Last Update:
 
मुख्य पान

इस्राईलची केळी उत्पादनात क्रांती
डॉ. राजेंद्र सरकाळे
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: israel,   banana,   agrowon
केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेताजवळच प्रतवारी, पॅकिंग, प्रीकूलिंग करण्याची सुविधा असते. मागणीनुसार केळी पिकविता यावीत म्हणून अद्ययावत पीकवणगृहाची उभारणी केली आहे. योग्य व्यवस्थापनामुळे इस्राईलच्या केळीला स्थानिक ठिकाणी प्रति किलो दोन शकेल (म्हणजे 28 रुपये), तर निर्यातक्षम केळीस प्रति किलोला चार शकेल (म्हणजे 56 रुपये) एवढा दर मिळतो. येथील शासनाने शेतकऱ्यांना विम्याची सुविधा दिलेली आहे.

अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही इस्राईलमधील एका केळी आणि आंबा उत्पादनातील अग्रगण्य कंपनीला भेट दिली. इस्राईलमधल्या उत्तर भागात सुमारे 1000 हेक्‍टर क्षेत्रावर कंपनीचे फार्म आहेत. या ठिकाणी विविध विषयांतील 10 तज्ज्ञ आणि 50 कामगार उत्पादन, तंत्र संशोधनाचे गेली 20 वर्षे अव्याहतपणे काम करीत आहेत. प्रति एकरी उत्पादकता, दर्जा आणि प्रक्रियेच्या माध्यमातून फळबाग लागवड अत्यंत किफायतशीर होत असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. या देशात फक्त पाण्याचे दुर्भिक्ष नाही, तर सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती आहे. एकूण जमीन क्षेत्रापैकी 50 टक्के वाळवंट, तर लागवडीखाली फक्त 20 टक्के जमीन तीही डोंगरदऱ्यातील व बहुतांशी जमिनी हलक्‍या स्वरूपातील, भारी जमिनी आपणास अभावानेच पाहावयास मिळतील. त्यामुळे पाण्याच्या काटेकोर नियोजनाबरोबर जमीन सुधारणा कार्यक्रम शासनाने व्यापक प्रमाणात हाती घेतला आहे आणि म्हणून या देशातील वाळवंटात टोमॅटोही पिकतात आणि चुनखडीच्या जमिनीत वाढवलेला आंबाही दिसतो. हे संशोधन इस्रायली तंत्रज्ञानाच्या संशोधनाची उच्चतमता सिद्ध करते. या देशात विद्यापीठात किंवा प्रयोगशाळेत जे संशोधन केले जाते त्याच्या पाच वर्षे प्रत्यक्ष शेतात चाचण्या घेतल्या जातात आणि मग ते संशोधन आणि वाण प्रसारित केले जातात. विद्यापीठातील संशोधन शेतकरीभिमुख असल्याने विद्यापीठांच्या निष्कर्षावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्‍वास आहे.

फळ उत्पादक संघातून क्रांती ः
इस्राईलमध्ये प्रत्येक फळपिकाचे संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये उत्तम प्रकारे समन्वय असून, शासन त्यांच्या सूचनांची त्वरित दखल घेते. या संघामध्ये शेतकरी, शास्त्रज्ञ व शासनाचा प्रतिनिधी सदस्य असल्याने उत्पादनात येणाऱ्या अडचणी, विक्री व्यवस्था, प्रक्रिया याबाबत सातत्याने साधकबाधक चर्चा होत असते. शेतकरी आणि संघाने दिलेल्या अहवालावर शासन, संशोधन संस्था गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे इस्राईलमधील फळबाग व्यवसाय सर्व बाबतीत आदर्श समजला जातो.

केळी आणि आंब्याच्या विविध जाती व लागवडीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही किनरेट कंपनीस भेट दिली. कंपनीचे शास्त्रज्ञ श्री. हनन म्हणाले, ""आम्ही केळी उत्पादनात व तंत्रात अतिशय नेत्रदीपक असे कामकाज करीत आहोत. आम्ही टिश्‍युकल्चर तंत्राने केळीची रोपे विकसित करत असल्याने उत्पादनाचा दर्जा एकसारखा आणि उच्च दर्जाचा असतो. टिश्‍युकल्चर तंत्राने केळीची रोपे तयार करण्यापूर्वी केळीच्या मातृवृक्षाचा पाच वर्षे अभ्यास करतो. मातृवृक्ष सर्व चाचण्यांत परिपूर्ण आढळल्यानंतरच मातृवृक्षाच्या कोंबाचा रोपेनिर्मितीसाठी वापर केला जातो. या चाचण्यांमध्ये प्रामुख्याने उत्पादकता, रोग व किडीस प्रतिकारक्षमता, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, थंड वातावरण व वाऱ्याच्या जादा वेगाची वहनक्षमता सहन करण्याच्या चाचण्यांचा समावेश होतो. उतिसंवर्धन तंत्राने रोपे विकसित करण्यासाठी प्रक्षेत्रावर अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारली असून, प्रयोगशाळेत रोपांच्या निर्मितीबरोबर संशोधन व विकासाचे कामकाज केले जाते. जिनोसर कंपनीत टिश्‍युकल्चर तंत्राने विकसित झालेल्या रोपांचे दोन महिने नेट हाऊसमध्ये हार्डनिंग केले जाते आणि रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात.

उतिसंवर्धित तंत्राने विकसित केलेली रोपे अत्यंत दर्जेदार व उत्पादनक्षम असल्याचे कारण म्हणजे स्थानिक मातृवृक्ष येथील प्रतिकूल परिस्थितीतही एकरूप झालेले असतात, तसेच उतिसंवर्धन रोपेनिर्मितीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान यामुळे येथील कंपनीच्या रोपांची जगभर विक्री वाढत आहे. इतर देशांतून आयात केलेल्या रोपांच्या मातृवृक्षाचे कोंब उतिसंवर्धित उत्पादनासाठी घेतले जात नाहीत. कोणतेही रोप, कलम, बियाणे इस्राईलमध्ये पाठवायचे झाल्यास विमानतळावर विविध चाचण्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे इतर देशांतून रोग किंवा किडींचा देशात शिरकाव होणे जवळपास अशक्‍यच.

केळी लागवडीचे तंत्र
किनरेटचा तलावाच्या भागात इतर भागांच्या तुलनेत ठिकाणची जमीन तुलनेने सुपीक व पावसाचे प्रमाण 700-800 मि.मी. असले तरी उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानात प्रचंड तफावत आहे. कधी कधी उन्हाळ्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत, तर हिवाळ्यात दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. अशा प्रतिकूल परिस्थितीत एखादी जात विकसित करायची म्हणजे शास्त्रज्ञांची कसोटी असते. शास्त्रज्ञांची सूक्ष्म निरीक्षणे व संशोधन, मातृवृक्षाची निवड, प्रतिकूल हवामान सहन करणाऱ्या आणि रोग व कीड प्रतिकारक उतिसंवर्धित रोपांची निर्मिती केल्याने त्यांना एकरी सरासरी 50 टनांपर्यंत उत्पादन घेणे शक्‍य झाले आहे.

या देशातील केळीची लागवड ही किनरेट तलावाच्या परिसरात म्हणजे उत्तरेकडे जास्त पाऊस पडणाऱ्या व तुलनेने सुपीक असलेल्या भागात आहे. केळीची लागवड करण्यापूर्वी एकदा शेतीची मशागत करतात. हेक्‍टरी 80 टन कंपोस्ट खत तीन टप्प्यांत विभागून दिले जाते. त्यामध्ये 40 टन कंपोस्ट खत मशागतीच्या वेळी मातीत सारख्या प्रमाणात मिसळतात. उर्वरित 20 टन कंपोस्ट खत लागणीच्या वेळी व 20 टन लागवडीनंतर सहा महिन्यांनी दिले जाते. याउलट आपणाकडे केळीसाठी फक्त हेक्‍टरी 40 टन कंपोस्ट खत दिले जाते. ब्रॅण्ड नैन आणि विल्यम्स या केळीच्या जातीची इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. केळी पिकास सेंद्रिय खताबरोबर विद्राव्य रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात पुरवठा केला जातो. काही ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने केळी लागवड केल्याचे आढळून आले. केळी बागेस हेक्‍टरी 400 कि. नत्र, 80 कि. फॉस्फरस व 120 कि. पोटॅशची मात्रा दिली जाते. नायट्रोजनची मात्रा घड तयार होईपर्यंत विभागून दिली जाते. आपणाकडे घड तयार होईपर्यंत मात्रा दिली जात नाही.

केळीसाठी दोन रोपांमधील लागवडीचे अंतर 1.5 मीटर व दोन ओळींतील अंतर 2.8 मीटर ठेवून एकरी रोपांची संख्या कमी म्हणजे सुमारे 1000 ठेवली जाते. कमी अंतर, नियंत्रित वाढ व जास्तीत जास्त दर्जेदार उत्पन्न ही इस्राईलच्या फळबाग उत्पन्नाची त्रिसूत्री आहे. आपल्या देशाच्या तुलनेत तेथे केळी अंतर जास्त ठेवले जाते. कारण इतर पिकांप्रमाणे केळीच्या पानांची रचना विशिष्ट व वेगळी असल्याने या पिकांची छाटणी केली जात नाही. त्यामुळे या पिकाचा विस्तार रोखता येत नाही, तसेच केळीच्या लांब व रुंद पानांना जास्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून अंतर जास्त ठेवले जाते. केळीची लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात दोन रोपे लावतात. ही झाडे पूर्ण वाढ होईतो खालून दोन कोंब येऊ देतात. वाढलेल्या केळीची काढणी केल्यावर त्या झाडाचे जमिनीलगत कापणी करतात. त्यानंतर कोंब जोमात वाढू लागतात. पुन्हा त्याच्या सोबतीला दोन कोंब येऊ देतात. असे चक्र अव्याहतपणे चालू राहते. अशा प्रकारे 10 वर्षे सलगपणे उत्पादन घेतले जाते. आपल्याकडे मात्र लागवडीपासून फक्त दोन ते तीन वेळा उत्पादन घेतले जाते.

केळीची लागवड केल्यानंतर नऊ ते दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घड तयार व्हायला सुरवात होते. साधारण 12 ते 13 महिन्यांत केळीचे उत्पादन मिळते. सरासरी प्रति घडाचे वजन 60 किलो असून, काही किबूत्झमधील शेतकरी 80 किलोपर्यंत घडाचे उत्पादन घेतात. घडाच्या वजनाने किंवा झाडाच्या उंचीमुळे, वाऱ्यामुळे झाड पडू नये म्हणून झाडाच्या वर तीन फूट सलग ओळीत तारा बांधल्या जातात. तारांना दोर बांधून झाडांना व घडाला आधार दिला जातो. झाडावरील तार घट्ट राहावी म्हणून ओळीमध्ये सुमारे 20 फूट अंतरावर लोखंडी खांब उभे केले जातात. बागेत तण येऊ नये म्हणून व पाण्याचे पृष्ठभागावरून बाष्पीभवन होऊ नये म्हणून ओळीमध्ये लाकडाचा भुसा टाकला जातो. शेतीस जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला जातो. इस्राईल शेतकऱ्यास सरासरी एकरी सुमारे 40 ते 50 टनांप्रमाणे 10 ते 12 वर्षे सलग उत्पन्न मिळते. उत्पादनातील व दरातील विविधता लक्षात घेता शेतकरी केळीपासून निव्वळ सहा ते सात लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

केळीस पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक ओळीत दोन लॅटरल्स व इनलाईन पद्धतीने दिवसातून तीन वेळा पाणी दिले जाते. मातीतील आर्द्रता व पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी मातीत टेन्शोमीटर बसविले आहेत. मातीतील आर्द्रता व पाण्याचे प्रमाण समजल्याने बाहेरून झाडांना किती पाणी द्यायचे, पाण्याचे वितरण किती ठेवायचे हे ठरविले जाते. यामुळे पिकांना पाहिजे तेवढे पाणी देणे शक्‍य होते. टेन्शोमीटर, पाणीपुरवठा, विद्राव्य खते देण्याची पद्धत या सर्व बाबी संगणकाला जोडल्या असल्याने सर्व माहिती संगणक संकलित करतो. साहजिकच शेतकऱ्यास वेळच्या वेळी निर्णय घेणे सोपे होते.

निर्यातीसाठी लांब केळ्यांना मागणी नसल्याने केळ्याचा आकार मध्यम ते लहान ठेवून केळ्याची युरोप व अमेरिकेत निर्यात केली जाते. केळीवर कसल्याही प्रकारचा डाग नसतो. फळे रोग व कीडमुक्त असतात. अति थंडी, अति वारा, तीव्र उन्हापासून केळीचे संरक्षण व्हावे म्हणून केळी बागेच्या बाजूला सहा मीटर उंचीपर्यंत नायलॉन नेट बसविली जाते. नेट बसविण्याचा एकरी दोन लाख एवढा खर्च येतो. केळी घडांचे अति थंडी, उन्हाची तीव्रता, कीड व रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून चंदेरी रंगाचा 40 मायक्रॉन क्षमतेच्या स्कटिंग पेपरने आच्छादला जातो. वरील बाबींची कमी तीव्रता असल्यास केळ्यांचा घड निळ्या रंगाच्या 20 मायक्रॉन क्षमतेच्या स्कर्टिंग पेपरने आच्छादला जातो. केळी बागेच्या कडेने बसविलेले नेट घडाचे ऊन, वारा, उष्णतेपासून संरक्षण करते. शासन फळबाग लागवडीसाठी अनुदान देत नाही. मात्र उत्पादनवाढीच्या दृष्टीने नवीन तंत्राचा स्वीकार केल्यास चालना देण्याच्या उद्देशाने सरकार 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देते. केळी नेट हाऊससाठी शासन 25 टक्के अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यास मदत करते.

केळीची प्रतवारी, पॅकिंग, प्रीकूलिंग करण्यासाठी शेताच्या जवळच प्रतवारी, पॅकिंग आणि शीतकक्षाची उभारणी केलेली आहे. केळी मागणीनुसार पिकविता यावीत म्हणून अद्ययावत पीकवणगृहाची उभारणी केली आहे. कच्च्या केळ्यापासून विविध उपपदार्थ तयार करून केळ्याचे मूल्यवर्धन वाढविले जाते. योग्य व्यवस्थापनामुळे इस्राईलच्या केळीला स्थानिक ठिकाणी प्रति किलो दोन शकेल (म्हणजे 28 रुपये), तर निर्यातक्षम केळीस प्रति किलोला चार शकेल (म्हणजे 56 रुपये) एवढा दर मिळतो. चुकून अति थंडी, अति उष्णता, कीड-रोग किंवा वादळाने केळी बागेचे नुकसान झाल्यास शासनाने शेतकऱ्यास विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: