Last Update:
 
ऍग्रो प्लस

कोळंबी संवर्धनासाठी बायोफ्लॉक तंत्रज्ञान
-
Wednesday, December 28, 2016 AT 05:30 AM (IST)
Tags: agro plus
बायोफ्लॉक ही मुख्यतः नीमखाऱ्या पाण्यातील कोळंबीसाठी वापरली जाणारी संवर्धन प्रणाली आहे. या प्रणालीचा उपयोग करून क्षारयुक्त जमिनीचा वापर कोळंबी (लिटोपीनियस व्हन्नामाई) संवर्धनासाठी अधिक चांगल्या प्रकारे करता येतो.
डॉ. गाैरी शेलार, डॉ. पंकजकुमार मुगावकर, डॉ. गिरिजा फडके

बायोफ्लॉक :
- प्रथिनयुक्त सेंद्रिय घटक आणि सूक्ष्मजीव जसे, की पाण्यात राहणारे अतिसूक्ष्म प्राणी किंवा वनस्पती, जिवाणू, आदिजीववर्गीय, एकपेशीय वनस्पती, मृत जीव आणि इतर अपृष्ठवंशी प्राणी यांना एकत्रितपणे बायोफ्लॉक असे म्हणतात. थोडक्यात बायोफ्लॉक म्हणजे जिवाणूंचा कळप.
- बायोफ्लॉक तंत्रामुळे पाण्याची उत्तम गुणवत्ता राखली जाते आणि माशांना प्रथिनयुक्त खाद्य पुरवले जाते. मत्स्यतलावात बायोफ्लॉक माशांसाठी प्रथिनयुक्त खाद्य तयार करतात.
- या तंत्रामध्ये अतिरिक्त कार्बनचा पुरवठा होण्यासाठी भाताचा कोंडा, उसाची काकवी, टॅपिओकाचे पीठ, इ. घटक कार्बन स्त्रोत म्हणून वापरले जातात. बायोफ्लॉक हे हेटेरोफोबीक सूक्ष्मजीवयुक्त वस्तुमान तयार करते. ज्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात जे कोळंबीसाठी उच्च दर्जाचे अन्न म्हणून काम करतात.

लिटोपीनियस व्हन्नामाई कोळंबीची वैशिष्ट्ये
- तुलनेने अधिक वेगाने वाढणारी प्रजाती आहे.
- इतर कोळंबीपेक्षा या प्रजातीचा साठवणुकीचा दर जास्त आहे. उदा. १५० कोळंबी प्रती मीटरवर्ग तलावामध्ये तर ४०० कोळंबी प्रती मीटरवर्ग टाकीमध्ये ठेवता येतात.
- ही कोळंबी विशेषतः ०.५ ते ५० पीपीएम पर्यंत क्षारता सहन करु शकते. कोळंबीच्या वाढीसाठी ८ ते ३० पीपीएम क्षारता अनुकूल आहे.
- या प्रजातीची क्षारता सहन करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातील क्षारपड जमिनीमध्ये या प्रजातींचे संवर्धन करता येऊ शकते.
- तापमान सहन करण्याची क्षमतासुद्धा जास्त आहे (कमीत कमी १५ अंश सेल्सिअस).
- इतर कोळंबीच्या जातीच्या कोळंबीपेक्षा या जातीच्या कोळंबीचे व्यवस्थापन करणे सोपे अाहे.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे
- माशांना मुबलक प्रमाणात अधिक प्रथिनयुक्त खाद्य उपलब्ध होते.
- या तंत्रज्ञानामुळे तलावातील पाणी कमी वेळा बदलावे लागते.
- पाण्याची गुणवत्ता व दर्जा अधिक काळ चांगला राहतो.
- खर्च कमी येतो.
- कृत्रिम खाद्याचा वापर कमी प्रमाणात करावा लागतो.
- रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

बायोफ्लॉक तंत्रज्ञान
- बायोफ्लॉक तयार करण्यासाठी इनॉक्युलम तयार करावा लागतो. इनॉक्युलम म्हणजे नमुना (कल्चर) थोडक्यात दही तयार करण्यासाठी जसे विरजण अावश्यक असते त्याप्रमाणे बायोफ्लॉक तयार करण्यासाठी इनॉक्युलम अावश्यक असते.
- तलावातील सुकी माती इनॉक्युलमसाठी वापरली जाते. १८ ते २२ मिलिग्रॅम माती, १२ मिलिग्रॅम अमोनिअम सल्फेट अाणि २२० मिलिग्रॅम आंबवलेली उसाची काकवी प्रती लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण एरीएशनमध्ये ठेवले जाते.
- ४५ तासांनंतर तयार झालेले इनॉक्युलम तलावामध्ये सोडावे.
- प्रती घनमीटर जागेसाठी ४५ ते ५५ लिटर इनाॅक्युलम वापरावे.
- तलावाच्या बाजूने एचडीपीई पाइप बसवून घ्यावेत. त्यामुळे बायोफ्लॉक तलावाच्या कडेला असलेल्या मातीमध्ये शोषले जाणार नाही.
- या तंत्रज्ञानासाठी साधारणतः ०.१ हेक्टर अाकाराचे लहान तलाव वापरले जातात. बायोफ्लॉक साधारणतः एका महिन्यामध्ये तयार होतो आणि त्याचे व्यवस्थापन सोईस्कर व्हावे यासाठी तलावांचा आकार लहान ठेवला जातो.
- एरेशन हा या तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य अभिसरण होण्यासाठी तलावाचे चारही कोपरे गोलाकार करून घ्यावेत. तलावाचे कोपरे गोलाकार केल्यामुळे पाणी खेळते राहते. एरिएशनसाठी तलावामध्ये हवेच्या ट्यूब आणि एरेटर वापर करावा.
- एरेशनमुळे जिवाणूंचा कळप (बायोफ्लॉक) पाण्यावर तरंगत ठेवण्यास मदत होते, जो की ह्या तंत्रज्ञानाचा गाभा आहे.
- कोळंबीच्या वाढीसाठी जिवाणूंच्या कळपाचे (बायोफ्लॉक) घनफळ १७ ते २० मिली प्रती लिटर असावे.
- माशांनी न खाल्लेले पूरक खाद्य आणि उत्सर्जित झालेला नायट्रोजनचा वापर करून हेटेरोट्रोफीक जिवाणू आणि एकपेशीय वनस्पतींचे जीव वस्तुमान तयार केले जाते. जे माशांकडून खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे माशांना पूरक खाद्य कमी प्रमाणात लागते आणि खाद्याचा अपव्यय होत नाही.
- या तंत्रज्ञानामुळे खाद्य कमी प्रमाणात लागते. जसे की १ किलो कोळंबी तयार होण्यासाठी १.८ किलो खाद्य लागते, परंतु या पद्धतीमध्ये १.२ किलो खाद्य लागते.
- अनेकवेळा मत्स्य खाद्य बायोफ्लॉकमध्ये अडकून बसते आणि त्यामुळे त्याचा पाण्यात टिकून राहण्याचा कालावधी वाढतो; तसेच ते जास्त वेळासाठी कोळंबीला उपलब्ध होते.
- या तंत्रज्ञानामध्ये नायट्रोजन उत्सर्जित घटकांचा वापर करून बायोफ्लॉक तयार केल्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होते आणि वारंवार पाणी बदलण्याची गरज भासत नाही. जिवाणूंच्या थरामुळे कोळंबी च्या मरतुकीची टक्केवारीही कमी होते कारण बायोफ्लॉक त्यांना मोल्डिंग झाल्यानंतर लपण्यासाठी निवारा उपलब्ध करून देतात.
- मासे काढणीच्या वेळेस बायोफ्लॉक फिल्टर करून वेगळा काढला जातो. त्यामुळे उत्सर्जित पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी राहते. हा फिल्टर केलेला बायोफ्लॉक खाद्य म्हणून वापरता येतो. त्यामध्ये चांगल्या प्रतीचे प्रथिने आणि इतर आवश्यक अन्न घटक असतात. ही प्रणाली वापरून कोळंबीची उत्पादकता वाढवता येते आणि अधिक फायदा मिळवता येतो, तसेच पाण्याचे प्रदूषणदेखील होत नाही.


संपर्क : डॉ. पंकजकुमार मुगावकर, ७७३८२४६७८५
(केंद्रीय मत्स्यशिक्षण संस्था, मुंबई)
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: