Last Update:
 
ऍग्रो प्लस

नव्या शेतमालाच्या हेजिंगसाठी चांगली संधी
-
Friday, December 02, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
मक्याच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर आणि फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती १ टक्क्याने कमी आहेत. सोयाबीनच्या सध्याच्या स्पॉट किमती व डिसेंबर आणि फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती अनुक्रमे ३,१३१, ३,१२२ व ३,२९८ रुपये आहेत. सर्वच शेतमालाच्या किमतीत पुढील सप्ताहात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.
डाॅ. अरुण कुलकर्णी

गेल्या सप्ताहात स्पॉट बाजारात आवक वाढू लागली. मागणीपण वाढू लागली आहे. फ्युचर्स बाजारात त्यामुळे साखर वगळता इतर सर्व पिकांचे भाव वाढले. मात्र ही भाववाढ मर्यादित होती. सर्वांत अधिक वाढ खरीप मक्यामध्ये (२.१ टक्के) होती. मिरची, गहू व हळद यांचे फेब्रुवारी नंतरचे फ्युचर्स भाव वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने सध्याच्या स्पॉट भावांपेक्षा कमी आहेत. मिरची, हळद व गहू यांच्या फ्युचर्स किमती त्यांच्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा अनुक्रमे २९, ९ व ५ टक्क्यांनी कमी आहेत. ज्यांना या महिन्यात आपला नवा माल विकायचा आहे, त्यांनी हेजिंगचा विचार करावा. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मिरची
मिरचीच्या (डिसेंबर २०१६) किमती या सप्ताहात १२,६६४ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) १२,६१७ रुपयांवर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा एप्रिल २०१७ मधील फ्युचर्स किमती नवीन पिकाच्या आवकेमुळे २८.७ टक्क्यांनी कमी आहेत (८,९९६ रु.), जर काही साठा असेल तर तो लगेच विकणे योग्य ठरेल.

खरीप मका
गेल्या दोन महिन्यांत खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१६) किमती प्रथम वाढत जाऊन १,४४४ रुपयांपर्यंत गेल्या. त्यानंतर त्या घसरत जाऊन १८ ऑक्टोबर रोजी १,३३९ रुपयांवर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १,४२९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) १,४४२ रुपयांवर आहेत. या वर्षी पीक समाधानकारक आहे. यापुढे आवक वाढेल. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती १,४२९ रुपयांवर आल्या आहेत.

साखर
साखरेच्या (डिसेंबर २०१६) किमती या सप्ताहात १.७ टक्क्यांनी घसरून ३,३९९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ३,५६९ रुपयांवर आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१७) च्या फ्युचर्स किमती ३,५९४ रुपयांवर आल्या आहेत. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. साठा पुरेसा आहे. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

सोयाबीन
सोयाबीनच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१६) किमती गेल्या दोन महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने वाढून ३,१२२ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३,१३१ रुपयांवर आल्या आहेत. मार्च २०१७ च्या फ्युचर्स किमती ३,२९८ रुपयांवर आल्या आहेत. पुढील सप्ताहात किमतीत किंचित वाढ अपेक्षित आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१६) किमती गेल्या दोन महिन्यांत ६,८८६ ते ७,३२४ रुपयांदरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने चालू सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून ७,२४६ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ७,६३० रुपयांवर आल्या आहेत. नवीन पिकाच्या अपेक्षेमुळे मे २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.६ (६,९७४ रु.) टक्क्यांनी कमी आहेत. मागणी कमी आहे. साठा पुरेसा आहे. या वर्षीचे उत्पादनसुद्धा समाधानकारक आहे. किमती कमी होण्याचा संभव आहे.

गहू
गेल्या दोन महिन्यांत गव्हाच्या (डिसेंबर २०१६) किमती १३ ऑक्टोबरपर्यंत १,७५० रुपयांच्या आसपास होत्या. त्यानंतर त्या वाढत होत्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून २,०४४ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती २,१०० रुपयांवर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१७ मधील फ्युचर्स किमती स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी (२,०६० रु.) कमी आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

गवार बी
गेल्या दोन महिन्यांत गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१६) किमती घसरत होत्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी वाढून ३,३०३ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ३,३८५ रुपयांवर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (दिल्ली) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१७ मधील फ्युचर्स किमती ०.३ टक्क्यांनी (३,३९६ रु.) अधिक आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस
गेल्या दोन महिन्यांत कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१६) किमती घसरत होत्या. या सप्ताहात त्या किंचित (०.३ टक्क्यांनी) वाढून १९,१७० रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती १८,८३० रुपयांवर आल्या आहेत. मार्च २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.१ टक्क्यांनी (१९,६०० रु.) अधिक आहेत. पुढील काही दिवस किमतींत वाढ अपेक्षित आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गासडी).

arun.cqr@gmail.com 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: