Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

पारंपारिक पिकांना केळीतून शोधला पर्याय
-
Tuesday, August 07, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: agro special

जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शिवाजी सुलताने यांनी सोयाबीन, कापूस आदी पिकांसोबत केळी पिकाचा प्रयोग प्रथमच केला. या पिकाचे अर्थशास्त्र त्यांनी अभ्यासले. त्यातून या पिकाचे नियोजन केले. सध्याच्या बदलत्या हवामान काळात व बेभरवशाच्या बाजारपेठेच्या युगात अशा प्रकारचे प्रयोग किफायतशीर ठरणार असल्याचे संबंधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
तुकाराम शिंदे

शेती व्यवसाय विविध कारणांमुळे अडचणीत आल्याचे आपण वेळोवेळी पाहत आहोतच. साहजिकच उत्पन्नस्रोतात स्थिरता ठेवण्यासाठी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीचा अवलंब अनेक शेतकरी करू लागले आहेत.

काही ठिकाणी पीकबदल हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी शिवाजी मारोती सुलताने यांनी भविष्याचा वेध घेत नियोजनाच्या जोरावर मुरमाड शेतीत केळीचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे अडतीस गुंठ्यांत अर्धापुरी जातीच्या केळीतून आपले उत्पन्न वाढवण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा प्रयोगांची मदत होणार असल्याचे सुलताने यांनी सांगितले.

घनसावंगी तालुक्‍यात भारी, मध्यम व हलक्‍या स्वरूपाची जमीन आहे. या भागातील सिंचनक्षेत्र वाढत असल्याने शेतकरी ऊस, फळबाग, कापूस आदी पिकांचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. या परिसरात उसाबरोबर फळबागांचेही चांगले उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. याच तालुक्‍यातील तीर्थपुरी येथील शिवाजी सुलताने यांनी भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी केळी पिकाची निवड केली. त्यांची सुमारे दहा एकर शेती आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस यासारखी पिके ते घेतात. मागील वर्षाचा कापूस पिकातील अनुभव सांगताना ते म्हणाले, की या पिकात लाल्या विकृती किंवा अन्य किडी-रोगांच्या प्रादुर्भावाशी सामना करावा लागतो. सोयाबीन पिकाचेही उत्पादन व उत्पन्न ठीक प्रकारचे असले तरी उत्पन्नवाढीसाठी ते पुरेसे ठरत नाही, त्यामुळे फळपिकांकडे वळण्याचे ठरवले. यामध्ये डाळिंबाची सुमारे 450 झाडे लावली आहेत. मोसंबीचीही 400 झाडे आहेत. मात्र, या बागा अद्याप नव्या आहेत. केळी पीक घेण्यापूर्वी पिकाचा सविस्तर अभ्यास केला. प्रत्येक झाडापासून किमान शंभर रुपये उत्पन्न मिळेल असे नियोजन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता मिळत असलेले उत्पन्न पाहून ठरवलेले अर्थशास्त्र समाधानकारक वाटत आहे. केळी पीक निवडताना "ऍग्रोवन'चा उपयोगही फायदेशीर ठरला. "ऍग्रोवन'चे नियमित वाचन असल्याने या पिकाविषयी अधिकाधिक माहिती मिळवीत गेलो.

केळीच्या नियोजनाबाबत सुलताने म्हणाले, की हलक्‍या स्वरूपाच्या मुरमाड जमिनीतील सुमारे अडतीस गुंठ्यांत लागवडीचे नियोजन केले. या पिकातून चांगले उत्पादन मिळावे म्हणून काही अनुभवी केळी उत्पादकांशी संपर्क साधला. एक फूट खोलवर असलेल्या मुरमाड जमिनीत केळीचे उत्पादन घेण्यासाठी आडवी-उभी नांगरट करून मशागत केली. अडतीस गुंठ्यांत दोन ट्रॅक्‍टर शेणखताचा वापर केला. त्यानंतर गादीवाफे (बेड) तयार केले. त्यावर अर्धापुरी जातीच्या केळीच्या रोपांची जूनच्या तिसऱ्या आठवड्यात (2011) पट्टा पद्धतीने लागवड केली.

लागवडीनंतर एक महिन्याने युरिया खत, कॅल्शिअम नायट्रेट, पोटॅश, 10-26-26, 18-46-0 आदींचा वापर वाढीच्या अवस्थेनुसार केला. मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच मॅग्नेशिअम सल्फेट, गंधक यांचाही वापर केला. केळीसाठी खतांचे नियोजन केल्यामुळे उत्पादनवाढीसाठी मदत झाली. पीक बहरात येऊन केळीच्या घडाच्या वजनात वाढ झाली. एका घडाचे वजन सुमारे वीस ते बावीस किलोपर्यंत मिळाले.

ेलागवड पट्टा पद्धतीने केली होती. त्यात बैलपाळी मारल्याने तणाचे प्रमाण कमी राहिले. आवश्‍यकतेनुसार पाळ्या केल्यामुळे मशागत चांगली झाली. केळी क्षेत्रात एकूण सोळा पाळ्या बसल्या. लागवड बेड पद्धतीवर केल्यामुळे लागवडीनंतर पाच महिन्यांनंतर टाचणी करून केळीला माती लावण्यात आली, त्यामुळे खोड मजबूत झाले.

लागवडीनंतर प्रति महिन्याने खुरपणी देण्यात आली. एकूण सहा खुरपण्या झाल्या. लागवड हलक्‍या व मुरमाड जमिनीत असल्याने पाण्याचे नियोजन आधीच केले होते. पिकाला पट्टा पद्धतीने पाणी दिले. उन्हाळ्यात पाण्याची आवश्‍यकता असल्याने सहा दिवसांनी पाणी देण्यात आले, तर हिवाळ्यात आठ दिवसांनी पाणी देण्यात आले.

उन्हाळ्यात वीज भारनियमनाच्या काळात पाणी रात्री दिले. सुलताने यांच्याकडे विहीर व दोन बोअर असल्याने पाण्याची तशी कमतरता नाही. एकूण नियोजनातून केळीच्या प्रति घडाचे वजन सुमारे वीस ते बावीस किलोपर्यंत मिळाले. सध्या पारंपरिक पद्धतीनेच पाण्याचे नियोजन आहे; मात्र ठिबक सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर असल्याचे ते म्हणतात.

उत्पादन आणि विक्री
सुमारे अडतीस गुंठे क्षेत्रात एकूण सतराशे झाडांची लागवड झाली. यापैकी शंभर झाडे बांधालगत होती. केळीचे घड चांगल्या प्रतीचे मिळाल्याने तीर्थपुरीच्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी झाली. तीर्थपुरी गाव बऱ्यापैकी मोठे असल्याने तेथेच आतापर्यंत बहुतांश केळीची विक्री झाली आहे. आतापर्यंत सुमारे 785 घड विकले. त्यांना प्रति किलो सव्वा आठ रुपये दर मिळाला. अजून काढणीचे नियोजन सुरू आहे. अजून सहाशेपर्यंत घडांची विक्री होण्याची शक्‍यता सुलताने यांनी बोलून दाखवली. सध्या या बाजारपेठेत किलोला नऊ रुपये दर सुरू आहे. हा दर काही काळ कायम राहिला तर या पिकातून उत्पन्नवाढ अधिकाधिक मिळेल असे त्यांना वाटते.

खर्चाचा ताळमेळ सांगायचा तर नांगरट, मशागत, शेणखत दोन ट्रॉली, बेणे, रासायनिक खत, खुरपणी (सहा खुरपण्या - प्रति खुरपणी - आठशे रुपये) असा एकूण 35 हजार रुपयांपर्यंत खर्च गेला आहे.

केळीला रोग-किडींचा फारसा प्रादुर्भाव जाणवलेला नाही, त्यामुळे एकूण फवारण्या दोनपेक्षा अधिक कराव्या लागल्या नाहीत. त्यामुळे फवारण्यांचा खर्च कमी झाला आहे. येत्या काळात केळी पिकाखालील क्षेत्र वाढवण्याचा सुलताने यांचा विचार आहे.

संपर्क - शिवाजी मारोती सुलताने - 8087315333
पो. तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: