Last Update:
 
ऍग्रो प्लस

नायसीन : दुग्धपदार्थ टिकवण्यासाठी एक जैविक पर्याय
-
Thursday, December 15, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
रासायनिक पदार्थांऐवजी जैविक पदार्थांची अति सूक्ष्म मात्रा दुग्धपदार्थ टिकवण्यास समर्थ असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. रासायनिक पदार्थांचा प्रमाणबाह्य वापर अनेक वेळा हानिकारक ठरतो. यासाठी पारंपरिक भारतीय दुग्धजन्य पदार्थ अधिक चांगल्या रीतीने बनवून व नायसीनद्वारा टिकवून चांगली बाजारपेठ काबीज करता येते.
डॉ. धीरज कंखरे, डॉ. सोमनाथ माने

दुग्धपदार्थ जास्त काळ सुस्थितीत टिकवण्याची विविध उपायांचा अवलंब केला जातो. ३० अंश सेल्सिअस तापमान हानिकारक जिवाणूंची वाढ होण्यास पोषक असल्यामुळे या तापमानात दुग्धपदार्थ जास्त काळ टिकू शकत नाहीत. जैविक पदार्थ बहुतांशी सुरक्षित असून पदार्थाच्या गुणप्रतीवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. जैविक पदार्थ हे सूक्ष्म जिवांच्या चलनवलनात तयार झालेले असून, ते त्यांच्यापासून विविध भौतिक प्रक्रियांद्वारे वेगळे करून शुद्ध स्वरूपात मिळवलेले असतात. त्यामध्ये प्रामुख्याने नायसीन, डायॲसिटिलीन, मायक्रोगार्ड, रिऊटरीन यांचा समावेश आहे. या जैविक पदार्थांमध्ये अनेक हानिकारक जिवाणूंची वाढ रोखण्याची क्षमता असते. पदार्थ टिकवण्यासाठी लागणारे नायसीनचे प्रमाण फारच कमी आहे.

नायसीन
- नायसीन या जैविक पदार्थाचे उत्पादन आणि वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
- निसर्गात अाढळणाऱ्या स्ट्रेप्टोकोस लॅक्टिस प्रकारच्या जिवाणूपासून उत्पादित झालेले नायसीन हे एक सूक्ष्म जंतूनाशक आहे.
- नैसर्गिकरीत्या फार थोड्या प्रमाणात नायसीन हे दुधात आढळते. सध्या विविध जैवजंतूनाशकामध्ये नायसीनचा वापर सर्वात जास्त आणि व्यापारी तत्त्वावर केला जातो.
- चीज व त्याच्या इतर जाती टिकवण्यासाठी नायसीन वापरले जाते.
- नवीन उत्पादन बाजारात आणतात विशेषतः जिथे गुणवत्ता हा निकष लागू होतो. पदार्थ खराब न होऊ देणे, उत्पादनात (प्रक्रियेमध्ये) तापमान कमी ठेवणे व पदार्थ खराब न होण्यावर नियंत्रण ठेवणे. अशा प्रमुख वर्गवारीनुसार डेअरी उद्योगात नायसीनचा वापर होतो.
- दुग्धपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये अति उच्च तापमानाचा वापर केल्यामुळे पदार्थावर होणारे दुष्परिणाम नायसीनच्या वापरामुळे सुधारता येतात, कारण हानिकारक जिवाणूंचा नायनाट करण्यासाठी अति उच्च तापमानाची गरज असते. परंतु, नायसीन हानिकारक जिवाणूंची वाढ होऊ देत नसल्यामुळे उच्च तापमानाची गरज भासत नाही. परिणामी दुग्ध पदार्थातील अन्नघटकांची पौष्टिकता व गुणधर्म टिकून राहतात.
- नायसीनचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन १९५० मध्ये ॲम्पलीन अँड बॅरेट ली. कंपनी, ट्रोबीज, इंग्लंड येथे नायसॅपलीन या व्यापारी नावाने सुरू झाले. एक ग्रॅम नायसॅपलीनमध्ये २५,००० मायक्रोग्रॅम किंवा एक अब्ज रीडिंग युनिट शुद्ध नायसीन असते.
- नायसीन हे वेगवेगळ्या वर्गांच्या सूक्ष्म जीवजंतूंना प्रतिरोध करते. जसे ए, बी, ई, एफ, जी, के, एम आणि एन या वर्गातील स्ट्रेप्टोकोकाय, स्टेफाइलोकोकाय, निमोकोकाय काही बॅसिलस जाती व क्लॉस्ट्रीडीअम जातीतील जिवाणू नायसीन हे प्रामुख्याने ग्रॅम अधिक कोषधारक जिवाणू किंवा प्रतिरोधपणा हे त्या पदार्थावरील एकूण अतिसूक्ष्मजंतूंचे प्रमाण व पदार्थातील नायसीनचे प्रमाण यावर अवलंबून आहे.
- सुरवातीलाच पदार्थात अतिसूक्ष्म जंतूंचे प्रमाण जास्त असेल तर कार्यक्षमता कमी होते. म्हणून दुग्धपदार्थ तयार करताना स्वच्छता राखावी जेणेकरून सूक्ष्म जंतूंचे प्रमाण कमी राहून नायसीन चांगले कार्य बजावू शकेल. विशेषतः नायसीन हे ग्रॅम निगेटिव्ह जिवाणू, कवक आणि बुरशी विरुद्ध परिणामकारक नाही.
- नायसीन हे अपायकारक नाही हे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. नायसीनचा वापर करण्यास सर्वप्रथम परवानगी ब्रिटनने त्यांच्या देशात दिली. संयुक्त अन्न परिषद, जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या तज्ज्ञ समितीने नायसीनला सन १९६९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्वीकृती दिली. त्यांच्या शिफारशीनुसार ० ते ३३,००० युनिटस मानवाच्या प्रति किलो वजनासाठी किंवा ४०० युनिट्‌स प्रति ग्रॅम अन्नासोबत वापरता येऊ शकते. भारतात पूर्वीपासून नायसीन हार्डचीज व प्रोसेस्ड चीजमध्ये वापरास परवानगी आहे.
- नायसीन सोबतच अाणखी काही परिरक्षकांचा वापर पदार्थ टिकवण्याच्या दृष्टीने करणे फायदेशीर राहील.
- नारळाच्या पाण्याची टिकवणक्षमता वाढवण्याचे काम म्हैसूर येथील डिफेन्स फूड रिसर्च लॅबरोटरी येथे झाले अाहे.

नायसीन वापरण्याची पद्धत
- जैविक पदार्थ (बायोप्रिझर्वेटिव्ह) कसा व पदार्थ बनतेवेळी कुठल्या वेळी टाकावा यावर त्याची कार्यक्षमता अवलंबून असते.
मुख्यत्वे नायसीन ज्या पदार्थात वापरले आहे त्यात ते पूर्णपणे एकरुप झाले पाहिजे जेणेकरून त्याचा पदार्थातील सूक्ष्मजंतूंशी संपर्क येईल.
- नायसीन बाजारात तांबड्या व पांढऱ्या रंगाच्या भुकटीच्या स्वरुपात उपलब्ध आहे. नायसीन भुकटी किंवा त्याचे पाण्यात किंवा दुधात केलेले द्रावण दुग्धपदार्थात एकजीव करावे. नायसीनची विद्राव्यता तशी कमी आहे. द्रावणाच्या सामूवर त्याची विद्राव्यता अवलंबून असते.
- दोन सामू असलेल्या द्रावणात नायसीनचे विरघळण्याचे प्रमाण १२ टक्के आहे, तर पाच सामूच्या द्रावणात फक्त ४ टक्के आहे.
- वेगवेगळ्या दुग्धपदार्थात नायसीन ठराविक प्रमाणात मिसळून तो वेगवेगळ्या तापमानाला टिकवून नोंदी घेण्यात आल्या आहेत.
शास्त्रज्ञांनी विविध दुग्धपदार्थात नायसीनचा वापर केल्यामुळे त्यांच्या टिकविण्याच्या क्षमतेत झालेली वाढ पुढील तक्त्यातून दिसून येते. 

संपर्क : डॉ. धीरज कंखरे, ९४०५७९४६६८
(कृषी महाविद्यालय, धुळे)
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: