Last Update:
 
मुख्य पान

द्राक्ष निर्यातीस दमदार प्रारंभ
-
Wednesday, January 11, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: nashik,   maharashtra,   greps
- 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपला रवाना
- गतवर्षीच्या निर्यातीत दुपटीने वाढ


ज्ञानेश उगले
नाशिक : अभ्यासू द्राक्ष उत्पादकांच्या प्रयत्नांतून द्राक्ष पिकात उत्तम रेसीड्यू व्यवस्थापन व्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळेच भारतीय द्राक्षांच्या गुणवत्तेची छाप जागतिक बाजारात पडली आहे. त्यात यंदा अर्लीच्या द्राक्षांना चांगल्या वातावरणाने साथ दिलीय. या स्थितीत हंगामाच्या प्रारंभीच भारतातून 39 कंटेनरमधून 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपच्या बाजारात निर्यात झाली आहे. मागील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 17 कंटेनरमधून 206.81 मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली होती.

राज्याच्या सर्वच भागांत यंदा द्राक्षपीक चांगल्या स्थितीत आहे. यंदा प्रथमच वादळी पाऊस आणि गारपिटीसारख्या संकटांपासून द्राक्ष शिवाराला सुटका मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीत टंचाईचा फटका बसून, काही भागांत बहर कमी आला असला तरी बहुतांश भागांत पीक जोमदार स्थितीत आहे. या स्थितीत बागेतील गुणवत्ता व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

नाशिक जिल्हा आघाडीवर
कृषी आयुक्तालयातील कृषी अधिकारी गोविंद हांडे म्हणाले, की अर्ली हंगामातील उत्तम पीक, ग्रेपनेट प्रणालीचा प्रभावी वापर, गुणवत्ता व्यवस्थापनाबाबत वाढलेली जागरुकता, कृषी विभागाकडून होत असलेले नियोजन, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, याचा लाभ द्राक्ष निर्यातीसाठी झाला आहे. आतापर्यंतची संपूर्ण निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून झाली असून, लवकरच पुणे व सांगली विभागांतून सुरू होईल.

रंगीत द्राक्षांना मागणी वाढली
रंगीत काळ्या रंगाच्या द्राक्षांना यंदा प्रथमच चीन, हॉंगकॉंग, थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशांतून मागणी वाढली आहे. गोड चवीच्या रसाळ रंगीत द्राक्षांना यापैकी काही देशांतून नेहमीच मागणी होते. यंदा मात्र त्यात वाढ झाली असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. युरोपातील नेदरलॅंडला आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 37 कंटेनरमधून 492 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. त्या खालोखाल इटलीला 2 कंटेनरमधून 32.400 मेट्रिक टन निर्यात झाली.

निर्यात नोंदणीचाही यंदा उच्चांक
यंदा भारतातून आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 38 हजार 128 प्लॉटची निर्यातीसाठी नोंदणी झाली होती. त्यात महाराष्ट्रातून 38,044 इतकी तर कर्नाटकातून 84 प्लॉट नोंदले गेले. राज्यात नाशिक जिल्ह्यातून 34,203 प्लॉटची निर्यातीसाठी नोंदणी झाली. त्या खालोखाल सांगली (1291 प्लॉट), सोलापूर (806), पुणे (773), नगर (359), सातारा (386), उस्मानाबाद (130), लातूर (124) याप्रमाणे निर्यातीसाठी नोंदणी झाली होती.

थंडीसह पौंड अवमूल्यनाचा अडथळा
द्राक्ष निर्यातदार प्रवीण संधाण म्हणाले, की युरोपच्या बाजारपेठेत सद्यःस्थितीत दक्षिण अफ्रिकेतील द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. जर्मनीसारख्या बाजारपेठेच्या परिसरातील तापमान उणे दहा इतके खाली गेले असून, या भागात बर्फवृष्टी होत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत पौंडचे अधिक अवमूल्यन झाले आहे. यामुळे द्राक्षाचे रुपयाचे दर किलोमागे 30 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. येत्या काळात हे अडथळे कमी होण्याची शक्‍यता आहे. अफ्रिकेच्या मालानंतर भारतीय द्राक्षांना उठाव वाढतो, असा दर वर्षीचा अनुभव आहे. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: