Last Update:
 
ऍग्रो प्लस

रोखा जनावरांतील चामखीळ अाजाराचा प्रसार
-
Tuesday, November 29, 2016 AT 07:00 AM (IST)
Tags: agro plus
चामखीळ हा त्वचेचा अाजार असून या अाजाराचा संसर्ग सहसा वासरांमध्ये होतो आणि त्यांच्या त्वचेवर तो हळूहळू पसरतो. सुरवातीला सहसा कुठलेही गंभीर परिणाम होत नाहीत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, काही दिवसांनी महत्त्वाच्या भागावर मोठमोठ्या चामखीळ येतात आणि त्यामुळे अडचणी किंवा जखमा होऊन गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
डॉ. पी. पी. म्हसे, डॉ. भूपेश कामडी, स्नेहा डफळ

- चामखीळ हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून, ‘बोव्हाईन प्यापिलोमा व्हायरस’ या कर्करोगसदृश विषाणूच्या संसर्गामुळे होतो. यावर कोणताही रामबाण उपाय उपलब्ध नाही. संसर्ग जनावरांच्या त्वचेमधून होतो आणि त्वचेवर त्वचेच्या कर्करोगाप्रमाणे (बेनाईल ट्यूमर) लहान गाठ/ चामखीळ दिसून येते.
- सुरवातीस चामखीळ साधारण चेहऱ्यावर आणि गळ्याच्या त्वचेवर आढळून येतात. पुढे मात्र कासेवर, योनीमार्गात देखील चामखिळीचा उपद्रव झालेला दिसतो.
- या आजाराचे विषाणू जनावरांच्या भोवतालच्या परिसरात काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत जिवंत राहतात.
- चामखीळ खपलीप्रमाणे गळून पडते आणि त्यामधील विषाणू कित्येक महिने जमिनीवर जिवंत राहतात.

अाजाराचा प्रसार - 
- चामखीळचा संसर्ग सुरवातीला कमी वयाच्या वासरांमध्येच आढळून येतो. मात्र, मोठ्या जनावरांनाही या अाजाराचा संसर्ग होऊ शकतो. बहुदा आशा चामखीळ नंतर जनावरांच्या कासेवर, सडांवर आणि प्रजननमार्गामध्ये पसरतात.
- जनावरांना टॅग किंवा नंबर लावताना वापरल्या जाणाऱ्या अवजारांमुळे एका वासरातून दुसऱ्या वासराला प्यापिलोमा विषाणूची लागण होऊन चामखीळ होऊ शकते. बहुदा अशा वेळी जिथे नंबर टाकला आहे त्याच जागी नंबरवर काही दिवसांनी खूप दाट चामखीळ उमटलेल्या दिसतात. विषाणू बाधेनंतर साधारण पाच- सहा महिन्यांत चामखीळ त्वचेवर दिसायला सुरवात होते. त्यानंतर जनावरांचे कान आणि गळ्यावर चामखीळ पसरायला सुरवात होते.
- संपूर्ण जगभरातील जनावरांमध्ये प्यापिलोमा विषाणूंचा संसर्ग दिसून येतो. प्रादुर्भाव झालेली जनावरेच या आजाराच्या विषाणूंचे महत्त्वाचे आणि नैसर्गिक स्रोत असतात.
- बाधित जनावरांच्या सान्निध्यातील प्रत्येक वस्तू किंवा पदार्थांद्वारे हे विषाणू इतर जनावरांमध्ये पसरतात. काही वेळा विषाणूबाधित जनावराच्या त्वचेवर चामखीळ दिसूनही येत नाही; परंतु असे जनावर देखील विषाणूंचा स्रोत होऊन आजार मोठ्या प्रमाणावर इतर वासरांमध्ये पसरवीत असते.

लक्षणे
सुरवातीला हा आजार प्रत्यक्षरीत्या गंभीर वाटत नसला, तरी अप्रत्यक्षपणे त्याचे इतर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात.
- लहान वयातील वासरांमध्ये विषाणू संसर्ग होतो, मात्र लगेच दिसून येत नाही.
- एक ते सहा महिन्यांच्या कालावधीत त्वचेवर केसाखाली किंवा टॅग किंवा नंबरच्या व्रणावर थोड्याफार प्रमाणात पांढरट पिवळसर पुरळ दिसायला लागतात.
- हे पुरळ खरबरीत असतात आणि त्यांचा आकार २-३ मिलिमीटरपासून काही इंचांपर्यंत मोठा असू शकतो. चामखीळ दिसायला अत्यंत विद्रूप असल्याने जनावरांची त्वचा प्रदर्शनीय राहत नाही. प्रदर्शनानिमित्त पाळलेल्या जनावरांची किंमत त्यामुळे कमी होते.
- चामखीळ झाल्याने जनावरांच्या शरीरावर याव्यतिरिक्त इतर अप्रत्यक्ष दुष्परिणाम होऊ शकतात. जनावरांच्या चेहऱ्यावर, मानेवर सुरवातीला चामखीळ निर्माण होतात. बैलांच्या खांद्यावर चामखीळ झाल्यास जू घासल्यामुळे जखमा होऊन जंतुसंसर्ग होतो.
- जनावरांच्या इतर अवयवांवर चामखीळ पसरायला सुरवात होते. ओठांवर, तोंडामध्ये, घशामध्ये चामखीळ झाल्यास जनावरांना चारा खाण्यास अडचण येते आणि त्यामुळे त्यांचे वजन आणि उत्पादन घटते. चामखीळ जनावरांच्या पचनसंस्थेमध्ये जठरापर्यंत देखील वाढलेल्या आढळून येतात. अशा वेळी जनावरांना पचनाच्या समस्या निर्माण होतात.
- नाकपुड्यांमध्ये चामखीळ वाढल्यास श्वासोच्छ्वासास बाधा निर्माण होऊन घोरल्यासारखा आवाज येऊ शकतो. जनावर अशक्त होते.
- डोळ्याच्या पापण्यांवर, कडांवर चामखीळ वाढल्यास जनावरास दिसण्यात अडचण निर्माण होऊ शकते. जनावर अस्वस्थ राहते आणि डोळ्यात इजा होऊन इतर जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो.
- चामखीळ जर गाईच्या किंवा वळूच्या प्रजननसंस्थेत वाढल्या, तर प्रजननात कठीण समस्या निर्माण होतात. चामखीळ गळून पडलेल्या, जंतुसंसर्ग झालेल्या जखमांमुळे आणि गळू झाल्यामुळे असे जनावर वांझ राहते. काही गाईंमध्ये चामखीळ मूत्रनलिकेत वाढल्याने नैसर्गिक मूत्रविसर्जनात अडथळा निर्माण होतो.
- चामखीळ जनावरांच्या कासेवर आणि सडांमध्ये वाढल्यामुळे कासदाह होण्याची शक्यता वाढते. दूध काढताना अडथळा निर्माण होतो. सडांच्या मार्गात गाठी निर्माण होऊन दूध बाहेर येण्यास अडचण येते. कासेवरील आणि सडांवरील चामखीळ गळून पडल्याने तिथे जखमा होतात. त्यावर माश्या बसल्याने किडे पडू शकतात. तसेच, इतर जंतूंचा संसर्ग होऊन कासदाह अाजार होण्याचे प्रमाण वाढते. जनावरांचे दुग्धोत्पादन अत्यंत कमी होते आणि काही वेळा सड मुके किंवा निकामी झालेले आढळतात.

प्रतिबंधात्मक उपाय - 
- चामखीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने त्याच्यावर परिणामकारक प्रतिजैविक उपलब्ध नाही. परदेशात चामखीळ आजारावर स्थानिक बाजारात लस उपलब्ध असून, ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मात्र, भारतात अशी लस सध्या वापरली जात नाही.
- या आजाराने बाधित जनावरांच्याच चामखिळीचा वापर करून, त्यावर सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत जैवरासायनिक प्रक्रिया करून लस तयार केली जाते. त्याच मूळ जनावरास ही लस दिली जाते. याला ‘ऑटोजीनस व्हॅक्सिन’ (स्वजात लसीकरण) असे म्हणतात.
- प्यापिलोमा विषाणू प्रतिरोधासाठी सदर लस बाजारातील उपलब्ध लसींपेक्षा अत्यंत परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.
- प्रतिबंधात्मक उपायांमुळे अाजार कमी होतो, त्यामुळे चामखीळ असलेल्या जनावरासाठी वापरण्यात आलेले कोणतेही साहित्य अथवा भांडी, दोर इत्यादी वस्तू इतर जनावरांसाठी वापरू नयेत.
- वासरांना नंबर टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य प्रत्येक वासरासाठी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन २-४ टक्के फोर्माल्डीहाईड द्रावणात बुडवून, निर्जंतुकीकरण करून थोड्या वेळानंतर वापरावे.
- जनावरांची नियमित स्वच्छता ठेवावी, त्यांना खरारा करावा. वेळोवेळी जनावरांना धुवावे. तसेच, जनावरांच्या खालची जमीन स्वच्छ, कोरडी राहील याकडे लक्ष द्यावे.
- गोठा चुनखडीची निवळी वापरून वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावा. दूध काढण्यापूर्वी कास साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवावी अाणि कोरडी करावी. दूध काढल्यानंतर निर्जंतुक असलेले टीट डीप वापरून सड त्यात बुडवावेत.
- जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, दूध काढणारी व्यक्ती, व्यवस्थापन आणि औषधोपचार किंवा कृत्रिम रेतन करणाऱ्या व्यक्ती यांच्यामार्फत चामखीळ या आजाराचा प्रसार इतर जनावरांमध्ये होऊ शकतो, अशा व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. हातांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच ते हाताळत असलेले साहित्य, वस्तू, अवजारे या सगळ्यांचे निर्जंतुकीकरण करून मगच वापरावे.

उपचार - 
- चामखीळ ठराविक कालावधीनंतर काही महिन्यांच्या कालावधीत आपोआप गळून पडतात.
- सुरवातीलाच निदर्शनास आलेली चामखीळ काही शास्त्रीय पद्धतीने काढल्यास आजाराचा पुढील प्रसार थांबू शकतो. मात्र, यामुळे झालेल्या जखमांची योग्य शुश्रूषा करावी, अन्यथा माशी बसल्याने किंवा जंतुसंसर्ग झाल्याने जखम पिकू शकते. कधी कधी महत्त्वाच्या अवयवावरील चामखीळ पशू चिकित्सकामार्फत काढून घेणे उचित असते.
- बाजारात काही अॅलोपॅथी मलम; हर्बल, तसेच होमिओपॅथी प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार आजाराच्या सुरवातीच्या काळात वापरल्यास परिणामकारक होऊ शकतात. ऑटोजीनस लस तयार करून जनावरास वेळोवेळी टोचल्यास चामखीळ रोगावर प्रभावी उपचार झालेला आढळून येतो. या आजारात योग्य उपाय केल्यास जनावर लवकर बरे होते आणि आजार परत उलटत नाही.

संपर्क - डॉ. पी. पी. म्हसे,
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: