Last Update:
 
ऍग्रो प्लस

भाज्या सुकविण्यासाठी वापरा ड्रायर
-
Friday, December 02, 2016 AT 06:45 AM (IST)
Tags: agro plus
फळभाज्या अाणि पालेभाज्या सुकविण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ड्रायर उपलब्ध अाहेत. या ड्रायरचा उपयोग करुन ग्राहकांची गरज, अावड लक्षात घेऊन घरगुती स्तरावर चांगला फायदा मिळवता येतो.
विक्रम कड

सुकविलेल्या भाजीपाल्याला परदेशात व देशांतर्गत भरपूर मागणी आहे. निर्यात करण्यासाठी केंद्रशासनातर्फे सबसिडी दिली जाते. अपेडा़ ही उच्च संस्था शेतीमालाच्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीबाबत भरीव मदत करते. प्रत्येक देशाचे प्रक्रियाकृत पदार्थांसाठी खास मापदंडक आहेत. निर्यात करण्यापूर्वी प्रक्रियायुक्त मालाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राखणे गरजेचे असते. त्यात प्रामुख्याने पाण्याचा अंश, भौतिक गुणधर्म, सूक्ष्मरोग जंतूंची संख्या इ. कोलाय, सालमोनेला सारखे घातक रोगजंतू, कीडनाशकांचा अंश, वजन, पॅकेजिंग, चवपरीक्षण गुणधर्म इत्यादींचा मुख्यत्वे विचार केला जातो.

सुकविण्याची क्रिया - 
- तांत्रिकदृष्ट्या फळभाज्या सुकविताना हवेच्या सानिध्यात पसरविलेल्या पदार्थातील ओलावा वाफेच्या रूपाने बाहेर उडून जातो. तो एका विशिष्ट पातळीपर्यंत आल्यावर पुढे तो ओलावा त्या पदार्थांपासून बाहेर काढणे कठीण बनते.
- सुकविण्याची प्रक्रिया करण्यासाठी उष्णता व हवेच्या झोताची गरज असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रायरचा वापर केला जातो. यामध्ये मेकॅनिकल किंवा कॅबिनेट ड्रायर, ट्रे ड्रायर, बॅच टाइप ड्रायर, व्हॅक्यूम ड्रायर, स्प्रे ड्रायर अशा अनेक आधुनिक ड्रायरचा समावेश होतो.
- सुकविलेल्या पदार्थांचा दर्जा, टिकवण क्षमता, चवपरीक्षण, पुर्नपाणी शोषण क्षमता यांचा प्रामुख्याने आंतर्भाव होतो.
- सुक्या मालाची प्रत प्रामुख्याने सुकवणी यंत्राचे तापमान (ड्रायरचे), सुकविण्यासाठी टाकलेल्या मालाचा प्रकार व आकारमान, ट्रे वरती पसरविलेल्या थराची जाडी, त्यातील सुरवातीची आर्द्रता, ब्लोअरचा वेग, इत्यादींवर अवलंबून असते. ड्रायरमध्ये टाकलेला ओला माल (पालेभाज्या) गरम हवेने तापविला जातो.
- पदार्थातील पाण्याचा अंश हळूहळू बाष्पीभवनाचे केशाकर्षण पद्धतीने मालाच्या पृष्ठभागावर येतो. नंतर आतील ब्लोअरच्या झोताने ती वाफ बाहेर फेकली जाते. ती ड्रायरच्या चिमणीतून सतत बाहेर पडत असते. सुकविण्याची क्रिया सावकाश नियंत्रित केल्याने सुक्या पदार्थास जरी जास्त वेळ लागला, तरी त्याची गुणप्रत चांगली मिळते व तो अधिक काळ चांगला टिकतो.
- वाळवणी यंत्रातील तापमान जर ७० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवले तर पदार्थातील ओलावा जलद गतीने उडून जाईल. परंतु, त्या पदार्थाच्या पृष्ठभागावर कडक पापुद्रा तयार होऊन त्यातून आतील बाष्प लवकर बाहेर पडणार नाही. परिणामी त्यात अधिकच ओलावा राहील. तसेच आत ठेवलेल्या मालाचे सुकविण्याचे तापमान ७० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राखल्याने पदार्थातील साखर करपली जाईल. परिणामी, पदार्थ अधिकच लालसर, तपकिरी काळसर होईल. म्हणून पालेभाज्या - फळे सुकविताना तापमान नेहमी ५० ते ६० अंश सेल्सिअस ठेवावे. त्यामुळे त्या पदार्थाचा दर्जा उत्तम राहतो. पदार्थ चांगला टिकतो.

सुकवणी यंत्रे - 
१) सौर ऊर्जा वाळवणी यंत्र - 
नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून सौरऊर्जा वाळवणी यंत्राचा वापर करतात. या ड्रायरमध्ये भाज्या वाळविण्यास खूप वेळ लागतो. पदार्थाचे तापमान रात्री खूपच खाली जाते.
२) कॅबिनेट ड्रायर - 
हा ड्रायर घरगुती वापरासाठी सुलभ, स्वस्त, वापरण्यास सोपा आहे. यात हवेच्या झोतासाठी फॅन, गरम हवेसाठी हिटर व आतील वाफ बाहेर खेचण्यासाठी ब्लोअर बसविलेले असतात. आत माल ठेवण्यासाठी एकावर एक ट्रे ठेवलेले असतात. तापमान हवे तसे नियंत्रित करता येते. वाळविण्याची क्रिया सतत दिवस-रात्र चालू ठेवता येते. त्यामुळे वेळ कमी लागतो.
३) व्हॅक्यूम ड्रायर - 
यामध्ये व्हॅक्यूम पंपाच्या आधाराने आतील भागात निर्वात पोकळी निर्माण केली जाते. त्यातील व्हॅक्यूमच्या दाबामुळे वाळवण्यास टाकलेल्या मालातील पाणी पृष्ठभागावर येते व ते अगदी कमी तापमानास २०-२५ अंश सेल्सिअस तापमानाला वाफेत रूपांतरित होऊन बाहेर द्रवरूपात खेचले जाते. परिणामी, माल चांगला सुकवला जातो. त्यामुळे सुकविलेल्या मालाचा रंग, स्वाद, चव, पोत, आकारमान उत्तम राहते. आहारमूल्ये टिकवली जातात. या ड्रायरची किंमत जास्त असते.

याशिवाय भाजीपाला सुकविण्यासाठी वेगवेगळ्या देशात विविध वाळवणी यंत्राचा वापर करतात. त्यात प्रामुख्याने स्क्रीन कन्व्हेअर ड्रायर, टॉवर ड्रायर, रोटरी ड्रम ड्रायर, फ्लूईड ब्रेड ड्रायर, ड्रम ड्रायर, फ्रिज ड्रायर इत्यादी अद्ययावत यंत्रांचा समावेश असतो.

संपर्क - विक्रम कड, ९६२३०४२०७३
(काढणीपश्चात तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
.. 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: