Last Update:
 
ऍग्रो गाईड

सीताफळाच्या बागेचे व्यवस्थापन कसे करावे?
-
Tuesday, July 31, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: agro guide

- कुणाल शेगोकर, बुलडाणा
बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. बागेत पडलेली पाने, रोगट फळे, झाडावरील काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. बागेतील मित्रकीटकांना हानी पोचणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.

झाडाचे खोड हे जमिनीपासून दोन फुटांपर्यंत पूर्ण रिकामे ठेवावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खोडावर बोर्डो मिश्रणाचा लेप द्यावा. बागेत खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष घ्यावे, दर्जेदार फळे मिळण्यासाठी ते गरजेचे आहे. सीताफळाची छाटणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. झाडांना योग्य वळण देण्याकरिता छाटणी गरजेची असते. छाटणी करताना जमिनीपासून दोन फुटांपर्यंतचे फुटवे काढून, त्याच्यावर चारी दिशांना फांद्या विखुरलेल्या छत्रीप्रमाणे ठेवाव्यात. बागेची उंची नऊ ते दहा फुटांपर्यंतच मर्यादित ठेवावी. जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्‍यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. सीताफळाच्या जुन्या झाडांवर "बांडगूळ' असेल, तर त्याचा फांदीसहित नायनाट करावा. सेंद्रिय खते, उपयुक्त जिवाणू, गरजेनुसार रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.

बागेस खते देण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे माती परीक्षणानुसार 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश द्यावे. नत्र खत हे दोन समान हप्त्यांमध्ये आणि स्फुरद तसेच पालाश ताण संपल्यानंतर किंवा पाणी देताना द्यावे. खते शक्‍यतो खोडापासून दूर आणि फांद्यांच्या परिघाखाली मातीमध्ये योग्य प्रकारे मिसळून द्यावीत. बागेस हिरवळीचे खत दिल्याने अधिक फायदा होतो; त्याकरिता खरीप हंगामात ताग, मूग, उडीद या पिकांची लागवड करावी. फुलोरा येण्याच्या अगोदर जमिनीत गाडून हिरवळीचे खत द्यावे.
सीताफळ बागेत पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. बागेत सतत ओलावा वाहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सूत्रकृमी व मर रोगाचा उपद्रव वाढू शकतो. उन्हाळी बहर येत असताना बागेभोवती व वाफ्यांच्या कडेने मका किंवा बाजरी पिकाची लागवड करावी. पीक फुलोऱ्यात असताना मधमाश्‍यांचे संगोपन करण्यावर भर द्यावा. शिफारशीत कीडनाशकांचाच वापर करावा.

उन्हाळी बहराचे पहिले पाणी जानेवारी ते मे या महिन्यात देण्यात येते. पाण्याची पहिली पाळी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत झाडांना नवीन पालवी फुटते. झाड फुलांनी बहरून जाते. उन्हाळी बहराची फळे जून ते ऑगस्टपर्यंत मिळतात. सदरच्या फळांना बाजारभाव चांगले मिळतात. बहराचे व्यवस्थापन करताना तापमान व पाण्याची उपलब्धता या दोन प्रमुख बाबींचा विचार करावा. सीताफळासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. उत्पादनामध्ये भरीव वाढ होते. फळांची प्रतवारी सुधारण्यास मदत होते. प्रति झाड पाण्याची मात्रा अनुभवानुसार जमिनीचा पोत, पीकवाढीची अवस्था, हवामान यानुसार बदल करावेत. जमीन नेहमी वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी द्यावे.

ठिबक सिंचनामधून विद्राव्य खते द्यावीत. त्यामुळे खतांचा प्रभावी वापर होतो व उत्पादनात, प्रतवारीत भरघोस वाढ होते. खतांचे वेळापत्रक माती परीक्षण अहवालाप्रमाणे असावे. उन्हाळी बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी प्रथम खोडावर व फांद्यांवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. रोगाची तीव्रता पडताळून 15 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या संपूर्ण झाडावर कराव्यात. पिठ्या ढेकणाच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खोडांची व फांद्यांची बहरापूर्वी स्वच्छता महत्त्वाची आहे. फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी. फळांची वेळीच विरळणी केली, तर फळांची प्रतवारी व वजनवाढीचा फायदा होतो. 

- डॉ. खैरे, 9423082397
अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, जि. पुणे


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: