Last Update:
 
मुख्य पान

कमी दाबाच्या पट्ट्यावरच महाराष्ट्राची भिस्त
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, August 04, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: monsoon,   rain,   maharashtra,   drought

नवी दिल्ली - यंदा मॉन्सून देशभरात सरासरीपेक्षा कमी राहील. मात्र मधल्या काळात काही भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पावसाच्या कमतरतेचे प्रमाण 22 टक्‍क्‍यांवरून 19 टक्‍के एवढे खाली आले आहे. दरम्यान, जूनपासूनच दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्रात पावसाची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पाऊस चांगला राहील. एक-दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यास त्याचा चांगला फायदा महाराष्ट्राला होऊ शकतो, असे हवामान खात्याने सुधारित अंदाजात म्हटले आहे.

शेती हंगामासाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) लपंडावामुळे तीन वर्षांनंतर दुष्काळसदृश स्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल. परंतु सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस कमी होईल, असा अंदाज आहे. "अल निनो'च्या परिणामाचा फटका भारतीय मॉन्सूनला बसण्याची भीती आहे. एकूणच नैर्ऋत्य मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण कमीच राहील. असे चित्र आहे. 

""सद्यःस्थितीत पावसाच्या एकूण दीर्घकालीन सरासरीनुसार यंदा 90 टक्के पाऊस होईल, असे ताज्या आढाव्यातून निष्पन्न झाले आहे.''
- डॉ. लक्ष्मणसिंग राठोड, महासंचालक, हवामान खाते

"अल निनो' हा मध्य प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह असून, त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान -----05.----- ते 07 अंश सेल्सिअसने वाढते. त्याचा थेट प्रतिकूल परिणाम भारतीय मॉन्सूनवर होतो. यामुळे सुरवातीपासूनच देशभरात 22 टक्के पाऊस कमी झाला होता. मधल्या काळात काही भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पावसाच्या कमतरतेचे प्रमाण 22 टक्‍क्‍यांवरून 19 टक्‍के एवढे खाली आले आहे. मात्र ही परिस्थिती 2002 च्या दुष्काळासारखी असल्याचे निरीक्षणही हवामान खात्याने नोंदविले आहे. जूनपासूनच पाऊस लांबल्यामुळे ईशान्य भारतात 11 टक्के, वायव्य भारतात 36 टक्के, मध्य भारतात 15 टक्के आणि दक्षिण भारतात 24 टक्के तुटवडा आहे. देशभरात अपेक्षित 471.4 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 378.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हरियाना, पंजाब, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य कर्नाटक या भागातील पावसाची स्थिती चिंताजनक होती. एक जून ते 19 जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये तर अनुक्रमे 39 टक्के, 29 टक्के आणि 20 टक्के असे लक्षणीय प्रमाण पाऊस टंचाईचे होते. आता या तीनही भागांतील स्थिती सुधारली असून, या महिन्यात चांगला पाऊस राज्यात अपेक्षित आहे. एक दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यास राज्यात दमदार पाऊस होऊ शकतो, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, सूत्रांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या दडीचा भाताला फारसा धोका नाही. मात्र ज्वारी, बाजरी, मक्‍यासारख्या भरड धान्यावर, भुईमुगासारख्या तेलबियांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सूर्यफूल, सोयाबीन, मूग यासारख्या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांद्वारे भरड धान्याची भरपाई केली जाऊ शकते. कापसासाठी सध्याचा पाऊस कमी असला तरी अधिक पावसामुळे या पिकाला किडीचा धोका असतो, या कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: