Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

उत्तम व्यवस्थापनाचे धडे देणारी मुळे कुटुंबीयांची व्यापारी शेती
-
Saturday, August 11, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro special

योग्य व्यवस्थापन, बदलत्या वा आधुनिक तंत्रज्ञानाला जुळवून घेतले की शेतीचे उद्योगात परिवर्तन कसे होते हे पाहायचे असेल तर लातूर जिल्ह्यातील मौजे औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे जावे लागेल. येथे मुळे बंधूंकडून फळे व भाजीपाल्याचे व्यावसायिक उत्पादन कसे घ्यायचे याचे धडे घेता येतील. शेतीत नुसते भरघोस उत्पादन घेऊन चालत नाही तर त्याचे मार्केटिंगही जमले पाहिजे. मुळे बंधू या दोन्ही बाबींत तरबेज झाले आहेत.
डॉ. टी. एस. मोटे

मौजे औराद शहाजानी येथे मुळे बंधूंची तेरणा नदीपासून जवळ सुमारे दहा एकर काळी जमीन होती. सिंचन व्यवस्था करण्यासाठी आर्थिक ऐपत नसल्याने ज्वारी, हरभरा अशी कोरडवाहू पिके घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. बागायती शेती करण्यासाठी नदीवरून पाइपलाइन करण्याचे ठरवले. त्यासाठी घरातील चार म्हशी व दोन बैल विकले; परंतु तेवढाही पैसा पुरेसा नव्हता. मित्रांकडून उधारीवर 40 पोते ज्वारी घेतली. ती विकून पैसा उभा केला आणि नदीपासून 1977 मध्ये पाइपलाइन केली. सिंचनाची सोय झाल्यानंतर गहू, ज्वारी, ऊस व थोडा भाजीपाला घेऊ लागले.

नुसते कष्ट उपयोगी नाहीत, तंत्रज्ञान हवे
सन 1985-86 पर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. गावातील महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक मल्हारी कृष्णा कसपटे यांना मुळे बंधूंविषयी माहिती होती. शाळा सुटल्यानंतर एका शिक्षकाला बरोबर घेऊन मुळे बंधूंच्या शेताला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले, की शेतात नुसते कष्ट करून भागत नाही, तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. बाजारपेठेला केव्हा, कोणता माल, कसा पाहिजे याचा अभ्यास करावा लागतो. एक दिवस येऊन आमची शेती पाहा, तुमच्या शेतीत निश्‍चित बदल होईल. त्यानंतर गुरुजींच्या मौजे गोरमाळा (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील शेतीत द्राक्ष, पपई, पेरू, बोर, भाजीपाला, ठिबक, उंच वरंब्यावर लागवड, मालाची ग्रेडिंग करण्याची पद्धत असे विविध आधुनिक प्रयोग मुळे बंधूंनी पाहिले. बांधावरील कलमीकरण केलेले बोरीचे झाड दाखवून एक झाड वर्षाकाठी 2500 रुपयांचे उत्पन्न देते, असेही सांगितले. गुरुजींच्या शेतावरील प्रत्यक्ष भेटीचा मुळे बंधूंच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला. आपणही अशीच व्यापारी शेती करू शकतो असे विचार करतानाच हिंमत वाढली. सन 1989 मध्ये दोन एकर द्राक्षे लावली. मिरची, वांगे, टोमॅटोही घेऊ लागले. गावरान खताचा वापर वाढवला. एकूण नियोजनातून 1985 मध्ये दीड लाखांचे उत्पन्न प्रथमच मिळाले. पुढे मुळेंनी एक पायंडा पाडला म्हणजे दरवर्षी जेथे चांगली शेती असेल ती पाहून यायची. प्रगतिशील शेतकरी विश्‍वास कचरे यांचे मार्गदर्शन घेतले. मौजे अनगर (ता. मोहोळ) येथील कृषिभूषण दादा साधू बोडखे यांच्याकडून पपईची रोपे व मार्केटिंगचे धडे घेतले. आता मुळेंचे सर्व कुटुंबच शेतीच्या मागे लागले. दोन्ही भावांची तिन्ही मुले सुशिक्षित असताना कोणीही नोकरी अथवा व्यवसायाच्या पाठीमागे लागले नाही.
 
लाजवाब व्यवस्थापन -
सुभाष मुळे (वय 60) यांचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांना मोठा भाऊ (गोविंद) आहे. सुभाष यांना प्रताप व सत्यवान अशी दोन मुले आहेत. बंधूंना भीम हा मुलगा आहे. दोन्ही भावांची तीनही मुले विवाहित असून, सुनाही सुशिक्षित आहेत. हे सर्व कुटुंब सुमारे 80 एकरांवरील शेती करते. कुटुंबातील सर्वांना जबाबदारी वाटून दिली आहे. शेती चार ठिकाणी विभागली आहे. शेतात बंगला बांधून ते राहतात. घराशेजारील द्राक्ष, वांगी व भोपळा यांचे व्यवस्थापन भीम व त्यांची पत्नी यांच्याकडे, घराशेजारील पपई, केळी, टरबूज, टोमॅटो यांचे व्यवस्थापन सत्यवान व त्यांच्या पत्नीकडे, नदीकाठी 23 एकर टोमॅटोचे व्यवस्थापन गोविंदराव यांच्याकडे, भाड्याने घेतलेल्या जमिनीतील पिकांचे व्यवस्थापन प्रताप व त्यांच्या पत्नीकडे आहे. सुभाष मुळे विक्री व्यवस्थापन व बाहेरून लागणाऱ्या खरेदीचे काम पाहतात. दोन बैलजोड्या, 60 व 15 एचपीचे दोन ट्रॅक्‍टर यांच्या साह्याने मशागतीची कामे होतात. 20 सालगडी व दररोज 100 च्यावर महिला बाराही महिने कामाला असतात. दिवसभराचे मजुरीचे काम संपल्यानंतर माल भरण्यासाठी मुळे यांनी मजुरांना ओव्हरटाईम देणे सुरू केले. प्रत्येक तासाला 20 रुपये ओव्हरटाईम दिल्यामुळे मजूर व मालकांचे दोघांचेही हित जोपासता आले.

नियोजन लागवडीचे व मार्केटिंगचे -
कोणता भाजीपाला घ्यायचा हा निर्णय मुळे विचारपूर्वक घेतात. लातूर, सोलापूर येथे ओळखीचे व्यापारी, बियाणे कंपनीचे विक्री प्रतिनिधी, आसपासच्या रोपवाटिका येथून कोणत्या रोपांची, बियाण्यांची विक्री किती झाली याची माहिती घेतात. ज्यांची विक्री जास्त झाली आहे ते पीक वगळून अन्य पिकांकडे वळतात. लातूर, सोलापूर येथून ठराविक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करतात. प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट भरून रोपांची निर्मिती करतात. शक्‍यतो बाहेरून रोपे खरेदी करण्याचे ते टाळतात.

मुळे आपल्या मालाचे स्वतःच मार्केटिंग करतात. हैदराबाद, निजामाबाद, बंगळूर, पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, बिदर इत्यादी अनेक ठिकाणी त्यांचे मार्केटिंग सुरू असते. माल घेऊन स्वतःच मार्केटमध्ये जातात. एका ठिकाणी जास्त व नियमित शेतीमाल मिळत असल्यामुळे अनेक व्यापारीच त्यांच्या शेतावर येतात. भावही चांगला देतात. अनेक दिवसांचे संबंध जपल्याने दररोज व्यापाऱ्यांकडून बाजारभावाची माहिती घेतात. त्यासाठी मोबाईल सेवेचाही फायदा घेतात. त्यानुसार कोणत्या मार्केटमध्ये माल पाठवायचा याचा निर्णय घेतात.

ड्रेनेज पद्धतीचा फायदा
मुळे कुटुंबीयांच्या चार ठिकाणच्या शेतीपैकी दोन ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने पीक चांगले यायचे नाही. जमीन हलकी, जास्त पाऊस झाला की पाणी जमिनीत न मुरता ते एके ठिकाणी साचून राहायचे. त्यामुळे पिकांचे नुकसान व्हायचे. त्यावर उपाय म्हणून चारी पद्धतीचा वापर करून एका शेतातील पाणी टाकीत व तेथून पाइपलाइनने दुसऱ्या ठिकाणी असे वळवत ड्रेनेज पद्धत यशस्वी केली.

भाजीपाल्याची उत्पादकता टिकून असण्यामागे सेंद्रिय खताचा मुबलक वापर हे एक कारण असल्याचे मुळे सांगतात. उन्हाळ्यामध्ये अनेक गावांमधून ते सेंद्रिय खत विकत घेतात. साखर कारखान्याची मळी आणून शेतात साठवतात व कुजवून तिचा वापर करतात. सेंद्रिय खतामुळे दिलेल्या रासायनिक खताची मात्रा चांगली लागू पडते, असे ते म्हणतात.

उंच वरंब्यावर लागवड -
मुळे कोणतेही पीक वरंब्याशिवाय घेत नाहीत. ट्रॅक्‍टरच्या साह्याने चालणारे विशिष्ट यंत्र तयार करून त्याद्वारे उंच वरंबे तयार करतात. वरंबे तयार करताना त्यात सेंद्रिय व रासायनिक खते भरतात. गरजेनुसार वरंब्यावर मल्चिंग पेपर अंथरून भाजीपाल्याची लागवड करतात.

ठिबकचा वापर -
भाजीपाला असो वा अन्य पीक ठिबकशिवाय लागवड नाही असा दंडक आहे. त्यातूनच खत दिले जाते.

कृषी विभागाशी समन्वय -
मुळे कुटुंबीयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व - उदा. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, द्राक्ष लागवड, अवजारे, पॅकिंग हाऊस, प्रात्यक्षिके आदी - योजनांसाठी अनुदान कृषी विभागाने दिले आहे.

संपर्क - प्रताप मुळे, 9421482802
सुभाष मुळे, 9421449780


(लेखक लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

शेती थोडक्‍यात...
द्राक्षे - 11 ते 12 एकर, सरासरी उत्पादन - 15 ते 17 टन, माल एक्‍स्पोर्टलाही जातो.
पपई - एकरी 11 एकर, उत्पादन - एकरी 50 ते 60 टन
टोमॅटो - 22 एकर, उत्पादन - एकरी 20 टन
दुधी भोपळा - तीन एकर, उत्पादन - एकरी 25 टन
कलिंगड, खरबूज - 10 ते 20 एकर, केळी - 10 एकर (नवी बाग), वांगी 5 ते 10 एकर, उत्पादन - एकरी 30 टनांपर्यंत. शेतातील उत्पन्नात लाखाच्या आत पट्टी कधी नसते.
- 20 ते 30 एकर शेती भाडेतत्त्वावरही घेतात. कष्टाच्या जोरावर शेतात बंगला, दोन ट्रॅक्‍टर, टेम्पो, जीप, मोटारसायकल, विविध अवजारे, बैल आदी घटक आहेत. मुळेंचे चार नातू हैदराबाद येथील इंग्रजी शाळेत शिकत आहेत. काही माल हैदराबादमध्ये मॉललाही जातो.
- एकरी अधिक उत्पादन मिळत असल्याने भाजीपाला व फळपिकांवरच सारी शेती


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: