Last Update:
 
प्रादेशिक

"नाफेड'कडून उडीद खरेदी अचानक बंद !
संजय खेडेकर
Sunday, January 08, 2017 AT 01:15 AM (IST)
Tags: agro,  nafed,  buldhana
- पूर्वसूचना न दिल्याने शेतकऱ्यांचे हाल
- चिखलीत बाजारभाव तत्काळ परिणाम

चिखली, जि. बुलडाणा ः हमीभावासह बोनस देऊन नाफेडमार्फत सुरू असलेली उडदाची खरेदी अचानक बंद करण्यात आल्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ तर उडालीच, परंतु बाजारभावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी कोसळून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यंदा खरीप हंगामात उडदाचे चांगले पीक झाले आहे. मात्र भाव कोसळल्यामुळे नाफेडमार्फत हमीभावावर आधारित खुल्या बाजारामध्ये लिलावा (हर्राशी)मध्ये सहभागी होऊन खरेदी करण्यात येत होती. खुल्या बाजारामध्ये नाफेडमार्फत हर्राशीमध्ये सहभाग घेतल्या जात असल्याने उडदाला क्विंटलमागे 6 हजार 300 रुपये, तर 7 हजार 400 रुपयांपर्यंत उत्तम दर बाजारात मिळत होते.

या शासकीय खरेदीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका सहकारी खरेदी- विक्री संस्था आणि शासन यांच्या सहभागाने ही खरेदी होत होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मात्र गुरुवारी (ता. 5) सायंकाळी नाफेडच्या वरिष्ठ कार्यालयाकडून खरेदी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आदल्याच दिवशी खरेदी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी या प्रक्रियेमध्ये सहभागी कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका सहकारी खरेदी- विक्री संस्था यांना मात्र शुक्रवारी (ता. 6) खरेदी बंद करण्यात येत असल्याचे लेखी कळविण्यात आले. मुळात शेतकऱ्यांच्या माहितीसाठी खरेदी बंद करण्याच्या किमान आठ दिवस आधी पूर्वसूचना देणे अपेक्षित असताना आदल्याच दिवशी खरेदी बंद करून दुसऱ्या दिवशी संबंधितांना लेखी कळविण्यात आले.

शेतकऱ्यांना हा निर्णय झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालून बाजार समिती प्रशासनाशी वाद उपस्थित केला, मात्र बाजार समिती प्रशासनाने याबाबत आपली असमर्थता व्यक्त करीत हा नाफेडचा निर्णय असल्याचे सांगितले. नाफेडने खरेदीमधून माघार घेतल्याचे जाहीर होताच एकाच दिवसामध्ये क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांची घसरण होऊन दर पाच हजार तीनशे रुपयांवर येऊन आदळले.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किमान आठ दिवस आधी पूर्वसूचना देण्याचे साधे सौजन्यही नाफेडच्या व्यवस्थापनाकडून दाखविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या कळवळा घेणाऱ्यांनी किमान आतातरी शासन आणि नाफेड प्रशासनाला धारेवर धरून अचानक निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी काही आंदोलनात्मक पावले उचलण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पूर्वसूचना द्यावयास हवी होती ः सभापती
नाफेडकडून शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी करण्यासाठी खुल्या बाजारामध्ये हर्राशीमध्ये सहभागी होऊन खरेदी केल्या जात असल्याने उडदाला समाधानकारक दर मिळत होता. मात्र अचानक नाफेडने खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारभाव कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. झाल्याप्रकाराचा रोष शेतकऱ्यांनी बाजार समितीवर व्यक्त केला, मात्र नाफेडने खरेदी बंद करण्याच्याच दिवशी कळविल्याने ही तारांबळ उडाली. किमान आठ दिवस आधी नाफेडकडून पूर्वसूचना मिळाली असती तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोचविता आली असती आणि रोष टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया चिखली बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी व्यक्त केली.


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: