Last Update:
 
ऍग्रो प्लस

चीक दूध वाढवते वासराची प्रतिकारशक्ती
-
Friday, December 30, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
डॉ. संदीप रामोड, मीनल पऱ्हाड

- गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर सुरवातीचे ४ ते ५ दिवस कासेतून निघणाऱ्या स्रावास चीक दूध असे म्हणतात, तर ग्रामीण भाषेत चीक दुधास खरवस किंवा कच्चे दूध तर इंग्रजीत कोलोस्ट्रम असे म्हणतात.
- चीक दूध हे सामान्य दुधापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. रंग पिवळट असतो.
- चीक दुधामध्ये दुधापेक्षा खनिजद्रव्ये आणि एकूण प्रथिनांचे जसे केसीन, ग्लोबुलीन, अल्बुमीन यांचे प्रमाणे अधिक तर दुग्धशर्करा व पाण्याचे प्रमाण कमी असते.
- चीक दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण दुधापेक्षा कमी अथवा जास्त असू शकते. सर्वांत महत्त्वाचा असणारा फरक म्हणजे ग्लोबुलीन प्रथिनांचा होय. दुधामध्ये ग्लोबुलीन फक्त ०.३ टक्के एवढे असते तर चीक दुधात १२ ते १३ टक्के असते.
- चीक दुधात खनिजद्रव्य उदा. कॅल्शिअम, तांबे, सोडिअम, फॉस्फरस, क्लोराईड व लोहाचे प्रमाण जास्त असते. पण पोटॅशिअमचे प्रमाण कमी असते. तसेच चीक दुधात सामान्य दुधापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण ५ ते १० पट अधिक असते. याशिवाय जीवनसत्त्वे रायबोफ्लेवीन (b2), थायमिन (b१) आणि पेन्होथेनीक आम्लाचे प्रमाण दुधापेक्षा अधिक असते.
- चीक दूध हे घट्ट असते व त्याची चव थोडी कडवट असते. चीक दूध तापवल्यास ते ८० ते ८५ अांश सेल्सिअस तापमानाला घट्ट होते.

चिकाचे महत्त्व  
१. चीक दुधामध्ये अल्बुमीन, ग्लोबलीन व इम्युनोग्लोबुलीनचे प्रमाण दुधापेक्षा जास्त असते. ही प्रथिने वासरात रक्षक (ॲन्टिबॉडीज) चा पुरवठा करतात. त्यामुळे वासरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. ही ॲन्टिबॉडीज वासरू जन्मल्यापासून ३६ तास चीक दुधातून मिळणे अत्यंत आवश्यक असते.
२. वासरांच्या आतड्यातील मलविसर्जन करण्यास मदत होते.
३. चीक दुधात जवळपास सर्वच घटक असल्यामुळे ते शक्तिवर्धक व तसेच पाचकता सुधारण्यास मदत होते.
४. कॅल्शिअम व फॉस्फरस या खनिज द्रव्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे वासरांच्या हाडांची व दातांची तसेच शरीराची वाढ योग्य प्रकारे होते.
५. ब जीवनसत्त्व जास्त असल्यामुळे शरीराची वाढ विकसित होते.

चीक दूध देण्याचे प्रमाण -
- वासरू जन्मल्यानंतर १ तासात वासराच्या वजनाच्या १० टक्के चीक दूध पाजावे. सर्वसाधारणतः वासरू २५ ते ३८ किलो वजनाच्या वासराला २.५ ते ३.८ किलो चीक दूध पाजावे. जास्त प्रमाणात चीक दूध पाजल्यामुळे वासराला हगवण लागून ते दगावण्याची भीती असते.
- वासराने चीक पायल्यानंतर अर्ध्या तासातच त्यातील रक्षकाणू व प्रतिजैविक ही रक्तामध्ये शोषून घेतली जातात. यामुळे वासरांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यास मदत होते.
- वासरांच्या आईला चीक दूध नसेल येत तर इतर नुकत्याच व्यायलेल्या गायीचे चीक दूध पाजावे.
- काही देशामध्ये चीक दूध साठवून ठेवले जाते त्यास कोलेस्ट्रम बॅंक असे म्हणतात. त्या ठिकाणी चीक शीत व गोठवलेल्या अवस्थेत ठेवतात. आवश्यकतेनुसार घट्ट गोठवलेले चीक दूध तापवून द्रवरूपात आणून वासरांना पाजला जातो.
- चीक दूध ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानास वासरांना दिल्यास त्याची पाचकता वाढते.
- एखाद्या गायीला/म्हशीला अधिक चीक दूध असेल तर तो दुसऱ्या वासरांना पाजावा.

डॉ. संदीप रामोड, ८२७५९३८८८६
(पशुसंवर्धन आणि दुग्धशास्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: