Last Update:
 
ऍग्रो प्लस

पक्षांच्या आजारावर ठेवा नियंत्रण
-
Wednesday, November 30, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
तापमान कमी झाल्यामुळे पक्षांना हिवाळ्यात सुरवातीच्या काळात विविध अाजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अाजार टाळण्यासाठी पक्ष्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. त्यामुळे पक्ष्यांच्या वाढीस व उत्पादनास योग्य चालना मिळते.
डॉ. सतीश मनवर

१. गाऊट :
हा रोग हिवाळ्याच्या सुरवातीला दिसून येतो. मरतुकीचे प्रमाण काही वेळा १०-३० टक्क्यापर्यंत आढळून येते.

कारणे - 
पक्ष्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाल्यावर, ब्रुडिंग व्यवस्थित नसेल तर, खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास किंवा व्यवस्थापनातील त्रुटीमुळे गाऊट अाजार होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने या रोगामध्ये युरिक ॲसिड किंवा पांढऱ्या रंगाच्या युरिक ॲसिडचे खडे हे शरीरातील अवयव, मूत्रपिंड नलिकेत तसेच सांध्यामध्ये जमा झालेले दिसून येतात.

उपाय - 
- प्रतिलिटर पाण्यात ५ ते १० ग्रॅम गूळ मिसळून द्यावा.
- प्रतिलिटर पाण्यातून एक ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड ३ ते ४ दिवस द्यावे.
- एक ते दोन दिवस पिल्लांना २५ ते ५० टक्के दळलेली मका खाद्यात मिश्रण करून द्यावी.
- लहान पिलांना पिण्याचे पाणी कोमट करून पाजावे.
- पक्षीगृहातील पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवून, ब्रुडिंग करावी.
ही सर्व काळजी घेतल्यास हा रोग नियंत्रणात ठेवणे शक्य होते.

२. थंडीमुळे एकमेकावर बसून मृत्यू :
शेडमधील तापमान कमी झाल्यावर थंडीमुळे पिल्ले एका कोपऱ्यात एकमेकांवर बसल्यामुळे गुदमरून मरण्याची शक्यता असते. अशा वेळी शेडचे तापमान (ब्रुडिंग) व्यवस्थित गरजेनुसार ठेवणे आवश्‍यक आहे.

३. ओम्फॅलायटीस (नाभीचा दाह) :
हा रोग पहिल्या पाच-दहा दिवसांमध्ये दिसून येतो. पिल्लामधील पिवळे प्रथिनांचे मांस पिशवीतील योकचा उपयोग न झाल्यामुले पिशवीला जीवाणूची बाधा होते आणि मरतूक सुरू होते.

उपाय ः प्रतिजैविकांमुळे या अाजारावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी तज्‍ज्ञांच्या सल्ल्याने पक्ष्यांना योग्य ते प्रतिजैविक द्यावे.

४. जलोदर :
हा रोग प्रामुख्याने मोठ्या पक्ष्यांमध्ये दिसून येतो. या रोगात पक्ष्याच्या पोटात पाणी होऊन मरतूक होते.

कारणे - 
पक्ष्याला ताजी हवा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे, शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच खाद्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

उपाय - 
- शेडमधील हवा खेळती ठेवावी. पक्ष्यांना योग्य प्रमाणात खाद्य पुरवावे.
- पक्ष्यांचे खाद्य कमी करून किंवा पक्ष्याला दळलेली मका देऊन या रोगावर नियंत्रण ठेवता येईल.
- पक्ष्याला लिव्हर टॉनिक ७ ते १० मिलिप्रती १०० पक्षी आणि पक्ष्यांची कार्यक्षमता वाढवणारे औषध उदा. स्पेंग या सारखी औषधे द्यावीत.

५. श्‍वसन नलिकेचा आजार (सीअारडी) - 
- हा अाजार मायक्राोप्लाझमा गॅलिसेप्टीकम या जिवाणूमुळे होतो.
- या अाजारात पक्ष्यांच्या श्‍वसनलिकेतून घर-घर असा आवाज येतो आणि नलिकेत चिकट द्रव साचतो. त्यामुळे पक्ष्यांना श्वसनाचा त्रास होऊन पक्षी मरतात.
- पक्ष्यांचे वजनही कमी होते.

उपाय - 
- पक्ष्यांना तज्‍ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची मात्रा द्यावी. प्रती १०० पक्ष्यांना ५ मिली याप्रमाणात अ, डी३, इ अाणि के या जीवनसत्वांची मात्रा द्यावी.
- पक्ष्यांचे शेड वेळोवेळी निर्जंतुक करावे.

रक्ती हगवण (कॉक्सीडीअाॅसीस) :
- हा रोग आयमेरिया या परजीवीमुळे होतो. यामध्ये पक्ष्यांना रक्तीहगवण होते.
- हा रोग प्रामुख्याने शेडमधील लिटर किंवा भुसा ओला झाल्यामुळे आणि अमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे होतो.

उपाय - 
१. यासाठी आपण त्यांना ॲम्प्रोलीअम पावडर प्रतिलिटर पाण्यात १ ग्रॅम मिसळून ७ दिवस द्यावी. पाच लिटर पाण्यात १ ग्रॅम जीवनसत्व के मिसळून द्यावे.
- जीवनसत्व एडी३, जीवनसत्व इके प्रती १०० पक्ष्यांना ५ मिली या प्रमाणात द्यावे.
३. शेडमधील भुसा बदलून घ्यावा व नव्याने चुना मिश्रित भुसा टाकावा.

हिवाळ्यातील व्यवस्थापनाच्या मुख्य बाबी - 
- शेडचे छत उघडे किंवा फुटलेले असल्यास त्याची डागडुजी करून घ्यावी यामुळे थंड हवेमुळे होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येईल.
- चांगल्या पडद्यांच्या वापर करावा. तसेच वातावरणातील तापमानानुसार पडदे उघडे व बंद करावेत.
- पिल्लांना कृत्रिम पद्धतीने ऊब देण्याचे व्यवस्थापन ठेवावे.
- वीजपुरवठा खंडित जाल्यास कृत्रिम ऊर्जेसाठी पर्यायी व्यवस्था करावी.
- शेडमधील जागेनुसार पक्ष्यांच्या संख्येत वाढ करावी.
- गादीचा थर (लिटर)ची जाडी ३ ते ४ इंच वाढवून त्याला वेळोवेळी हलवून घ्यावे.
- पडदे बंद असताना एक्झॉस्ट पंख्याची व्यवस्था करावी.
- खाद्यामध्ये तेल व स्निग्ध घटकांचे प्रमाण वाढवून खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण वाढवावे.
- खाद्याच्या भांड्याच्या संख्येमध्ये वाढ करावी.
- लहान पिलांना पिण्याचे पाणी कोमट करून द्यावे.
- थंडीमुळे पक्ष्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे औषधे किंवा लस देण्यापूर्वी ४-५ तास पाण्याची भांडी काढून ठेवावी.
- शुद्ध व जंतुविरहीत पाण्याचा पुरवठा करावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार व लसीकरण करून घ्यावे.

संपर्क - डॉ. सतीश मनवर, ९७३०२८३२१२
(स्नातकोत्तर पदव्युत्तर व पशू विज्ञान संस्था, अकोला 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: