Last Update:
 
राज्य

भाजीपाला उत्पादनासाठी तीन कोटी रुपयांचा प्रकल्प
- (प्रतिनिधी)
Tuesday, August 14, 2012 AT 02:00 AM (IST)

सातारा - भाजीपाल्याला असलेली वाढती मागणी आणि दर याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्हावा, भाजीपाला पिकविण्यासाठी त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि आर्थिक मदतही व्हावी यासाठी आता कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात तीन कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे शंभराहून अधिक गट स्थापन केले जाणार आहेत.

जिल्ह्यात शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सध्या दीड हजार शेतकरी बचत गट कार्यरत आहेत. आता आणखी भाजीपाला गटांची स्थापना केली जाणार आहे. त्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन वाढविले जाणार आहे. जिल्ह्यात युवा शेतकरी व उपक्रमशील शेतकऱ्यांना त्यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या योजनेतून लगतच्या मोठ्या शहराला भाजीपाला वर्षभर पुरवायचा आहे. राज्यात या वर्षी पुणे शहराची निवड केली असून सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्याने भाजी पुरवायची. या चार जिल्ह्यांसाठी या वर्षी दहा कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. भाजीपाला उत्पादनासाठी जिल्ह्यात सर्वेक्षण करून कोठे, कोणता भाजीपाला पिकू शकतो त्याची पाहणी करून तेथील शेतकरी गटांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी पुणे येथे भाजीपाला पोच करावयाचा आहे. तेथे विक्री व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यात पिकविल्या जाणाऱ्या भाजीपाला सध्याचे क्षेत्र तीन हजार हेक्‍टर आहे. यात पालेभाज्या - मेथी, पालक, चाकवत, तांदळी, माठ, राजगिरा तसेच फळभाज्या - गवार, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, शेवगा, घेवडा, फरसबी, चेत्री घेवडा, मिरची घेतल्या जातात.

शेतकऱ्यांना संधी
भाजीपाला पिकविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार. तसेच त्यांना भाजीपाला बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे भाजीपाला तरू करण्यासाठी नेट शेड, हरितगृह, भाजीपाला वाहतुकीसाठी मोटार व्हॅन यासाठी मदत केली जाणार आहे. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: