Last Update:
 
ऍग्रो प्लस

युरिया प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पाैष्टिकता
-
Tuesday, December 13, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
वाळलेल्या चाऱ्याचा चांगल्या प्रकारे वापर करण्याच्या दृष्टीने गव्हाचे काड व भाताचा पेंढा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. अशा प्रकारच्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास व प्रक्रिया केलेला चारा जनावरांना खाऊ घातल्यास जनावरांची गरज भागेल, तसेच त्यांना प्रथिनयुक्त चारा उपलब्ध होईल.
डॉ. दिलीप देवकर, संभाजी जाधव

जनावराची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी, दुभत्या जनावरापासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी कामाचा समतोल असणे आवश्यक आहे. खरीप हंगाम वगळता जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे त्यांना भाताचा पेंढा व गव्हाचे काड मोठ्या प्रमाणात खाऊ घातले जाते. भाताचा पेंढा व गव्हाचे काड यांचा वाळलेला चारा कठीण व तंतुमय असून, त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असते. या चाऱ्याची पचनीयता व चवही समाधानकारक नसते. अशा प्रकारच्या चाऱ्यामुळे जनावरांची पोषणद्रव्यांची गरज पूर्ण होत नसल्याने जनावरांना पशुखाद्यासारखा महागडा पूरक आहार द्यावा लागतो. वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास वैरणीची पचनीयता वाढते. जनावरे जास्त चारा खातात, चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा परिणाम वाढतो.

युरिया प्रक्रिया
१. प्रक्रियेकरिता सिमेंट काँक्रिटचा ओटा किंवा सारवलेली स्वच्छ जागा निवडावी.
२. वाळलेला १०० किलो चारा ओट्यावर व्यवस्थित पसरून ४ ते ६ इंच उंचीचा समान थर तयार करावा.
३. प्लॅस्टिकच्या टाकीत ६० ते ६५ लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलोग्रॅम युरिया पूर्णपणे विरघळून घ्यावा. मोठी (१०० लिटरची) प्लॅस्टिक टाकी नसल्यास प्लॅस्टिकच्या बादलीत १० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४०० ग्रॅम युरिया विरघळून घ्यावा.
४. युरिया व पाण्याचे तयार केलेले निम्मे मिश्रण वाळलेल्या चाऱ्यावर समप्रमाणात झारीने हळूहळू फवारून घ्यावे.
५. लाकडी दाताळ्याच्या साहाय्याने किंवा हाताने चाऱ्याचा थर उलटा करावा.
६. उर्वरित मिश्रणात अर्धा किलो मीठ विरघळून पूर्ण मिश्रण वरील पद्धतीने चाऱ्यावर फवारून घ्यावे.
७. चाऱ्याचा थरावर थर देऊन भरपूर दाब देऊन कोपऱ्यात ढीग करावा.
८. चाऱ्याचा ढीग गोणपाटाने किंवा प्लॅस्टिक कागदाच्या साहाय्याने पूर्णपणे झाकून ठेवावा. पूर्ण चार आठवडे ढीग उघडू नये व हलवू नये.
९. चार आठवडे उबविल्यानंतर वाळलेल्या चाऱ्याचा रंग पिवळा सोनेरी होऊन चारा खाण्यास योग्य असा तयार होतो.

प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
१. प्रत्येक प्रक्रियेच्या वेळी ताजे मिश्रण करून प्रक्रिया करावी.
२. प्रत्येक वेळी प्रक्रिया केल्यानंतर तयार केलेला ढीग भरपूर दाब देऊन घट्ट करावा. दाब न दिलेल्या ढिगातील प्रक्रिया केलेल्या चाऱ्यावर परिणामकारक प्रक्रिया होत नाही.

प्रक्रिया केलेला चारा कसा खाऊ घालावा
१. ढिगातील चारा काढताना प्रत्येक वेळी समोरच्या बाजूचा आवश्यक तेवढा भाग काढून घेऊन ढीग पूर्ववत सरळ करून पुरेसा दाब ठेवावा.
२. प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालण्यापूर्वी सुमारे एक तास पसरून ठेवावा, जेणेकरून वैरणीतील अमोनिया वायूचा वास निघून जाईल.
३. प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची वेगळी चव एकदम जनावरांना न आवडल्याने जनावरे चारा खात नसतील, तर असा चारा इतर प्रक्रिया न केलेल्या चाऱ्यामध्ये थोडा थोडा मिसळून खायला घालावा. हळूहळू चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
४. चारा जनावरांना खायला देण्यास सुरवात केल्यानंतर १५ दिवसांनी जनावरांचे दुग्धोत्पादन, शरीरस्वास्थ्य व शारीरिक वाढ याबाबत निरीक्षण करावे. चारा सलग पद्धतीने जनावरांना खायला दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतील.
५. प्रक्रियायुक्त चारा जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर किंवा कुट्टीबरोबर खाऊ घालता येईल.
६. चारा दुभत्या, गाभण गाई- म्हशींना तसेच ६ महिन्यांवरील वासरांना कोणत्याही प्रमाणात खाऊ घालता येईल.

युरियाचा खाद्यात वापर करताना घ्यावयाची काळजी
१. शिफारस केल्यापेक्षा जास्त प्रमाणात चारा खाऊ घातला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. चारा ४ महिन्यांच्या वरील वयाच्या दुभत्या/ कामाच्या/ वाढत्या वयाच्या जनावरांनाच खाऊ घालावा.
३. पहिले १० ते १५ दिवस चारा कमी प्रमाणात जनावरांना खायला द्यावा व हळूहळू प्रमाण वाढवावे.
४. चारा जनावरांना दिवसाच्या कमी तापमानाच्या वेळी म्हणजेच सकाळी, संध्याकाळीच खाऊ घालावा.
५. जनावरांना जास्तीच जास्त पाणी प्यायला देण्याची व्यवस्था करावी.
६. चारा खाऊ घालताना जनावरांना रोज कमीत कमी ४ ते ५ किलो हिरवी वैरण देण्याची व्यवस्था करावी किंवा अ जीवनसत्त्वयुक्त खाद्याचा पुरवठा करावा.
७. चारा खाऊ घालताना सोयाबीनचे अंबोण, सोयाबीनचे पदार्थ जनावरांना खायला देऊ नयेत.
८. पशुखाद्यामध्ये प्रतिकिलो १० ते १५ ग्रॅम युरिया असतो व युरिया मळीची प्रक्रिया केलेल्या ५ ते ६ किलो चाऱ्यामध्ये सुमारे १०० ग्रॅम युरिया असतो. युरिया मळीची प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालताना अशा चाऱ्याद्वारे व पशुखाद्याद्वारे मिळून जनावरांना रोज १९० ते २०० ग्रॅमपेक्षा जास्त युरिया दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

युरियामुळे जनावरांना होणारी विषबाधा
वरील पद्धतीने युरिया मळी मिश्रण केलेली वैरण जनावरांना खाऊ घातल्यास जनावरांना विषबाधा होणार नाही. परंतु, जनावरांनी जर युरियाचे रिकामे पोते चाटून युरिया पोटात गेल्यास किंवा युरिया मळीचे मिश्रण चुकीमुळे पिल्यास जनावरांना युरियाची विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युरियाची विषबाधा झाल्यास जनावरांमध्ये दिसून येणारी लक्षणे
- उदासीनता व मूर्च्छा येणे, तोंडातून जास्त प्रमाणात लाळ बाहेर पडणे
- श्वासोच्छवासात अडथळा येणे, कष्टदायक श्वासोच्छवास, थरथरणे
- शारीरिक असंबद्धता, वारंवार लघवी होणे व शेण टाकणे.
- पुढचे पाय ताठ होतात व जमिनीवर जनावर आडवे पडते. तडफडणे व हंबरणे
- पोट फुगणे, प्राथमिक लक्षणे दिसल्यापासून अर्ध्या ते अडीच तासांत जनावर मृत्युमुखी पडते.

उपचार - 
जनावरांना युरिया विषबाधा झाल्याचे दिसून आल्यास सुमारे २० ते ३० लिटर थंड पाणी पाजावे. म्हणजे पोटातील दाह कमी होऊन युरियाचे विघटन होण्यास सुरवात होईल.

संपर्क - डॉ. दिलीप देवकर, ७५८८६९५३४८
(गोसंशोधन विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: