Last Update:
 
ऍग्रो प्लस

चेरी बनवून करा दुधी भोपळ्याचे मूल्यवर्धन
-
Friday, December 23, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुधी भोपळा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे चेरी बनवून दुधी भोपळ्याचे मूल्यवर्धन करता येते. दुधी भोपळ्यापासून बनविलेली चेरी हवाबंद पिशवीत ५ ते ६ महिन्यांपर्यंत टिकू शकते.
सचिन पाटील, मुरलीधर इंगळे

दुधी भोपळ्यामध्ये मुख्यतः भरपूर प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दुधी भोपळा मुळातच थोडासा गोडसर चवीचा असल्यामुळे चेरी बनवताना कमी प्रमाणात साखर लागते. उत्तम प्रतीचे, मध्यम अाकाराचे भोपळे चेरी बनविण्यासाठी निवडावेत. कठीण व टणक असलेल्या भोपळ्यापासून बनवलेल्या चेरीचा दर्जाही कमी असतो. वजन व उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी अाणि यकृतामधील जळजळ कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याची चेरी उपयुक्त अाहे.

दुधी भोपळ्यातील पोषक घटक
जीवनसत्त्व क - १० मिलि ग्रॅम/१०० ग्रॅम
रिबोफ्लेविन - ०.०२२ मिलि ग्रॅम
थायमिन - ०.०२ ग्रॅम/मिलि ग्रॅम
नायसीन - ०.३२० मिलि ग्रॅम
जीवनसत्त्व बी-६ - ०.०४० मिलि ग्रॅम
जीवनसत्त्व इ - १६.०२ मिलि ग्रॅम
लोह - ११.८७ मिलि ग्रॅम

चेरी बनविण्याची प्रक्रिया - 
- मध्यम अाकाराचे दुधी भोपळे स्वच्छ धुऊन भोपळ्याच्या वरील साल पिलरच्या साहाय्याने काढून घ्यावी.
- भोपळ्याचे मोठे काप करून त्यामधील बिया व पांढऱ्या रंगाचा गर काढून छोटे-छोटे तुकडे करून घ्यावेत.
- भोपळ्याचे तुकडे गरम पाण्यामध्ये बुडवून ब्लॅचिंगची प्रक्रिया करून घ्यावी.
- एक किलो भोपळ्याच्या फोडीसाठी ७० ब्रिक्स साखरेचा पाक तयार करून घ्यावा. (७० ब्रिक्स पाक ः ३०० मिली पाण्यात ७०० ग्रॅम साखर)
- भोपळ्याचे तुकडे गरम पाण्यातून काढल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये १ दिवस बुडवून ठेवावेत. रंगीत चेरीसाठी नैसर्गिक रंग साखरेच्या पाकात मिसळावा.
- दुसऱ्या दिवशी एकूण साखरेच्या पाकापैकी ४० ते ४५ टक्के पाक राहिलेला दिसेल. पाकातील चेरी बाजूला काढून परत ७० टक्के पाकाचे प्रमाण करावे. असे तीन दिवस करावे.
- तीन दिवसांनंतर तुकडे पाकामधून काढून कोमट पाण्यात धुवून घ्यावेत. हे तुकडे उन्हामध्ये किंवा ड्रायर मशिनमध्ये वाळवावेत.

संपर्क - सचिन पाटील, ९५०३७०९८३६.
(श्रमशक्ती अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जि. नगर)
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: