Last Update:
 
बाजारभाव

पोल्ट्रीतील मंदीत अधिक मासाची भर
-
Monday, August 20, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: market rate

 गेल्या आठवड्यात ब्रॉयलर पक्ष्यांच्या दरात सुधारणा झाली असली, तरी हे दर उत्पादन खर्चाच्या वर पोचलेले नाहीत. यंदा श्रावणानंतर अधिक मास आल्याने अंडी आणि ब्रॉयलरच्या खपात फारशी सुधारणा झालेली नाही.

श्रावण संपल्यानंतर अंडी - चिकनच्या खपात सुधारणा होते. दरवर्षी श्रावण, गणपती उत्सव आणि नवरात्रापर्यंत अंडी - चिकनचा खप कमी असतो. दसऱ्यापासून पुढे खप वाढत जातो. दिवाळी आणि त्यानंतर नाताळ, नवीन वर्षाचा प्रारंभ हा कालावधी चिकन - अंड्यांच्या खपासाठी पूरक असतो. याच कालावधीत हिवाळा सुरू होतो, त्यामुळे सर्वच मांसजन्य उत्पादनांना मोठी मागणी वाढते.

पुणे येथील अंडी उत्पादक शेतकरी राजू भोसले म्हणाले, की चार महिन्यांपूर्वी अंड्यांचा उत्पादन खर्च 2.30 रुपये होता. त्या वेळी सोयामील 1900 रुपये प्रति क्विंटल, तर मका 1000 रुपये प्रति क्विंटल दराने मिळत होता. जागतिक आणि देशांतर्गत दुष्काळी परिस्थितीमुळे सोयामीलचे दर 100 टक्के, तर मक्‍याचे दर 50 टक्‍क्‍यांनी वाढले. यामुळे अंडी उत्पादनाचा खर्च सुमारे साठ टक्‍क्‍यांनी वाढला. सध्या अंडी उत्पादनाचा खर्च 2.80 रुपये येत असून, त्याच भावाने लिफ्टिंग सुरू आहे. बॅंकांचे व्याजदर आणि व्यवस्थापनाचा खर्च पाहता हे दर उणे ठरत आहेत.

सध्या शेतकऱ्यांकडे मका व सोयाबीन उपलब्ध नाही. निर्यातदार आणि व्यापाऱ्यांकडेच माल उपलब्ध आहे. अशा वेळी त्यांच्याकडील साठ्यावर नियंत्रण आणले पाहिजे.

कृत्रिमरीत्या भाव वाढत असतील तर ते सरकारी यंत्रणांनी थांबविले पाहिजेत आणि शेतकऱ्यांकडे माल नसताना निर्यातीवरही निर्बंध असले पाहिजेत, अशी भूमिका राजू भोसले यांनी मांडली आहे.

अमेरिकेत पाऊस सुरू झाल्याने तेथील मका आणि सोयाबीनच्या पिकाला आधार मिळाला आहे. तथापि, दुष्काळामुळे मक्‍याचे 12 टक्के, तर सोयाबीनचे 13 टक्के नुकसान झाले आहे. पाऊस सुरू झाल्याने यापेक्षा अधिक नुकसान होणार नाही. इकडे, देशात सोयाबीनची उच्चांकी लागवड झाली आहे. मका लागवडही सरासरी गाठण्याचा अंदाज आहे. येत्या काळात मक्‍याच्या किमती वरच्या पातळीवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे, तर सोयामीलच्या किमती दहा टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे.

जुलै महिन्यात 1,68,341 टन सोयामील निर्यात झाले. गेल्या वर्षी याच महिन्यातील निर्यात 1,39,547 टन होती. मक्‍याची निर्यात सुरळीत आहे. यंदा 35 लाख टन मका निर्यात होण्याचा अंदाज आहे. देशाची गरज 180 लाख टन असून, गेल्या वर्षी 221 लाख टन मका उत्पादन झाले होते. जुलैअखेरपर्यंत देशातून सुमारे दहा लाख टन मका निर्यात झाला आहे. देशात 103 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी 97.50 लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा 5.7 टक्‍क्‍यांनी, तर सरासरीपेक्षा 14 टक्‍क्‍यांनी सोयाबीन लागवड अधिक आहे. देशात दहा टक्के पाऊस कमी असला तरी प्रमुख सोयाबीन राज्य असलेल्या मध्यप्रदेशात सरासरीपेक्षा 30 ते 40 टक्के पाऊस अधिक झाला आहे. देशात आतापर्यंत 69 लाख हेक्‍टरवर मका लागवड झाली असून, सरासरी क्षेत्र 70.64 लाख हेक्‍टर आहे. 

दर वर्षी श्रावण संपला, की अंड्यांच्या खपात लगेचच सुधारणा होते. तथापि, श्रावणाइतकाच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला अधिक महिना सुरू झाल्याने अंड्यांच्या खपावर मर्यादा आल्या आहेत. दसऱ्यापासून दरामध्ये सुधारणा होईल, तोपर्यंत उत्पादन खर्चाच्या आसपासच अंडी विकावी लागतील.
- राजू भोसले, अंडी उत्पादक शेतकरी, पुणे

प्रकार--------भाव-----परिमाण----बाजारपेठ
ब्रॉयलर------60-------प्रति किलो----नाशिक
चिक्‍स--------13-------प्रति नग--------पुणे
मका---------1500----प्रति क्विंटल------सांगली
अंडी---------2.80------ प्रति नग-------पुणे
सोयामील----4050----प्रति क्विंटल------इंदूर 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: