Last Update:
 
ऍग्रो प्लस

नगर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढण्याची शक्यता
-
Saturday, December 24, 2016 AT 06:15 AM (IST)
Tags: agro plus
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल तर उर्वरित महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणार असून, हवेच्या दाबात बदल होत राहतील. हवेचा दाब जेव्हा कमी होईल तेव्हा थंडी कमी होईल. हवेचा दाब वाढेल तेव्हा थंडीचे प्रमाण वाढेल. अशा प्रकारे थंडीच्या प्रमाणात बदल होताना दिसतील. मात्र, सध्याचे थंडीचे प्रमाण कायम राहील. थोडेफार बदल जाणवतील. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५० ते ९० पूर्व रेखांशामध्ये आणि विषववृत्तापासून उत्तरेस १० अक्षांशामधे साधारणपणे ३०० ते ३०३ केलव्हीन्सपर्यंत वाढेल, त्यामुळे हिंदी महासागरावर हवेचे दाब कमी होऊन मोठ्या प्रमाणात हिंदी महासागराच्या भागावर ढग जमतील आणि तमिळनाडू व केरळच्या काही भागात पाऊस होईल. मात्र त्याचे परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार नाहीत. मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे विदर्भात सरासरीपेक्षा किमान तापमान ३.१ अंश सेल्सिअस ते ५.० अंश सेल्सिअसने कमी होईल. मराठवाड्यात किमान तापमान १.६ ते ३.० अंश सेल्सिअसने घसरेल. कमाल तापमानात फरक जाणवेल. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ते १.६ ते ३ अंशाने काही दिवस वाढेल. जळगाव, नाशिक व नगरला किमान तापमान ७ अंशाखाली घसरणे शक्य असून, धुळे जिल्ह्यात ८ अंशाखाली आणि नंदुरबार, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत तापमान ९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहणे शक्य आहे. बीड, उस्मानाबाद आणि गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहणे शक्य आहे. लातूर, नागपूर, वाशीम, गडचिरोली, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहणे शक्य आहे. कोकणात मात्र किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. हवामान कोरडे राहील. रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात व दक्षिण महाराष्ट्रात अाग्नेयेकडून तर उर्वरित महाराष्ट्रात ईशान्येकडून राहील.

१) कोकण - 
कोकणात कमाल तापमान रायगड व ठाणे जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ४५ टक्के तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात केवळ २१ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ टक्के राहील. उर्वरित रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३२ ते ३६ टक्के राहील. एकूणच हवामान थंड व कोरडे राहील. हे हवामान आंब्याचा मोहर निघण्यास अत्यंत अनुकूल राहील. मात्र जेव्हा सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत फार घट होते तेव्हा काजू पिकाचा मोहर कमी निघतो, त्यामुळे काजू उत्पादनावर त्याचा परिणाम दिसेल.

२) उत्तर महाराष्ट्र - 
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात या आठवड्यात मोठी घट होऊन ते जळगाव व नाशिक जिल्ह्यात ७ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर जळगाव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.

३) मराठवाडा - 
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

४) पश्चिम विदर्भ - 
पश्चिम विदर्भात कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २८ टक्के राहील.

५) मध्य विदर्भ - 
मध्य विदर्भात यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ४२ टक्के तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांत ४७ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ किलोमीटर राहील तर वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

६) पूर्व विदर्भ - 
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

७) दक्षिण - पश्चिम महाराष्ट्र -
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात ७ अंश सेल्सिअस राहील, तर सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. हवामान कोरडे राहील.

कृषी सल्ला - 
१) जानेवारी महिन्यात उन्हाळी भुईमूग, उन्हाळी बाजरी, सूर्यफूल, कलिंगड, कारले, भेंडी, गवार, दोडका, आले, सुरू उसाची लागवड बागायत क्षेत्रात करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करावी. नांगरटीनंतर जमीन तापू द्यावी व नंतर हेक्टरी २० गाड्या शेणखत घालावे. उन्हाळी पिकाची पेरणी किंवा लागवड १५ जानेवारीनंतर करावी.
३) पिकांना पाणी देताना शक्यतो ठिबकसिंचन व तुषार सिंचन प्रणालीचा वापर करावा.
४) हळदीची पाने पिवळी पडू लागताच काढणी करावी. त्यानंतर हळद शिजवून, उन्हात वाळवून पॉलिश करावी

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: