पिकांना फायदा होतो. हाच ओलावा टिकविण्याच्या पद्धतींचा अवलंब केला नाही, तर जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन बाष्पीभवनाद्वारे जमिनीतून ओलावा लवकर नष्ट होतो आणि पिकाच्या निकडीच्या अवस्थेत ओलावा कमी पडतो.

कोरडवाहू व बागायत क्षेत्रात जलधारणाशक्ती वाढविण्याच्या व नंतर साठविण्याच्या पद्धतींचा अवलंब -
अ) कोरडवाहू क्षेत्रात जलधारणा वाढविण्याच्या व ओलावा टिकविण्याच्या पद्धती
1) जमीन सपाटीकरण
2) समपातळीत मशागत व पेरणी
3) जमिनीची बांधबंदिस्ती (समपातळीत बांध, ढाळीचे बांध) करणे व आंतरबांध व्यवस्थापनामध्ये बंदिस्त वाफे तयार करणे, बंदिस्त सरी वरंबे तयार करणे, जैविक बांध इत्यादी.
4) शेणखतांचा शिफारशीप्रमाणे हेक्‍टरी पाच ते 10 टन जमिनीत मिसळावे.
5) हिरवळीच्या पिकांच्या कोवळ्या फांद्या जमिनीच्या वरच्या थरात मिसळाव्यात.
अशाप्रकारे उपाययोजनांचा अवलंब केल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरविण्यास मदत होऊन जमिनीची जलधारणाशक्ती वाढेल.

मुरलेले पाणी टिकवून ठेवण्याच्या पद्धती -
1) आच्छादनाचा वापर - शेतातील निरुपयोगी काडीकचरा, धसकटे, गवत, तुरकाड्यांचा वापर पीक उगवणीनंतर 15 दिवसांच्या आत दोन ओळींत जमिनीवर हेक्‍टरी पाच ते 10 टन पसरावे.
2) हेक्‍टरी रोपांची (1/3 संख्या) कमी करावी.
3) वारा प्रतिरोधकांचा वापर करावा.
4) पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, पाचव्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने व आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने कोळपणी करावी. या उपाययोजनांचा अवलंब केल्यास जलधारणाशक्तीतील ओलावा टिकवून ठेवण्यास व पिकास उपलब्ध होण्यात मदत होईल.

ब) बागायत विभागात जमिनीची जलधारणाशक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना
1) जमिनीची जलधारणाशक्ती वाढविण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचे प्रमाण शिफारशीप्रमाणे द्यावे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत.
2) जमिनीत विविध पिकांसाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा. जास्त नत्र खतांचा वापर टाळून माती परीक्षणाद्वारे खतांचा वापर करावा. कारण जास्त नत्र खतामुळे जमिनीमध्ये घट्टपणा येतो. स्फुरद व पालाश खतामुळे जमिनी भुसभुशीत होऊन पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
3) आच्छादनासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर करावा. पिकाच्या दोन ओळींमध्ये शेतातील टाकाऊ काडीकचरा, गव्हाचे काड टाकावे, तसेच खोडवा उसात पाचटाचे आच्छादन करावे. त्यामुळे ओलावा टिकून राहतो.
4) तणांचा पेरणीपासून 30 दिवसांच्या आत बंदोबस्त करावा.
5) तूर, कापूस यांसारख्या पिकांमध्ये बळिराम नांगराने पेरणीनंतर 30 दिवसांनी सरी पाडल्यास त्याचा पावसाचे पाणी अडवून जलधारणाशक्ती वाढविण्यास मदत होते. बाजरीसाठी पेरणी ही सरी वरंब्यावर केल्यास पडणारा पाऊस मुरल्याने जलधारणाशक्ती वाढते.
6) उभ्या असलेल्या फळबागा वाचविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे अथवा प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाचा वापर करताना वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शिफारस केलेली कीटकनाशक पावडर आच्छादनावर टाकावी. पडणाऱ्या पावसाचे पाणी जागीच मुरविण्यासाठी उतारास आडवे इंग्रजी "यू' आकाराचे वाफे झाडाभोवती बांधावेत, उभी लहान फळझाडे वाचविण्यासाठी मटका सिंचनाचा वापर करावा.
7) केळीमध्ये पाण्याचा ताण पडू नये म्हणून आच्छादनाचा वापर, तसेच बाजूने वारा प्रतिरोधक शेवरी, पांगारा इत्यादी झाडांची तटबंदीसाठी लागवड करावी.
8) आंतरमशागत वेळेवर करून हिरवळीच्या पिकांचा (सुबाभूळ/ गिरिपुष्पाचा) पाला तोडून दोन ओळींत आच्छादन करावे.
9) खोडवा उसात पाचटाचे आच्छादन करून पहारीने खते द्यावीत.
10) जमिनी क्षारपड असल्यास बाजूचे चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत, या वेळी शिफारशीत प्रमाणात जिप्समचा वापर करावा.
11) भाजीपाला पिकांसाठी सेंद्रिय खताचा शिफारशीप्रमाणे वापर करून ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा पिकाच्या वाढीप्रमाणे वापर करावा.
12) चोपण जमिनीमध्ये साखर कारखान्याची मळी कंपोस्ट खत हेक्‍टरी पाच ते 10 टनांप्रमाणे वापर करावा. हे खत उन्हाळ्यात नांगरटीअगोदर जमिनीत चांगले मिसळावे. यामुळे जमिनीची संरचना सुधारते, अतिरिक्त पाण्याचा क्षारांसह निचरा होतो. 


(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: