Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

सेंद्रिय कपड्यांसाठी भारताचीही आघाडी
(वृत्तसंस्था)
Wednesday, August 15, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro special

"आयसॉट'अंतर्गत ब्रॅंड होतोय विकसित

नवी दिल्ली - सेंद्रिय कापूस उत्पादनात भारत हा आघाडीवर असून आता सेंद्रिय कापसापासून बनविण्यात आलेला सेंद्रिय धागा, सेंद्रिय कपडेही बाजारात मिळू लागले आहेत. सेंद्रिय वस्त्रनिर्मितीत भारताचा ब्रॅण्ड सक्षम करण्यासाठी "इंडियन स्टॅंडर्ड फॉर ऑरगॅनिक टेक्‍स्टाईल्स (आयसॉट)' हे निकष बनविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सेंद्रिय वस्त्र उत्पादनांच्या निर्यातीतून 1027 कोटी रुपयांचे उत्पन्न भारताला मिळाले होते.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांच्या हस्ते "आयसॉट'चे नुकतेच (30 जुलै) अनावरण करण्यात आले. सदर निकष "नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्‍शन्स' (एनपॉप)मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाद्वारे "एनपॉप'नुसार सेंद्रिय शेतीमाल व अन्न उत्पादनांचे प्रमाणीकरण केले जाते.

सेंद्रिय उत्पादनांसाठी राष्ट्रीय मान्यता संस्थेच्या सल्लागार डॉ. पीव्हीएसएम गौरी यांनीही माहिती दिली. याद्वारे कापूस लागवडीपासून ते कापडनिर्मितीपर्यंतचे सारे सेंद्रिय निकष तपासून ही कापडनिर्मिती होणार आहे. डॉ. गौरी म्हणाल्या, ""सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, शेतीमालावर प्रक्रिया आणि उत्पादनांचे प्रमाणीकरण निकष यासाठीच्या नियमावली असणाऱ्या नॅशनल स्टॅंडर्डस फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्‍शन (एनपॉप)मध्ये "आयसॉट'चा समावेश करण्यात आला आहे. आजघडीला जगातील केवळ 20 देशांमध्येच सेंद्रिय कापूस उत्पादन होते. यामध्ये भारत आघाडीवर असून सीरिया, तुर्की, चीन, अमेरिका यांचा समावेश आहे.

जगभर आरोग्याप्रती जागरूकता वाढत आहे. त्यामुळे केवळ अन्नच नाही तर कपडेही सेंद्रिय हवेत अशी मागणी वाढत आहे. या मागणीचा विचार करूनच सेंद्रिय कपडे उपलब्ध करण्याचा विचार पुढे आला आहे. सेंद्रिय कापूस उत्पादनात भारत आघाडीवर असल्यामुळे अशा सेंद्रिय कपड्यांच्या निर्यातीतून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी भारताला आहे.

आजघडीला भारतातील सेंद्रिय कापसापासून तयार झालेला धागा व कपडे यांना युरोप व अमेरिकेत मोठी मागणी आहे. सी अँड ए, नायके, वॉलमार्ट-सॅम्स क्‍लब, विल्यम्स-सोनोमा, एच अँड एम, ऍन्विल निटवेअर, कूप स्वित्झर्लंड, ग्रीनसोर्स, लेवी स्ट्रॉस, टारगेट, आदिदास, नॉर्डस्ट्रॉम असे आंतरराष्ट्रीय ब्रॅंड भारतातील सेंद्रिय धाग्यास पसंती देतात, असेही डॉ. गौरी यांनी स्पष्ट केले.

सेंद्रिय कापूस, धागा निर्यात
2011-12 या आर्थिक वर्षात भारताने एकूण 1417.82 टन सेंद्रिय कापूस, धाग्याची निर्यात केली आहे. झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश ही राज्ये सेंद्रिय कापूस, सेंद्रिय रेशीम निर्मितीत आघाडीवर आहेत. 2011-12मध्ये सेंद्रिय वस्त्र उत्पादनांच्या निर्यातीतून 1027 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

काय आहे "आयसॉट'
सेंद्रिय वस्त्रनिर्यातीबाबचे निकष म्हणजे "इंडियन स्टॅंडर्ड फॉर ऑरगॅनिक टेक्‍स्टाईल्स (आयसॉट)'. भारतातील सेंद्रिय वस्त्रनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने हे निकष बनविण्यात आले आहेत. या निकषांनुसार केवळ देशी कापूस वाणांचाच वापर केला जातो. बीटी कपाशीचा वापर करण्यास मनाई आहे. यापूर्वी जगभर सेंद्रिय वस्त्रनिर्मितीसाठी "गॉट्‌स' हे खासगी कंपनीने बनवलेले निकष लागू होते. पण भारतातील वस्त्रनिर्मितीची परंपरा लक्षात घेऊन आयसॉट विकसित केल्याचे डॉ. गौरी यांनी सांगितले. या निकषांचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी वेबआधारित प्रणाली, जीपीएस प्रणाली व बारकोडिंग प्रणाली यांचा वापर केला जातो. सरकारमान्य प्रमाणीकरण संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय वस्त्रनिर्मितीवर बारकाईने नजर ठेवून भेसळ, चूक टाळण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्या म्हणाल्या.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: