Last Update:
 
ऍग्रो प्लस

हळद, गव्हाच्या फ्युचर्स किमतीत घट
-
Friday, January 06, 2017 AT 06:30 AM (IST)
Tags: agro plus
या सप्ताहात मिरची व गहू वगळता इतर सर्व पिकांचे भाव वाढले. यापुढे खरीप पिकांचे भाव वाढता कल दाखवतील. रब्बी पिकांचे भाव काहीसे उतरतील.
डॉ. अरुण कुलकर्णी

खरीप पिकांची आवक वाढती होऊ लागली आहे. रब्बी पिकांखालील क्षेत्रसुद्धा विक्रमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी उत्पादन या वर्षी मोठ्या प्रमाणांत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे सर्वच पिकांची मागणी वाढती राहील. 

कॉटन कॉर्पोरेशनने मर्यादित प्रमाणांत कापसाची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. १ जानेवारीपासून मे २०१७ डिलिवरीसाठी गवार बी, खरीप व रब्बी मका आणि गहू यांचे, तर जून २०१७ साठी सोयाबीनचे एनसीडीइएक्समध्ये व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्ये कापसाचे जून २०१७ च्या डिलिवरीसाठी व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मिरची
मिरचीच्या (मार्च २०१७) किमती या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून ८,७०८ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) १२,२०० रुपयांवर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१७ मधील फ्युचर्स किमती, नवीन पिकाच्या आवकेमुळे २९ टक्क्यांनी (८,७०८ रु.) कमी आहेत. किमती कमी होण्याचा कल आहे.

मका
खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१७) किमती या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी वाढून १,४४७ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) १,४३८ रुपयांवर स्थिर आहेत. या वर्षी पीक समाधानकारक आहे. यापुढे आवक वाढेल. मागणी पण वाढती आहे. एप्रिलच्या फ्युचर्स किमती १,४९३ रुपयांवर आल्या आहेत. रब्बी मक्याच्या (एप्रिल २०१७) किमती १ टक्क्याने वाढून १,३५२ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) १,६३० रुपयांवर आहेत.

साखर
साखरेच्या (मार्च २०१७) किमती गेल्या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.८ टक्क्यांनी वाढून ३,८२९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ३,७३८ रुपयांवर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१७) च्या फ्युचर्स किमती ३,८२९ रुपयांवर आल्या आहेत. सध्या जरी साठा पुरेसा असला तरी या वर्षी उत्पादन कमी होणार आहे. किमतीतील वाढ टिकून राहण्याचा संभव आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१७) किमती या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी वाढून ३,०९२ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३,०९६ रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती ३,२०३ रुपयांवर आल्या आहेत. सोया तेलाची वाढती मागणी आहे. पुढील सप्ताहात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१७) किमती चालू सप्ताहात ०.२ टक्क्यांनी घसरून ६,७७६ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ७,५५९ रुपयांवर आल्या आहेत. नवीन पिकाच्या अपेक्षेमुळे जून २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहेत (६,८०० रु.). मागणी कमी आहे. साठा पुरेसा आहे. या वर्षीचे उत्पादनसुद्धा समाधानकारक आहे. किमती कमी होण्याचा संभव आहे.

गहू
गव्हाच्या (फेब्रुवारी २०१७) किमती या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी घसरून १,८६९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती १,९६० रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ मधील फ्युचर्स किमती स्पॉट किमतींपेक्षा १४.६ टक्क्यांनी (१,६७३ रु.) कमी आहेत. लांबवरचा कल उतरता आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१७) किमती या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी वाढून ३,३८४ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ४ टक्क्यांनी वाढून ३,३८३ रुपयांवर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (दिल्ली) किमतींपेक्षा एप्रिल २०१७ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी (३,४८० रु.) अधिक आहेत . पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढउतार अपेक्षित आहेत.

कापूस
कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१७) किमती या सप्ताहात २.८ टक्क्यांनी वाढून १९,८७० रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती २.३ टक्क्यांनी वाढून १९,३८६ रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.७ टक्क्यांनी (१९,५२० रु.) अधिक आहेत. यापुढे मर्यादित वाढ संभवते. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गासडी). 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: