Last Update:
 
ऍग्रो प्लस

संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांचे व्यवस्थापन
-
Wednesday, August 08, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: agro plus
* संत्रा बागांमधील पावसाच्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो आहे, की नाही याकडे लक्ष द्यावे. निचरा व्यवस्थित होत नसल्यास खोदलेल्या चराची दुरुस्ती करावी, साचलेले पाणी काढावे.
* झाडावरील पानसोट काढून टाकावे. पानसोट त्रिकोणी आकाराचे, हिरवे कंचदार आणि ती सरळ लांब वाढतात. त्यांची पानेसुद्धा मोठ्या आकाराची असतात.
* एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास 108 ग्रॅम युरिया किंवा 250 ग्रॅम अमोनिअम सल्फेट व 157 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट सोबत 25 ग्रॅम सल्फेट, 25 ग्रॅम फेरस सल्फेट आणि 25 ग्रॅम मॅंगेनीज सल्फेट द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडास दुप्पट, तीन वर्षांचे झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाडासाठी चौपट खताची मात्रा द्यावी.
* लिंबावरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात फार झपाट्याने होतो. या रोगामुळे पाने, देठ व फळांवर अगदी ठळक असे तांबूस पिवळे बारीक चट्टे पडतात. सुरवातीला टाचणीच्या टोकाएवढे दिसणारे हे ठिपके हळूहळू मोठे होत जातात. पानांवर ठिपक्‍यांच्या सभोवताली एक पिवळसर आवरण दिसून येते. गंभीर रोग लागणीमुळे पाने गळायला लागतात. फांद्यांवरून खालच्या दिशेने वाळायला सुरवात होते व फळे पूर्णपणे परिपक्व होण्यापूर्वीच गळायला लागतात. त्यामुळे लिंबाच्या झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून जाळून नष्ट कराव्या. झाडावर 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड आणि एक ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

*आंबिया बहराची फळगळ कमी करण्याकरिता दीड ग्रॅम 2, 4-डी किंवा जिब्रेलिक आम्ल आणि 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम 50 (डब्ल्यूपी) प्रति 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. 15 दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.
* नागपुरी संत्रा, मोसंबी आणि लिंबू झाडावर पाने खाणारी अळी किडीचा प्रादुर्भाव ऑगस्टच्या महिन्यामध्ये दिसून येते. या अळीची पाने खाण्याची क्षमता फार जास्त असल्यामुळे झाडे बऱ्याचदा निष्पर्ण होतात. सुरवातीला अळी गर्द काळ्या रंगाच्या आणि लहान असते. मोठी अळी हिरव्या रंगाची असते. झाडांवर लहान अळ्यांचा प्रादुर्भाव लक्षात येताच दीड मि.लि. डायमेथोएट किंवा एक मि.लि. सायपरमेथ्रीन (25 ईसी.) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय दोन मि.लि. बॅसिलस थुरिंजिएन्सिस प्रति लिटर फवारणी केल्याने किडीचे चांगले नियंत्रण होते.
* या महिन्यात फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असते. प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडतात आणि पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळाच्या सालीत बारीक छिद्र पडतात. पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी 20 ग्रॅम मॅलाथिऑन प्रति दोन लिटर पाण्यात मिसळावे. या वेळी या द्रावणात 200 ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस मिसळावा. या पद्धतीने विषारी मिश्रण तयार करावे. बागेत हे मिश्रण प्लॅस्टिक ट्रेमध्ये ओतून त्यावर प्रकाश सापळा लावावा.
* पेटत्या गोवऱ्यांमध्ये कडुलिंबाची पाने टाकून बागेमध्ये संध्याकाळी सहा ते रात्री 10 पर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.

संपर्क - 0712- 2500325
डॉ. व्ही. जे. शिवणकर,
राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: