Last Update:
 
मुख्य पान

राज्यावरील संकट '72' पेक्षाही मोठे!- शरद पवार
- (प्रतिनिधी)
Sunday, August 05, 2012 AT 12:30 AM (IST)
Tags: sharad pawar,   draught,   ncp,   rain,   mumbai,   maharashtra
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यापुढे "मिशन दुष्काळ'

मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यासमोरील सध्याचे संकट हे सन 1972 च्या दुष्काळापेक्षाही मोठे आहे. या संकटकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढील काही महिने मिशन दुष्काळ हेच ध्येय ठेवून सरकारी योजना आणि संकटग्रस्तांमध्ये दुवा म्हणून काम करावे, असे स्पष्ट निर्देश पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवार (ता. 4) येथे दिले.

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्यावर ओढवलेल्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शनिवारी (ता. 4) दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य, खासदार, आमदार तसेच जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. परिषदेत राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अजूनही गंभीर स्वरूपाची आहे. अशा संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्षांकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी पक्षाध्यक्ष पवार यांनी उपस्थितांना दुष्काळासंदर्भातील करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

कृषिमंत्री पवार म्हणाले, ""सध्याच्या घडीला जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच जनावरांना वाचवणे आणि शेती तगवणे अशा आव्हानांची मालिकाच राज्यासमोर उभी ठाकली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतील पावसाने काही ठिकाणची परिस्थिती सुधारली असली तरी अजूनही जायकवडी, उजनीसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. या धरणांवर शेतीच नव्हेतर मोठी शहरेही अवलंबून आहेत. पावसाळ्याच्या पुढच्या दोन महिन्यांतही पाऊस समाधानकारक होईल याची शाश्‍वती नाही. त्याची काळजीसुद्धा आतापासूनच घ्यावी लागणार आहे. राज्यासमोरील हे संकट अतिशय गंभीर स्वरूपाचे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढील तीन ते चार महिने इतर सर्व कामे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करणे हेच एकमेव ध्येय ठेवावे.''

राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर यासंदर्भातल्या उपाययोजना सुरूच राहतील, पण स्थानिक पातळीवर सहकारी संस्था, नगरपरिषदा आणि जमेल तेथे लोकसहभागातून काही उपाययोजना करता येतात का ते पाहावे. पाण्याचे टॅंक आणि कमतरता असलेल्या ठिकाणी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून द्यावेत. दुष्काळाचे हे संकट टळेपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि संकटग्रस्तांमध्ये दुवा म्हणून काम करावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी दिली.

गुजरात सरकारने शेततळी आणि सिमेंट बंधारे बांधणीच्या कामावर अधिक भर दिल्याचे सांगून त्यांनी त्या ठिकाणी झालेल्या जलसंधारणासंदर्भातील कामाचाही उल्लेख या वेळी केला.

-------------------------------------------------------
"केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला राज्य सरकारने दिलेला आराखडा योग्य आहे. यानुसार कार्यवाही झाली तर राज्यात दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता येईल.''
- शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री
-------------------------------------------------------


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: