Last Update:
 
ऍग्रो प्लस

थंड वातावरणात जपा जनावरांना
-
Friday, January 06, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
थंडीमध्ये जनावरांना पिण्यासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. पाण्यामध्ये गूळ किंवा मीठ किंवा ज्वारीचे पीठ मिसळून द्यावे. अाहारात अधिक ऊर्जा देणाऱ्या खाद्यघटकांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा, यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन प्रतिकारशक्ती वाढते. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
प्रमोद शिंदे, अनंतराव शिंदे, कैलास डाखोरे

तापमानातील बदलामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान देखील थोड्याफार प्रमाणात बदलते. हे शारीरिक तापमान एका विशिष्ट मर्यादेत राखले जाते. त्यासाठी जनावरांच्या शरीरात निर्माण होणारी अंतर्गत शारीरिक उष्णता आणि बाहेरील वातावरणातून मिळणारी उष्णता यांचा समतोल राखावा लागतो. थंडीच्या दिवसांत वातावरणातील तापमान जनावरांच्या शारीरिक तापमानापेक्षा कमी असते, त्यामुळे शरीरातील उष्णतेचे उत्सर्जन होते.
- हिवाळ्यात जनावरांच्या शरीराचा सभोवतालच्या थंड जमिनीशी संपर्क आल्यास त्यांच्या शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात बाहेर पडते. जनावराच्या शरीराला झोंबणारी थंड हवा देखील त्याच्या शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात बाहेर पडण्यास कारणीभूत होते. अशा प्रकारे थंड हवा शरीरावरून जास्त प्रमाणात फिरल्यास शरीरातील उष्णतेचा जास्त प्रमाणात ऱ्हास होतो.
- जनावरांच्या त्वचेमध्ये घर्मग्रंथी कमी असतात, त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा उष्णतेचा विसर्ग नाकातून श्वासाद्वारे अधिक होतो. हवेत असणारी आर्द्रता अशाप्रकारच्या उष्णतेच्या ऱ्हासावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असते. वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास जनावरांच्या शारीरिक उष्णतेचा विसर्ग कमी होतो.

जनावरांची काळजी - 
- गोठ्याच्या खिडक्यांना रिकामे पोते (बारदाना) बांधून थंडीपासून जनावरांचा बचाव करावा.
- जनावरांना बसण्यासाठी भुश्श्याची गादी करावी. गोठ्यातील जमीन कोरडी राहण्यासाठी गव्हाचे काड किंवा ज्वारीच्या भुश्श्यात चुना मिसळून त्याचा पातळ थर (गादी) अंथरल्याने गोठ्यातील आर्द्रता कमी होते व गोठा स्वच्छ व कोरडा राहण्यास मदत होऊन गाय व नवजात वासरांना ऊब मिळते.
- गोठ्यात जनावरांना ऊब मिळण्यासाठी शेकोटी पेटवावी किंवा विद्युत बल्ब लावावेत.
- छोट्या वासरांच्या अंगावर पोत्याचे पांघरून टाकावे.
- गोठ्यात सिमेंटचा कोबा असल्यास कोबा तुलनेने अधिक थंड असतो. यासाठी लहान वासरांच्या आणि व्यायला झालेल्या गायी व म्हशींच्या खाली कोरडा भुसा, पाचट, वाळलेले गवत पसरावे.
- जनावरांना उघड्यावर न बांधता बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावे.
- जनावरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बांधावे किंवा मोकळे सोडावे, उन्हामुळे ऊब व ‘ड’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो.
- जनावरांना शक्यतो दुपारी १२ नंतर धुवावे. जनावरांना खरारा केल्यास रक्ताभिसरण चांगले होऊन थंडीही कमी जाणवते.
- थंडीमध्ये पाण्याचे तापमान कमी झाल्याने जनावरे पाणी पीत नाहीत किंवा पाणी कमी पितात, त्यामुळे पिण्यासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. त्यासाठी हौदात साठविलेल्या पाण्यापेक्षा विहिरीतून किंवा कूपनलिकेतून उपसलेल्या ताज्या पाण्याचा वापर करावा, ते पाणी साठविलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी थंड असते. पाण्यामध्ये गूळ किंवा मीठ किंवा ज्वारीचे पीठ मिसळून द्यावे.
- अाहारात अधिक ऊर्जा देणाऱ्या खाद्यघटकांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा, यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन प्रतिकारशक्ती वाढते. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
- आहारात प्रथिनांचा वापर २ टक्क्यांनी वाढवावा.
- खाद्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे असावीत, क्षार आणि खनिज घटक पुरेशा प्रमाणात खाद्यातून अथवा चाटण्यासाठी क्षार विटा ठेवून पुरवावेत.
- दूध काढण्याअगोदर कास कोमट पाण्याने धुऊन मगच दूध काढावे.

शेळीपालन - 
- शेळ्यांचे शारीरिक तापमान हे बाहेरील वातावरणीय तापमानानुसार बदलत नाही, ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न शरीराची यंत्रणा करीत असते. शारीरिक तापमान व बाह्य वातावरणीय तापमान यांच्यातील फरक जास्त असल्यास शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
- वातावरणातील थंडीमुळे शेळ्यांच्या तोंडाला मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी पोटॅशियम परमँग्नेटच्या द्रावणाने तोंड स्वच्छ करून तोंडास बोरोग्लिसरीन लावावे.
- शेडला बारदाना लावावा, त्यामुळे थंड वाऱ्याच्या त्रासापासून त्यांचे संरक्षण होईल. उबदारपणा राहण्यासाठी गोठ्यामध्ये विद्युत दिवे / हिटर लावावेत.
- शेळ्यांना थंडीमुळे सर्दी झाली असल्यास निलगिरी तेलाचे दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत टाकावेत. सर्दी, पडशाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे रूपांतर फुफ्फुसदाहामध्ये (न्यूमोनिया) होते. फुफ्फुसदाह झाल्यामुळे शेळ्या- मेंढ्या व करडे मोठ्या प्रमाणात दगावतात. यासाठी जनावरांचा थंडीपासून बचाव करावा. फुफ्फुसदाह हा रोग प्रामुख्याने कोंदट, दमट वातावरण, ओलसरपणा, अस्वच्छता यामुळे पसरतो. यासाठी करडांच्या गोठ्यातील हवा खेळती राहील व भरपूर सूर्यप्रकाश राहील याची काळजी घ्यावी.
- शेळ्या, मेंढ्यांना समतोल आहार मिळावा यासाठी नेहमीच्या खुराकापेक्षा ५ ते १० टक्के जास्त प्रमाणात खुराक द्यावा.
- जनावरांना जीवनसत्त्वे अ, ड, ई चे १० मिलि इंजेक्शन द्यावे, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढते.

संपर्क - कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५
(ग्रामीण कृषी हवामान सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: