Last Update:
 
संपादकीय

दूध धंदाही घाट्यात
-
Monday, August 06, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: editorial
दुधाला अद्यापही जोडधंदा म्हणून संबोधले जाते, पण ते खरे नाही. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो आता मुख्य धंदा बनला आहे. दोन दुभती जनावरे घरी असली तरी दुधाच्या ताज्या पैशावर त्यांचा संसार चालत असतो.

जूनच्या प्रारंभापासून राज्यात असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे पशुधनालाही फटका बसला आहे. वरवर ही बाब फारशी गंभीर वाटत नसली तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बदलता प्रवाह पाहता त्याचे मोठे परिणाम नजीकच्या काळात सोसावे लागणार आहेत. दूध व्यवसाय आक्रसल्याने ग्रामीण भागाची क्रयशक्तीच कमी होणार आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील चलनवलनावर होणे क्रमप्राप्तच आहे. दुधाला अद्यापही जोडधंदा म्हणून संबोधले जाते. पण ते खरे नाही. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो आता मुख्य धंदा बनला आहे. दोन दुभती जनावरे घरी असली तरी दुधाच्या ताज्या पैशावर त्यांचा संसार चालत असतो. शेतीतून काही चांगले निघेल आणि निघाले तरी त्याला चांगला भाव मिळेल याची कसलीच शाश्‍वती नसते. शिवाय शेतीचा पैसा हंगामाअखेरीस पीक निघाल्यावरच मिळत असल्याने दैनंदिन खर्चासाठी शेतकऱ्याची भिस्त दुधाच्या पैशावरच असते. यंदा दूधही शेतकऱ्याच्या संसाराला हात देऊ शकणार नाही हे वास्तव पचवणे तसे कठीणच आहे.
गतवर्षी परतीचा पाऊस झाला नाही. त्याचबरोबर यंदाही पावसाने मुहूर्तालाच अपशकून दाखवला. त्यामुळे चारा पिके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकली नाहीत. माणदेशाचेच उदाहरण घ्यायचे ठरवले तर तेथे दरवर्षी शक्‍यतो परतीच्या पावसातच ज्वारी, बाजरी ही पिके घेतली जातात. ती गतवर्षी पावसाअभावी खुरटल्याने तिथला चाऱ्याचा प्रश्‍न या वर्षाच्या आरंभापासूनच गंभीर बनला. त्यामुळे पहिली चारा छावणी एप्रिलमध्येच सुरू करावी लागली. साहजिकच या स्थितीचा परिणाम दुग्धोत्पादनावर झाला. संतुलित आहाराअभावी जनावरांची आबाळ होऊ लागली. सांगली जिल्ह्यात चारा डेपोवरून पुरवला जाणार ऊस सातत्याने खायला घातल्याने काही जनावरे दगावलीही. काही चारा छावण्यांतील जनावरांची अवस्था चांगली असली तरी अनेक छावण्यांत पोटे खपाटीला गेलेली जनावरे दिसतात. अन्य पशुपालकांच्या जनावरांचीही अवस्था कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. म्हणूनच राज्यातील दुग्ध उत्पादन दोन महिन्यांत 45 लाख लिटरने घटले आहे. जनावराची दूध उत्पादकताच घटल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणिते पार कोलमडणार आहेत. येणारा सणासुदीचा काळ कसा निभवायचा याची चिंता शेतकऱ्याला भेडसावते आहे. गेल्या आठवडाभरात पाऊस चांगला झाला असला तरी अनेक भागांत त्याचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न आणखी महिनाभर तरी गंभीरच राहणार असल्याचे दिसते. पुढच्या काळासाठी जनावरे जगवणे, त्यांची फार आबाळ होऊ नये याची काळजी घेणे इतकेच शेतकऱ्याच्या हातात राहिले आहे. दूध संघांनी विशेष तरतूद करून शेतकऱ्याला या काळात अर्थसाह्य करायला पुढाकार घ्यायला हवा.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: