Last Update:
 
मुख्य पान

साखरनिर्यातीला कारखान्यांचा नकार!
भागा वरखडे
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: nagar,   sugar factory,   export
देशांतर्गत बाजाराच्या तुलनेत कमी भाव; महिन्यात सातशे रुपयांनी वाढ

नगर - गेल्या दीड महिन्यात साखरेच्या भावात सरासरी सातशे रुपयांनी वाढ झाल्यामुळे आता निर्यात कोट्यातील साखर विक्री करायलाही कारखाने तयार नाहीत. सुमारे पन्नास हजार टन निर्यातीचा साखर पडून आहे.

देशात साखरेचे उत्पादन जादा झाल्यामुळे साखरनिर्यातीचा दबाव वाढत होता. केंद्र सरकारने निर्यातीचा निर्णय घ्यायला उशीर केला. त्यानंतर 40 लाख टन साखरनिर्यातीचा निर्णय घेतला. त्यातील निम्मी साखर निर्यात झाली आहे. ब्राझील व ऑस्ट्रेलियातून निर्यात कमी होत आहेत. पावसामुळे निर्यात होत नव्हती. मध्यंतरी 660 डॉलर प्रति टनांपर्यंत भाव वाढले होते; परंतु आता ते 621 डॉलर प्रति टनांपर्यंत आले आहेत. भारतात साखर उत्पादनाची राज्ये म्हणून ओळख असलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांवर दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रात तर आतापर्यंत सव्वा कोटी टन ऊस चाऱ्यासाठी गेला आहे. आणखी 25-30 लाख टन ऊस चाऱ्यासाठी जाईल, असा अंदाज आहे. अजूनही पाऊस समाधानकारक नाही. धरणांतील पाणीसाठे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गळितासाठी ऊस किती राहील, याबाबत साशंकता आहे. निम्मेही कारखाने गळीत करू शकणार नाहीत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमुळे साखर उत्पादनात सुमारे 35 लाख टनांपर्यंत घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
साखर उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज, केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी सुरवातीला कमी जाहीर केलेला कोटा आणि बाजारातील मागणी यामुळे गेल्या दीड महिन्यात साखरेचे भाव सुमारे सातशे रुपयांनी वाढले आहेत. साखर व्यापारी महावीर दगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जूनला साखरेचा भाव 2950 रुपये प्रति क्विंटल होती. शुक्रवारी निघालेल्या निविदांत मध्यम प्रतीच्या एम-30 साखरेला 3710 रुपयांपर्यंत भाव मिळाला. साखरेचे वाढत असलेले भाव पाहून केंद्र सरकारने आणखी दोन लाख 66 हजार टन साखर खुली केली. वायदे बाजारावर बंधने आणण्याचे सूतोवाच केले; परंतु साखरेच्या भावातील वाढीला लगाम बसत नाही. 2005-06 सारखी स्थिती निर्माण होत आहे.

जागतिक बाजारात साखरेला 621 डॉलर प्रति टन भाव आहे. त्यात वाहतुकीचा खर्च वजा केला, तर साखरेला 3350 रुपये भाव पडतो. सध्या देशांतर्गत बाजारात 3700 रुपयांच्या आसपास भाव मिळत असताना साडेतीनशे रुपये तोटा सहन करून निर्यातीच्या भानगडीत पडायला साखर कारखानदार तयार नाहीत. महाराष्ट्राला निर्यातीचा जास्त कोटा आला आहे. कोट्याप्रमाणे साखर निर्यात करण्यास कारखानदार तयार नाहीत. जागतिक बाजारात साखरेला 750 डॉलर प्रतिटन भाव किंवा देशांतर्गत बाजारातील भावात घट यापैकी एक निर्णय झाल्याशिवाय निर्यात होऊ शकणार नाही. वाहतूक अनुदान व अन्य अनुदान दिले व देशांतर्गत भावाच्या बरोबरीने साखर विकली गेली, तरच कारखाने निर्यातीला अनुकूल प्रतिसाद देतील.

कोटा पद्धतीत बदल
भावांतील वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने पूर्वीच्या कोटा पद्धतीत बदल केला आहे. पूर्वी कोट्याच्या 25 टक्के साखर दर महिन्याला व उरलेली साखर केव्हाही विकता येत होती. आता पहिल्या दोन महिन्यांत सत्तर टक्के व उर्वरित तीस टक्के तिसऱ्या महिन्यांत विकता येईल.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: