Last Update:
 
ऍग्रो प्लस

संवर्धन गिफ्ट तिलापिया माशांचे...
-
Wednesday, December 07, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
मत्स्य तळ्यामध्ये एकलिंगी तिलापिया माशांचे संवर्धन करणे फायदेशीर ठरते. एकलिंगी गिफ्ट तिलापिया मासे जलद गतीने वाढतात व त्यांचे आकारदेखील एकसारखे मिळतात. बारमाही तलावात तीन वेळा गिफ्ट तिलापिया माशांचे संवर्धन करणे शक्य आहे. स्थानिक बाजारपेठेत या माशाला चांगली मागणी आहे.
उमेश सूर्यवंशी

तिलापिया माशाला पाण्यातील चिकन असेदेखील म्हटले आहे. तिलापिया माशाची जात जलद गतीने वाढते.

गिफ्ट तिलापिया माशाची वैशिष्ट्ये
- ही जात सर्व प्रकारचे पूरक खाद्य खाते.
- हंगामी तलावात संवर्धन करता येते. तलावात बीज संचयन घनतादेखील जास्त ठेवता येते.
- रोगप्रतिकारक क्षमतादेखील जास्त असते.
- बारमाही तलावात तीन वेळा तिलापिया जातीच्या माशांचे संवर्धन करणे शक्य आहे.
- संवर्धन करण्यापूर्वी, मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य यांची परवानगी घेणे आवश्‍यक असते. यासाठी जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- मत्स्य तळ्यामध्ये एकलिंगी तिलापिया माशांचे संवर्धन करणे फायदेशीर ठरते. एकलिंगी तिलापिया मासे जलद गतीने वाढतात व त्यांचे आकारदेखील एकसारखे मिळतात.
- गिफ्ट माशाला जिनेटीकली इम्प्रुव्हड फार्म तिलापिया असे म्हटले जाते. या माशाला बाजारपेठेतदेखील चांगली मागणी आहे.

माशांच्या संवर्धनासाठी अावश्यक बाबी - 
१) तळ्याची निवड - 
- संवर्धनासाठी कोणतेही बारमाही गोडे पाणी असलेले तळे किंवा टाकी वापरावी. तळ्याची किंवा टाकीची खोली सर्वसाधारणपणे १.५ ते २ मीटर एवढी असावी.
- तळ्यातील पाण्याच्या खोलीची पातळी १ मीटरपेक्षा खाली जाऊ नये. जेणेकरून माशांचे संवर्धन करणे सोईचे होईल.
- कमी कालावधीच्या गिफ्ट माशांच्या संवर्धनासाठी हंगामी तळेदेखील वापरता येते. हंगामी तळ्यामध्ये पाण्याची खोली सर्वसाधारणपणे १ ते १.२५ मीटरपर्यंत असावी.
- मत्स्य तळ्याची निवड करताना तळ्यातील माती पाणी टिकवून ठेवणारी असावी. तळ्यात पाण्याचा पुरवठा सुरळीत असावा. तळे कुठल्याही पूरग्रस्त भागात नसावे. वापरात नसलेले किंवा दलदलीचे तळे त्यातील पाणी व गाळ काढून, तळ्याच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून व तळ्याचे नूतनीकरण करून वापरले जाऊ शकते.
- मत्स्य तळ्यामध्ये पाणी आत घेण्याची व पाणी बाहेर सोडण्याची व्यवस्था करावी. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांची जैवसुरक्षा लक्षात घेता तळ्याच्या बंधाऱ्याची सर्वसाधारण उंची, पाण्याचे व्यवस्थापन आणि इतर जैवसुरक्षा उपाय योजना गिफ्ट माशांचे संवर्धन करताना अवलंबिणे महत्त्वाचे ठरतात.
- तळ्यातील पाणी नैसर्गिक नदी, नाले, ओढे इ. मध्ये सोडण्यापूर्वी व्यवस्थित उपचार करून सोडावे.
- मासे पकडताना माशांची अंडी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- पक्षी प्रतिबंधक जाळे किंवा पक्षी तळ्याकडे घाबरून येणार नाहीत, असे उपकरणे तळ्यामध्ये बसवावीत.
- तळ्याच्या बंधाऱ्याची उंची मोठी व पुरेशी ठेवावी जेणेकरून मासे तळ्याबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी
- तळ्याला पाणी बाहेर सोडण्यासाठी दरवाजा बसविला असेल तर अशा दरवाजास व्यवस्थित आस असलेले जाळे बसवावे. जेणेकरून मासे, माशांची अंडी व माशांची पिले इतर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात जाणार नाहीत.
- माशांचे संवर्धन करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती घेऊन मत्स्य संवर्धनास सुरवात करावी.

२) तळ्याची संचयन पूर्व तयारी - 
- मत्स्य तळे नवीन असल्यास तळ्यामध्ये चुना मारून पाणी भरून घ्यावे.
- मत्स्य तळे जुने असल्यास तळ्यामधील नको असलेले मासे व तण काढून टाकावेत.
- नको असलेले मासे व इतर परपोशी मासे किंवा तळ्यातील इतर जलचर प्राणी जाळ्याचा वापर करून काढावेत. तळ्यातील पाणी पूर्णपणे काढून तळे रिकामे करून तळे सूर्यप्रकाशात सुकवून नको असलेले मासे व इतर जलचर प्राणी यांच्यावर नियंत्रण ठेवता येते.
अ) चुना मारणे ः
- आम्लयुक्त तळे किंवा टाकीची उत्पादन क्षमता अल्कली तळे किंवा टाकीपेक्षा कमी असते. तळ्याचा सामू नियंत्रित ठेवण्यासाठी चुना मारून घ्यावा.
- तळ्यात चुना मारल्याने तळ्याचा सामू वाढण्यास मदत मिळते. सामूचा चढ उतार टळतो, इतर परजीवी मरण पावतात व सेंद्रिय पदार्थांची कुजवणूक लवकर होते इ.
- सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी २०० ते २५० किलो चुना मारावा. तळे नवीन असल्यास पावसाच्या पाण्याने अथवा इतर पाण्याने चुना मारून झाल्यानंतर भरून घ्यावे.
ब) खतांचा वापर - 
- खतांच्या वापराचे नियोजन तळ्यामधील मातीची गुणवत्ता ठरवून करावे. जैविक व अजैविक खतांचा वापर संयोजन करून वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
- खते वापरण्याचे सुधारित व्यवस्थापन माशांची वाढ, तळ्यामधील उपलब्ध खाद्य, तळ्यामधील भौतिक व रासायनिक स्थिती तसेच हवामान स्थितीचा अभ्यास करून करता येते.
- जैविक खतांचा वापर चुना मारून झाल्यानंतर ३ दिवसांचे अंतर ठेवून करावा.
- प्रति हेक्टरी ५००० किलो शेणखत वापरावे. अजैविक खतांचा वापर जैविक खतांचा वापर केल्यानंतर १५ दिवसांनी करावा.


३) मत्स्य बीज संचयन - 
तळ्यामध्ये जैविक व अजैविक खतांचा वापर केल्यानंतर तळे मत्स्य बीज संचयनासाठी १५ दिवसांनंतर तयार होते.
४) तळ्यामधील संवर्धन - 
- एका महिन्याचा कालावधी झालेले २ ते २.५ सेंमी आकाराचे मत्स्य बीज मत्स्य संवर्धन तलावात सोडावे.
- मत्स्य बीजाची संचयन घनता तलावात ३ ते ५ नग प्रति चाैरस मीटर एवढी ठेवावी. जेणेकरून जीविताचे प्रमाण व मत्स्य बीजाची वाढ चांगली मिळेल.

मत्स्य बीज संचयन पश्‍चात व्यवस्थापन - 
१) कृत्रिम खाद्य पुरविणे
- मत्स्य तळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या खाद्यापेक्षा जास्त खाद्य मत्स्य बीजाला आवश्‍यक असते.
- तरंगणाऱ्या स्वरूपातील कृत्रिम खाद्य तसेच खाद्य शेवया बीजाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. खाद्यामुळे तळ्यातील पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही व मत्स्य बीजाच्या जीविताचे प्रमाण अधिक मिळेल याची काळजी घ्यावी.
२) खतांचा वापर
दर महिन्याला प्रति हेक्टरी १००० किलो जैविक खत वापरावे. अजैविक खत लागोपाठ महिन्याच्या मध्यानंतर जैविक खतांच्या सोबत वापरावे. खतांचा अति वापर करणे टाळावे.
३) मत्स्य बीज नमुना तपासणी
नियमित तपासणी करून मत्स्य बीजाच्या निकोप वाढीची व अारोग्याची खात्री करून घ्यावी.
४) वाढलेले मासे पकडणे
सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर तळ्यामधील मासे पकडायला सुरवात करावी. माशांचे वजन ५ ते ६ महिन्यांत सरासरी ५०० ग्रॅमपर्यंत मिळू शकते. माशांना पाण्याची पातळी अंशिक कमी करून किंवा जाळ्याचा वापर करून पकडावे. कधी कधी तळे पूर्णपणे रिकामे करूनदेखील मासे पकडता येतात.

संपर्क - उमेश सूर्यवंशी, ९०९६९००४८९
(मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर) 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: