Last Update:
 
मुख्य पान

स्वतंत्र विचारांची 'भन्नाट भानू'
विनायक लिमये
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
मराठीतील गौरी शिंदे आज श्रीदेवीला घेऊन हिंदी चित्रपट निर्माण करत आहे. त्यापूर्वी अन्य काही महिलांनी चित्रपट निर्मितीचे प्रयोग केले. मराठीत आणि हिंदीत स्त्रियांनी चित्रपट निर्मिती करण्याची गोष्ट आता नवी राहिलेली नाही; पण 35 वर्षांपूर्वी अशी गोष्ट होणे, हे खूप वेगळं होतं. तेसुद्धा वयाची विशीदेखील पार केलेली नसताना एखाद्या तरुणीने चित्रपटाची निर्मिती करणे, हे कोणालाही आश्‍चर्यचकित करणारंच होतं. पण, सुषमा शिरोमणी या युवतीने ते धाडस केलं आणि सलग सहा चित्रपट सुवर्णमहोत्सवी करून दाखवले.

"आली आली रे भन्नाट भानू ...' हे गाणं त्या वेळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. पडद्यावर "भन्नाट भानू'ची, अर्थात सुषमा शिरोमणीची एन्ट्री झाली, की चित्रपटगृहातून शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडत असे. अमिताभ बच्चन रुपेरी पडद्यावर जे काही करत असे, त्याची मराठी आवृत्ती म्हणजे सुषमा शिरोमणी यांची भूमिका असे. गुंडांना एकहाती लोळवणारी ही तरुणी प्रेक्षकांना आवडत असे. अशी स्टंट कामे करणाऱ्या अभिनेत्री यापूर्वी झाल्या नव्हत्या असे नाही, हिंदीत खूप वर्षांपूर्वी असे प्रयोग झालेले होते; पण सुषमा शिरोमणी यांनी गावातील साधी सरळ मुलगी कणखरपणे वावरते हे दाखवून दिले होते.

सुषमा शिरोमणी आता सगळ्यांना माहीत झाल्या आहेत, ते चित्रपट निर्मात्यांच्या "इम्पा' या राष्ट्रीय संघटनेतील वादानंतर. या वादात सुषमा शिरोमणी यांनी जी खंबीर आणि कणखर भूमिका घेतली आहे त्याबद्दल अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे; पण सुषमा शिरोमणी यांची ज्यांना माहिती आहे, त्यांना यात नवीन काही वाटणार नाही. सुषमाताई जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या, त्या वेळी सगळीकडे पुरुषांचाच दबदबा होता. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्या वेळी कलाकारांना लागेल असे बोलत असत, चित्रपट काढून बघा, मग समजेल काय करावं लागतं ते! अनेकांची अशी बोलणी ऐकून सुषमाताईंनी चित्रपट निर्मितीचा घाट घातला. "तेवढं सोडून बोला' या चित्रपटाची निर्मिती केली आणि स्वतःच्या हिमतीवर त्याचं वितरणही केलं. या चित्रपटामुळे सुरवात तर झाली; पण सुषमाताईंना खरी ओळख मिळाली ती "भिंगरी' या चित्रपटामुळे. त्यानंतर त्यांनी "फटाकडी', "मोसंबी नारंगी', "भन्नाट भानू' या चित्रपटांची निर्मिती केली. हे सारे चित्रपट यशस्वी झाले. निळू फुले, श्रीराम लागू, विक्रम गोखले आदी नामवंतांनी सुषमाताईंच्या चित्रपटांत काम केले होते. निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा अशी चौफेर कामगिरी सुषमाताईंनी पार पाडली होती.

सुषमाताईंना खरं तर घरातून कोणाचाही पाठिंबा नव्हता. त्यांच्या घरात चित्रपटाचं किंवा नाटकाचं वातावरणही नव्हतं; पण चित्रपटांची आवड हा सुषमाताईंसाठी महत्त्वाचा मुद्दा होता. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कथ्थकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या चित्रपटांकडे वळल्या. राजा परांजपे यांनी त्यांना "गुरुकिल्ली' या चित्रपटात पहिली संधी दिली. या चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य केलं, या लावणी नृत्याची खूप जणांनी प्रशंसा केली. त्यांचं हे लावणी नृत्य बघून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना "पवनाकाठचा धोंडी' या चित्रपटात दोन लावण्या करण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर सुषमाताईंनी मागे वळून पाहिलंच नाही. स्वतःची निर्मिती असो की बाहेरच्या निर्मात्याकडे काम करणे असो, त्यांची घोडदौड जोरात सुरू होती.

- मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर त्यांनी मग हिंदीत दोन चित्रपट निर्माण केले. "प्यार का कर्ज' आणि "कानून' या चित्रपटांची निर्मिती केली. मराठी चित्रपटात हिंदीतील नामवंत कलाकार एखाद्या गाण्यात सहभागी करून घेण्याची क्‍लृप्ती सुषमाताईंनी वापरली होती. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अशी जोडी सहभागी व्हायची, लोकांनाही त्याची सवय लागली होती. स्वबळावर "इम्पा' या संघटनेच्या तीन वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला होता. मराठीत आपली चतुरस्र ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री खरोखरच वेगळी आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: