Last Update:
 
ऍग्रो प्लस

साखर, सोयाबीनच्या फ्युचर्स किंमतीत चढउतार अपेक्षित
-
Friday, December 30, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
या सप्ताहात कापूस, मका व साखरेचे भाव वाढले. इतर पिकांचे भाव उतरले. रबी पिकांचे सुद्धा मार्चनंतरचे भाव घटले. यापुढे भावात फार चढ-उतार होण्याची शक्यता नाही.
डॉ. अरुण कुलकर्णी

खरीप पिकांची आवक सध्या समाधानकारक होऊ लागली आहे. रबी पिकांखालील क्षेत्रसुद्धा विक्रमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रबी उत्पादन या वर्षी मोठ्या प्रमाणांत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कॉटन कॉर्पोरेशनने मर्यादित प्रमाणांत कापसाची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. एनसीडीइएक्सने साखरेवरील स्पेशल मार्जिन या सप्ताहापासून कमी केले आहे/ काढून टाकले आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मिरची
मिरचीच्या (मार्च २०१७) किमती गेल्या दोन महिन्यांत वाढत होत्या. या सप्ताहात त्या ८,८१८ रुपयांवर स्थिर आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) १२,४४० रुपयांवर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१७ मधील फ्युचर्स किमती, नवीन पिकाच्या आवकेमुळे २९.१ टक्क्यांनी (८,८१८ रु.) कमी आहेत. जर काही साठा असेल तर तो लगेच विकणे योग्य ठरेल.

खरीप मका
खरीप मक्याच्या (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात १.३ टक्क्यांनी वाढून १,४२९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) १,४४४ रुपयांवर स्थिर आहेत. या वर्षी पीक समाधानकारक आहे. यापुढे आवक वाढेल. मागणी पण वाढती आहे. मार्चच्या फ्युचर्स किमती १,४५३ रुपयांवर आल्या आहेत.

साखर
साखरेच्या (मार्च २०१७) किमती या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी वाढून ३,७२४ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ३,६५१ रुपयांवर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१७) च्या फ्युचर्स किमती ३,७२४ रुपयांवर आल्या आहेत. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. साठा पुरेसा आहे. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.

सोयाबीन
सोयाबीनच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून ३,०१५ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३,०३४ रुपयांवर स्थिर आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती ३,१७५ रुपयांवर आल्या आहेत. पुढील सप्ताहात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (मार्च २०१७) किमती चालू सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून ६,७९२ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ७,६३६ रुपयांवर आल्या आहेत. नवीन पिकाच्या अपेक्षेमुळे जून २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १०.४ टक्क्यांनी (६,८४२ रु.) कमी आहेत. मागणी कमी आहे. साठा पुरेसा आहे. या वर्षीचे उत्पादनसुद्धा समाधानकारक आहे. किमती कमी होण्याचा संभव आहे.

गहू
गेल्या दोन महिन्यांत गव्हाच्या (जानेवारी २०१७) किमती गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात १.३ टक्क्यांनी घसरून १,९७१ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती २,००० रुपयांवर आल्या आहेत. मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती स्पॉट किमतींपेक्षा १२.५ टक्क्यांनी (१,७५१ रु.) कमी आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत. लांबवरचा कल उतरता आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून ३,२११ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ३,२५० रुपयांवर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (दिल्ली) किमतींपेक्षा मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी (३,३१५ रु.) अधिक आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.

कापूस
कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात १.२ टक्क्यांनी वाढून १९,१४० रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती १८,९४७ रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (१९,५२० रु.). यापुढे मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गासडी). 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: