Last Update:
 
मुख्य पान

तूर, मूगडाळीच्या आधारभूत किमतीत वाढ
- सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: new delhi,   msp,   agriculture,   agrowon
नवी दिल्ली- तूर आणि मूगडाळीच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) अनुक्रमे साडेसहाशे आणि नऊशे रुपयांनी घसघशीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या (सीसीईए) आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. ही किंमत 2012-13 या वर्षासाठी असेल.

यापूर्वी तूरडाळीसाठी तीन हजार 850 रुपये प्रतिक्विंटल, तर मूगडाळीसाठी चार हजार 400 रुपये प्रतिक्विंटल, अशी किमान आधारभूत किंमत ठरविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना डाळींचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, डाळींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी आधारभूत किंमत वाढविण्यात आली. "सीसीईए'च्या निर्णयानुसार, तूरडाळीसाठी "एमएसपी' साडेसहाशे रुपयांनी, तर मूगडाळीसाठी "एमएसपी' नऊशे रुपयांनी वाढविण्यात आली.

"एअर इंडिया'साठी "बोइंग' विमाने
"एअर इंडिया' या सरकारी विमान कंपनीसाठी "बोइंग' कंपनीकडून "बी-787' जातीच्या 27 विमाने खरेदीस "सीसीईए'ने हिरवा कंदील दिला आहे. "एअर इंडिया'ने यासाठी "बोइंग'बरोबर केलेल्या करारानुसार, सप्टेंबर 2008 ते ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत हा ताफा टप्प्याटप्प्याने ताब्यात देणे अपेक्षित होते. परंतु, विमानांचा आराखडा आणि उत्पादन, यामध्ये झालेल्या विलंबामुळे जून 2012 ते मार्च 2016 अशा चार वर्षांमध्ये हा ताफा "एअर इंडिया'च्या सेवेत रुजू होईल. मात्र, हा कालावधी वाया गेल्यामुळे "विलंब शुल्क करार' करणे "एअर इंडिया'साठी बंधनकारक असेल.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: