Last Update:
 
ऍग्रो प्लस

कोंबड्यांचे थंंड वातावरणातील व्यवस्थापन
-
Tuesday, January 10, 2017 AT 05:30 AM (IST)
Tags: agro plus
कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, प्रजनन क्षमता आणि अंडी उबवण क्षमता कमी होणे, अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात पक्ष्यांच्या शेडचे, लिटरचे आणि आहाराचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे. 

* पिलांच्या शेडमध्ये थंडीच्या काळात कमीत कमी दोन तास तरी ऊन येईल, अशी व्यवस्था करावी. यासाठी शेडची रचना पूर्व-पश्चिम दिशेने असावी.
* थंड वाऱ्यापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी छतावरदेखील बारदान्याचे आच्छादन करावे. पोते जाड असावीत, सकाळी शेडमध्ये सूर्यकिरणे येण्यासाठी गोणपाट पुन्हा गुंडाळून ठेवावेत.
* शेडमधील कोंबड्यांची विष्ठा, सांडलेले खाद्य नियमित स्वच्छ करावे.
* कोंबड्याची गादी उबदार ठेवण्यासाठी गादी तयार करताना प्रामुख्याने लाकडाचा भुसा, तांदळाचा भुसा, शेंगदाण्याचे टरफल, वाळू इत्यादींचा वापर करावा.
* शेडमध्ये बल्ब/ हीटर लावावे. विद्युतपुरवठा नसेल तर कोळशाची शेगडी वापरावी. मात्र शेगडीने धूर होणार नाही याची काळजी घ्यावी.
* शेडमधील गादीची उंची साधारणतः ४.५ सें.मी. असावी, नंतर गरजेनुसार ती ७ ते ९ सेंमी पर्यंत वाढवावी. त्यामुळे जमिनीतील गारवा कोंबड्यांपर्यंत पोचू शकत नाही.
* लिटरवर ओलाव्यामुळे पोपडा चढू नये, याची काळजी घ्यावी. त्याकरिता लिटर दर आठवड्याला खाली-वर करावे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार चुना मिसळावा.
* लहान पिलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्रुडरचा वापर करावा. ब्रुडरमधील तापमान नियंत्रित ठेवून पिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. ब्रुडिंग व्यवस्थित आहे, की नाही हे पाहण्यासाठी पिलांवर बारकाईने लक्ष द्यावे. जर पिले ब्रुडरच्या खाली एकत्रित जमा होत असतील, तर ब्रुडिंगचे तापमान कमी आहे किंवा जर पिले ब्रुडरपासून दूर अंतरावर जमा होत असतील, तर ब्रुडिंगचे तापमान जास्त आहे असे लक्षात घ्यावे. ब्रुडिंगचे तापमान हे व्यवस्थित असेल, तर सर्व पिले ही समप्रमाणात दिलेल्या जागेमध्ये विभागलेली दिसतात.
* पाणी खूप थंड असेल तर त्यामध्ये गरम पाणी मिसळून द्यावे, त्यामुळे पाण्याचे तापमान पिण्यायोग्य होते.
* शेडमध्ये कोंबड्यांची संख्या पूर्ण असावी. कमी कोंबड्या जास्त जागेत असतील, तर थंडी जास्त प्रमाणात जाणवेल. कोंबड्यांची संख्या कमी असल्यास त्यांना कमी जागेत ठेवावे.
* अचानक हवामानबदलामुळे ताण येऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात. ताण घालविण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधे द्यावी. आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्त्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो.
* हिवाळ्यात कोंबड्यांना अधिक ऊर्जा देणारे खाद्य वयोगटाप्रमाणे द्यावे. पहिले दोन दिवस पिलांना भरडलेली मका द्यावी, जेणेकरून पिलांना ऊर्जा मिळते.

संपर्क - अनंत शिंदे, ७५८८५७१६०२
(ग्रामीण कृषी हवामान सेवा, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: