Last Update:
 
ऍग्रो प्लस

नवीन पिकांसाठी हेजिंगचा विचार करा
-
Friday, December 23, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
मिरचीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१७ मधील फ्युचर्स किमती नवीन पिकाच्या आवकेमुळे २९.२ टक्क्यांनी कमी आहेत. या वर्षी मका पिकाची आवक तसेच मागणी वाढत आहे. हळदीचे या वर्षीचे उत्पादन समाधानकारक आहे.
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

खरीप पिकांची आवक वाढती सध्या समाधानकारक होऊ लागली आहे. रब्बी पिकांचे उत्पादनसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतेक सर्वच पिकांचे दर उतरू लागले आहेत. त्यामुळे ‘एनसीडीईएक्स`ने सोयाबीन वरील ५ टक्क्यांचे अतिरिक्त मार्जिन २१ डिसेंबर २०१६ पासून रद्द केले आहे. 

या सप्ताहात सर्वच पिकांचे दर उतरले. हळदीतील घट सर्वाधिक (५.१ टक्के) होती. रबी पिकांचेसुद्धा मार्चनंतरचे दर उतरले. ज्यांच्याकडे मागील पिकाचा साठा असेल त्यांनी आता फार वाट न पाहता तो विकून टाकावा. नवीन पिकाच्या उत्पादकांनी हेजिंगचा विचार करावा.

गेल्या सप्ताहातील ‘एनसीडीईएक्स` व‘एमसीएक्स`मधील किमतीतील चढउतार - 
मिरची - 
मिरचीच्या (मार्च २०१७) किमती गेल्या दोन महिन्यांत वाढत होत्या (रु. ८,८२० ते रु. ८,९९६). या सप्ताहात त्या रु. ८,८१८ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) रु. १२,४५५ वर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१७ मधील फ्युचर्स किमती, नवीन पिकाच्या आवकेमुळे २९.२ टक्क्यांनी (रु. ८,८१८)कमी आहेत. जर काही साठा असेल तर तो लगेच विकणे योग्य ठरेल.

खरीप मका - 
गेल्या दोन महिन्यांत खरीप मक्याच्या (जानेवारी २०१७) किमती प्रथम घसरत रु. १,३४२ पर्यंत गेल्या. त्यानंतर त्या वाढत १८ नोव्हेंबर रोजी रु. १,४७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी घसरून रु. १,४११ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४४० वर आहेत. या वर्षी पीक समाधानकारक आहे. यापुढे आवक वाढेल. मागणीपण वाढती आहे. मार्चच्या फ्युचर्स किमती रु. १,४३७ वर आल्या आहेत.

साखर - 
साखरेच्या (मार्च २०१७) किमती गेल्या दोन महिन्यांत घसरत होत्या. (रु. ३,८३० ते रु. ३,४८०). गेल्या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,५९७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,५६१ वर स्थिर आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१७) च्या फ्युचर्स किमती रु. ३,५९७ वर आल्या आहेत. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. साठा पुरेसा आहे. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.

सोयाबीन - 
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती गेल्या दोन महिन्यांत घसरत होत्या. (रु. ३,३३५ ते रु. ३,०५०). गेल्या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,०२६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०३६ वर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती रु. ३,१५२ वर आल्या आहेत. पुढील सप्ताहात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

गहू - 
गेल्या दोन महिन्यांत गव्हाच्या (जानेवारी २०१७) किमती रु. १,७५४ वरून रु. २,१४८ पर्यंत चढल्या होत्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १,९९७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती रु. २,१०० वर आल्या आहेत. मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती स्पॉट किमतींपेक्षा १५.२ टक्क्यांनी (रु. १,७८१)कमी आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत. लांबवरचा कल उतरता आहे.

गवार बी - 
गेल्या दोन महिन्यांत गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती घसरत होत्या (रु. ३,७०७ ते रु. ३,१५२). या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. ३,२२६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,२५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (दिल्ली) किमतींपेक्षा मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी (रु. ३,३१५) अधिक आहेत . पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.

कापूस - 
गेल्या दोन महिन्यांत कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती वाढत (रु. १८,३८० ते रु. १९,४१०)होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १८,९२० वर आल्या आहेत. स्पॉट किमती रु. १८,६६८ वर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.६ टक्क्यांनी (रु. १९,२५०) अधिक आहेत . यापुढे मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गासडी).

हळद - 
हळदीच्या फ्युचर्स (मार्च २०१७) किमती गेल्या दोन महिन्यांत रु. ७,३५२ वरून रु. ६,७३२ पर्यंत उतरल्या होत्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने चालू सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,८२० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,७१५ वर आल्या आहेत. नवीन पिकाच्या अपेक्षेमुळे जून २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १०.२ टक्क्यांनी (रु. ६,९२८)कमी आहेत . मागणी कमी आहे. साठा पुरेसा आहे. या वर्षीचे उत्पादनसुद्धा समाधानकारक आहे. किमती कमी होण्याचा संभव आहे. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: