Last Update:
 
ऍग्रो प्लस

आहारात हवी पौष्टिक ज्वारी
-
Wednesday, August 01, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro plus

ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
श्रीमती स्नेहलता गांगजी

ज्वारीची भाकरी ही आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे. जागतिक पातळीवर 23.4 दशलक्ष टन ज्वारीचा वापर मानवी आहारात केला जातो आणि 36.4 दशलक्ष टन ज्वारी जनावरांचे खाद्य म्हणून वापरात आणली जाते. विकसित देशात 0.2 दशलक्ष टन, तर विकसनशील देशात 23.2 दशलक्ष टन ज्वारी मानव आहारात आढळते. ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे. आजकाल लोकांमध्ये आहारात विविधता, पोषकता, दर्जाविषयी जागरूकता निर्माण झालेली दिसून येत आहे. म्हणून प्रक्रिया व्यवसायाला संधी आहे.

ज्वारीमधील अपौष्टिक, बुरशीजन्य विषारी घटक -
लाल ज्वारीत टॅनिन नावाचा घातक पांढऱ्या ज्वारीच्या तुलनेत जास्त असतो. फिनॉलिक्‍स, फायटिक ऍसिड (प्रथिनांच्या पचनास बाधक तसेच कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, झिंकचा दर्जा घसरवणारे) घटक असतात. ज्वारीच्या कणसांवर पावसामुळे फ्युजॅरियम तसेच ऍस्परजिलस बुरशीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या दाण्यावर ऍफ्लाटॉक्‍सिन तयार होऊन ज्वारी काळी पडते. ही काळी ज्वारी खाल्ल्यामुळे अनेक आजार उद्‌भवतात. परलर यंत्रामधून ज्वारी काढून घेतल्यास हे टॉक्‍सिन नाहीसे होते.

ज्वारीतील पोषणतत्त्वे (100 ग्रॅम ज्वारी) -
प्रथिने 10.4 ग्रॅम, स्निग्धांश 1.9 ग्रॅम, खनिजे 1.6 ग्रॅम, तंतुमय पदार्थ 1.6 ग्रॅम, कर्बोदके 72.6 ग्रॅम, ऊर्जा 349 किलो कॅलरीज, कॅल्शिअम 25 मिलिग्रॅम, फॉस्फरस 222 मिलिग्रॅम, लोह 4.1 मिलिग्रॅम.
जीवनसत्त्वे - जीवनसत्त्व अ (प्रिकर्सर) कॅरोटीन 47 मायक्रो मि.ग्रॅम, जीवनसत्त्व ब-1 (थायमिन) 0.37 कि.ग्रॅ., जीवनसत्त्व ब-2 (रायबोफ्लेवीन 0.13 मि.ग्रॅ., जीवनसत्त्व ब-3 (निअसिन) 3.1 मि.ग्रॅ. ब-6- 0.21 मि.ग्रॅ., फोलिक ऍसिड 20.0 मि.ग्रॅ.
खनिजे (मि.ग्रॅ.) - मॅग्नेशिअम 171, सोडिअम 7.3, पोटॅशियम 131, मॅंगेनीज 0.78, झिंक 1.6, सल्फर 54, क्रोमियम 0.008.
तित्काम्ले (अमायनो ऍसिड) ग्रॅम/ 100 ग्रॅम ज्वारीत ः अर्जीनाईन 240, हिस्टोडिन 160, लायसिन 150, ट्रिप्टोफेन 070, फिनाथलाऍलनाईन 300, ट्रायोसीन 180, मिथीओनाईन 100, सिस्टिन 090, थ्रिओनड्रिन 210, ल्युसिन 880, आयसोल्युसिन 270, व्हॅलिन 340.
इतर पोषक घटक - ऑकझॅलिक ऍसिड 10 मि.ग्रॅ., फायटीन 172 मि.ग्रॅ., रेबा 12.69 ग्रॅम.

ज्वारीचे फायदे -
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

संपर्क - 02584-288525
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, पाल, जि. जळगाव येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: