Last Update:
 
फुलोरा
आम्ही दोघे भाऊ वेगळे होणार आहोत. वडील अलीकडेच वारले. आमची बारा एकर शेती आहे. सगळी शेती वडिलांच्या नावावर होती. त्याची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. ते पाच भाऊ होते. पाच भावांत दहा एकर शेती होती. वाटणी होऊन प्रत्येकी दोन एकर आली. वडील मेहनती होते. हळूहळू त्यांनी स्वतःचा धंदा सुरू केला. आम्ही त्या वेळी लहान होतो. सगळे भाऊ वेगळे झाल्यावरही माझ्या वडिलांनी भावांना मदत केली. पण त्यांनी कधीच हे बोलून दाखविले नाही.

Saturday, October 22, 2016 AT 05:45 AM (IST)

शंकर मला बोलला - मुलगा दहावी नापास झाला. शाळेत त्याचे लक्षच नाही. काहीतरी कामधंदा करेन असं म्हणतो. शंकरला एकच मुलगा आहे. नवरा - बायको दोघेही पदवीधर आहेत. शंकरला सरकारी नोकरी आहे. बायको काही किरकोळ कामं करते. त्यातूनही तिला थोडीफार मिळकत आहे. शंकरच्या भावाला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघांनी चांगलं शिक्षण घेऊन आता नोकरीही मिळविली आहे. दोघा भावांचं पटत नाही. दोघे वेगवेगळे राहतात. एकाच गावात राहूनही एकमेकांशी संभाषण नाही.

Thursday, October 20, 2016 AT 06:00 AM (IST)

माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शेतात विहीर काढ, शेतीला पाणी पाहिजे, पाण्याखेरीज शेतीचं काही खरं नाही, असं सांगितलं होतं. त्यांना वाटायचं, आपल्या विहिरीला भरपूर पाणी लागेल. आमच्यात पूर्वीपासून एकच मूल झालं आहे. आताच केवळ दोन मुलं आहेत. आमची चाळीस एकर शेती आहे. पाटाचं पाणीही आलं आहे. दहा एकर बागायती झाली आहे. दोन्ही मुलं शेतीच कसतात. दोघंही पदवीधर आहेत. गावात एकाच कुटुंबाकडे चाळीस एकर शेती केवळ आमच्याकडेच आहे. मुलांना एकदा बोललो.

Wednesday, October 19, 2016 AT 06:00 AM (IST)

माझ्या नात्यातील एक तरुण मुलगा वारला. त्याला दोन लहान मुलं आहेत. गावात घर आहे. थोडी शेती होती, ती विकली आहे. तरुण मुलगा दारूच्या आहारी गेला होता. गावात ठराव करून दारूबंदी केली आहे. गावात पूर्वीपासूनच दारू पिण्याचं प्रमाण कमी आहे. तरुण मुलं बाहेरगावी जात असतात. रस्त्यावर धाबे झाले आहेत. तेथे संगतीनं दारूचं व्यसन लागतं. गावाने जरी दारूबंदी केली असली, तरी गावाबाहेरचं वातावरण वेगळं आहे. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत आहे.

Tuesday, October 18, 2016 AT 05:30 AM (IST)

काही जमातींवर गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारून त्यांना सेटलमेंटमध्ये सोलापूरला ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले. आपल्याकडे पुनर्वसन पुढे होत नाही. त्यांच्या उपाजीविकेचा मार्ग त्यांना द्यावा लागतो. त्याचबरोबर त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयोग झाला पाहिजे. लहान मुलांचंही योग्य शिक्षण संगोपन झालं पाहिजे. जे काही प्रयत्न होतात ते फारच अपुरे असतात. त्यामुळे तो समाज आपल्या मानसिकतेतून बाहेर पडणं कठीण जातं.

Monday, October 17, 2016 AT 07:00 AM (IST)

काही दिवसांपूर्वी गावाने ग्रामसभेत आयत्या वेळचा एक विषय म्हणून थाटामाटात होणाऱ्या लग्नसमारंभाविषयी चर्चा झाली. ज्यांची ऐपत आहे, हे लोक आपल्या मुला-मुलींची लग्ने थाटामाटात करतात. त्याचा काही परिणाम होत असतो. याला एक दुसराही संदर्भ होता. त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या. गावातील एकाला पक्षाचे तिकीट मिळवायचे होते. तिकीट मिळविण्यासाठी मोठ्या पक्षापुढे शक्तिप्रदर्शन करावे लागते. जो शक्तिप्रदर्शन करतो, त्याला पक्षही उमेदवारी देतो.

Friday, October 14, 2016 AT 06:15 AM (IST)

सालाबादप्रमाणे यंदाही यात्रा आली. दरवर्षी यात्रेत बैलगाडीच्या शर्यती असतात. फार पूर्वीपासून बैलगाडीच्या शर्यतीचा गावाला शौक आहे. गावातील पाच-सहा तरी बैलगाड्या शर्यतीत असतात. आमच्या भागात गावोगावच्या यात्रेतूनही नेहमी भाग घेतात. गेली अनेक वर्षे आमच्या पाच-सहा बैलगाडीचीच एकमेकांत शर्यंत होते. बैलगाडीच्या शर्यतीसाठी बैल लहानपणापासून तयार करावे लागतात. त्यासाठी प्रत्येकाकडे चांगल्या जातीच्या गायी आहेत.

Thursday, October 13, 2016 AT 07:45 AM (IST)

रात्री अपरात्री अचानक जाग येते. पुन्हा झोपतो. झोप काही लागत नाही. सगळं गाव गाढ झोपलेले आहे. घरातील सगळी माणसं गाढ झोपली आहेत. एका विचारानं मनाची घालमेल होत आहे. गेली दहा वर्षे नोकरी करतो आहे. पगार बरा आहे. आपोआप वाढणार आहे. फार ओढाताण नाही. शहरात स्वतःच घर आहे. एक मुलगा आहे. यंदा चौथीत गेला आहे. बायको काहीना काही काम करते. दोन पैसे मिळवते. घराभोवती तिने भाजीपाला लावला आहे. संसार कसा करावा, हे तिच्याकडून शिकलं पाहिजे. हा गुण तिचा उपजतच आहे.

Wednesday, October 12, 2016 AT 06:00 AM (IST)

सहा भावात एकच बहीण आहे. सर्वात लहान आहे. आमच्या पसंतीने तिचे लग्न रीतीरिवाजाप्रमाणं झालं आहे. मुलगा एकुलता आहे. बारा एकर बागायती शेती आहे. पदवीधर आहे. दोन वर्षे त्याने नोकरी केली. वडिलांचे निधन झाले. त्याने नोकरी सोडून दिली. त्याच्या वडिलांनी गावात हायस्कूल सुरू केले आहे. गावात तेलाची गिरणी आहे. हा सगळा कारभार घरातीलच माणूस पाहू शकतो. वडील असते तर तशी चिंता नव्हती. वडील गेल्यानंतर एका वर्षात लग्न करावं अशी प्रथा आहे.

Monday, October 10, 2016 AT 06:30 AM (IST)

माझी सत्तरी उलटली आहे. कुटुंबाची कोणतीही जबाबदरारी नाही. चार मुलं आणि तीन मुली आहेत. मुली मोठ्या आहेत. त्याची लग्ने होऊन त्यांना नातवंडेही झाले आहेत. मुलांचीही लग्न होऊन कामधंदा करीत आहेत. माझी बायको दोन वर्षापूर्वी वारली. मी मुलांना शेती वाटून दिली आहे. प्रत्येकाचा जोडधंदा आहे. चारही मुलं पदवीधर आहेत. मोठा मुलगा काही वर्षे खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने अनुभवातून स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. त्यात त्याने चांगला जम बसविला आहे.

Saturday, October 08, 2016 AT 06:00 AM (IST)

गावात चौथीपर्यंत शाळा आहे. एकच गुरुजी आहेत. नियमाप्रमाणे शिक्षक मिळावेत अशी विनंती सरपंचानी अनेक वेळा केली आहे. तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. गावाशेजारी एक खासगी शाळा निघाली आहे. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावातील मुलं गोळा करायचं ठरवलं आहे. एखाद्यानं किराणा मालाचं दुकान सुरू करावं तसा त्यांनी धंदा म्हणून शाळा सुरू केली आहे. त्यांचे काही लोकांशी हितसंबंध आहेत. सगळीकडेच सरकारी शाळा ओस पडत आहेत.

Friday, October 07, 2016 AT 06:15 AM (IST)

अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन गरोदर स्रियांची माहिती घेते. हा तिच्या कामाचाच एक भाग आहे. मूल आईच्या पोटातून जन्माला येतानाच निरोगी असले पाहिजे. मूल जन्माला येतानाच शारीरिक दोष असेल तर त्या मुलाचे आयुष्य त्रासदायक होते. शारीरिक अपंगत्व आपण गर्भात मूल असतानाही उपचाराने कमी करू शकतो. आता विज्ञानाने अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. त्यासाठी गर्भातील मुलाची चाचणी घेता येते. यात एक धोका आहे. ते मूल मुलगा आहे की मुलगी आहे, हेही समजू शकते.

Thursday, October 06, 2016 AT 05:30 AM (IST)

मुली पदवीधर होऊ लागल्या आहेत. त्यांना आपण आपल्या पायावर उभं राहावं असं वाटत आहे. ही काळाची गरजही आहे. हा बदल शिक्षणामुळे झाला. गावाशेजारी शिक्षणाची सोय होत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी बऱ्याच सवलती आहेत. याचा लाभ अनेक मुलींनी घेतला आहे. लहानसहान का असेना मुलींनी नोकरी मिळविली आहे. त्यामानाने मुलं मागे पडत आहेत. मुलं आणि मुली यात अंतर नाही. भेदभाव नाही, तरी आता मुलींनी मुलांपुढं मजल मारली आहे. मुलांना नोकरी असेल तर लग्नं लवकर जमतात.

Wednesday, October 05, 2016 AT 06:00 AM (IST)

गावचा मी सरपंच आहे. पदवीधर आहे. मी पहिल्यांदाच निवडून आलो आहे. खरंतर माझ्या आयुष्यातील हा अपघात आहे. कारण माझ्या आयुष्यात मी जे ठरवलं होतं. ते फार वेगळं होतं. आपण राजकारणात पडू असं जर कोणी मला सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं. याचं कारण माझा पिंड हा वेगळा आहे. मी तसा कोणाच्या मध्ये कधी पडलो नाही. शिकत असतानाही कधी मी कुठलीच निवडणूक लढवली नाही. अशी काही निवडणूक लढवावी, असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही.

Tuesday, October 04, 2016 AT 06:15 AM (IST)

गेली काही वर्षे गावातील सगळी लग्नं सामुदायिक होतात. आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे होतात. ज्यांची ऐपत आहे, ते देणगी देतात. सगळ्या गावाचा हा एकत्रित कार्यक्रम होतो. या निमित्ताने काही करमणुकीचे कार्यक्रमही होतात. फार पूर्वीपासून गावाला तमाशाचा नाद आहे. गावच्या यात्रेत तर सगळे नामांकित तमाशा फड येतात. ग्राम दैवताच्या यात्रेतील ही प्रथा लग्न समारंभातही चालू केली. याविषयी सुरवातीला काहीचं वेगळं मत होतं, तरी गावातील निर्णय हे बहुमतानेच घेतले जातात.

Saturday, October 01, 2016 AT 05:00 AM (IST)

आमच्याकडे मुलींची लग्न लवकर होतात. कायदा झाल्यापासून थोडं नियंत्रण आलंय. त्याशिवाय मुलींच्या शिक्षणासाठी बऱ्याच सोयी सवलती आहेत. त्याचाही परिणाम झाला आहे. यातूनही मुलींची लग्न ही लवकर उरकण्याकडेच कल आहे. अलीकडे काही मुली शिकून नोकरी करू लागल्या आहेत. त्यांना आता नोकरीचा आधार मिळाला आहे. त्याचाही एक परिणाम झाला आहे.

Friday, September 30, 2016 AT 05:30 AM (IST)

मला दोन मुली आहेत. दोघीत एक वर्षांच अंतर आहे. मोठी देहयष्टीनं बायको सारखी किरकोळ आहे. रंगाने बायको सारखी गोरी आहे. लहान अंगापींडानं माझ्यासारखी मजबूत आहे. रंग माझ्या सारखा सावळा आहे. मोठी बायकोची लाडकी आहे. प्रत्येक वेळी ती मोठ्या मुलीचचं कौतुक करते. तिला एकदा मी समजून दिलं असं आपल्या मुलांत भेदाभेद करू नये. शेवटी ही आपलीच मुलं आहेत. आपल्याला याचा अनुभव आहे की घरात मुला-मुलीत भेदा भेदही केला जातो. मुलीपेक्षा मुलांकड अधिक लक्ष दिलं जातं.

Thursday, September 29, 2016 AT 07:00 AM (IST)

नवीन बदली होऊन आलो आहे. एकटाच राहणार आहे. राहाण्याची सोय करावी लागणार आहे. कार्यालयातील सहकाऱ्यांनाही कल्पना दिली. तसं तालुकावजा गाव आहे. फार शहरीकरण अजून झालेलं नाही. साहेब म्हणाले इतर चांगल्या ठिकाणी जागा मिळेपर्यंत ऑफिसमध्येच राहावं. ऑफिसमध्ये गेस्टहाउस आहे. ते चांगले आहे. सर्व सुविधा आहेत. साहेब म्हणाले, मीही पहिल्यांदा इथंच राहिलो आहे. सध्या पुरती सोय चांगली झाली. तसा मी नवीन लागलो आहे. कामाचा अनुभव नाही. कार्यालयात सतत जनतेचा संपर्क राहातो.

Wednesday, September 28, 2016 AT 05:45 AM (IST)

आईची प्रकृती अलीकडे चांगली नसते. ऐशींच्या पुढे तिचे वय गेले. आयुष्यभर तिने काबाड कष्ट केले आहेत, त्यामुळे अंथरुणात पडून राहणे तिला शिक्षा वाटते. पहिल्यापासून ती स्वतःची सगळी काम स्वतःच करीत आली. आम्ही दोघे भाऊ आहोत. आम्ही वेगळे राहतो. आमची शेतीही वेगळी आहे. मी मोठा आहे. माझ्यात आणि लहान भावात बारा वर्षांच अंतर आहे. सगळी शेती मीच पाहत होतो. लहान भावाचे लग्न केले. माझ्या बायकोनेच तिच्या माहेरची मुलगी बघितली. पदवीधर आहे. परिस्थिती गरिबीची होती.

Tuesday, September 27, 2016 AT 06:45 AM (IST)

दरसाल बैल पोळ्याला मी बैल समजून मिरवणुकीत सहभागी होतो. माझी बैलजोडी सगळ्यात पुढे असते. हा मान मी भांडून मिळविला नाही. मला लोक सांगत असत हा मान तुला नाही तुझ्या बैलजोडीला आहे. तुझी बैलजोडी पुढं असल्याखेरीच मिरवणुकीला शोभाच येत नाही. गावात मानापमानासाठी किती झगडे होतात, हे आपल्यालाही ठाऊक आहे. गावात एकमत करणं कितीतरी कठीण असतं. असं असूनही माझ्या बैलजोडीला हा मान सगळे आपणहूनच देतात. गावात कुठंही मिरवणूक असली तरी माझी बैलजोडी मिरवणुकीसाठी हवी असते.

Monday, September 26, 2016 AT 04:45 AM (IST)

मला एकुलता एक मुलगा आहे. शिक्षणासाठी त्याला शहरात ठेवलं आहे. आम्ही सहा भाऊ एकत्र आहोत. मी चार नंबरचा आहे. सगळी शेतीची काम मीच बघतो. बाकीचे भाऊ वेगवेगळे उद्योग करतात. मोठा भाऊ साखर कारखान्यात नोकरी करीत होता, थोड्या दिवसानंतरच त्याने नोकरी सोडून धान्याचा व्यापार सुरू केला. त्यात त्याने भरपूर पैसा मिळविला. इतर भावांनाही त्यानं उद्योगधंदे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांना त्यानं मदतही केली. मला शेतीचीच आवड असल्यानं मी शेतीचीच कामं बघत आहे.

Saturday, September 24, 2016 AT 07:15 AM (IST)

सकाळी उठून मी रानातून एक फेरी मारतो. माझे वडीलही रानातून सकाळी एक फेरी मारत असत. घराजवळच आमची बारा एकर शेती आहे. वडील शेतीची सगळी कामं करीत. मी शेतीची कामं अलीकडे करीत नाही. गडी माणसं आहेत. यंत्रही आली आहेत. पूर्वी इतकी कष्टाची कामही आता नाहीत. काळाप्रमाणे शेतीची काम बदलली आहेत. आता आम्ही शेती खेरीज इतरही कामे करतो. उद्योगधंदे करतो. पूर्वी इतक्या सुविधाही नव्हत्या. आता सुविधा आहेत. त्याचा आमच्या परीनं आम्ही उपयोगही करूून घेत आहोत. काळ बदलतो आहे.

Friday, September 23, 2016 AT 06:30 AM (IST)

लहान भाऊ भांडून वेगळा झाला आहे. खरं तर त्यानं वेगळा होण्याची गरज नव्हती. आम्ही दोघे भाऊ आहोत. मला खासगी नोकरी आहे. लहान भाऊ आईच्या पोटात होता त्या वेळीच वडील अचानक वारले. आमची सात एकर शेती सावकाराकडे गहाण होती. सावकाराचे कर्ज काही फिटलं नव्हतं. पण वडील सावकाराच्या कर्जामुळे वारले की दुसरे काही घडलं, हे आईलाही सांगता आलं नाही. ती कधीच कुठल्या व्यवहारात पडली नाही. आम्हा दोघा भावांना घेऊन ती माहेरी आली. कारण तिला काही तरी आधार हवा होता.

Thursday, September 22, 2016 AT 06:45 AM (IST)

मुलगा पदवीधर झाला आहे. आमची सोळा एकर बागायती शेती आहे. चुलत भावाची बारा एकर शेतीही मीच भागाने कसतो. चुलत भाऊ सरकारी नोकरदार आहे. त्याची बदलीची नोकरी आहे. त्याला एकच मुलगी आहे. पुढे शेती कोण कसणार यामुळे शेती विकण्याचा त्याचा विचार होता. मी त्याच्या शेतीची जबाबदारी घेतली. त्याला मी शेतीतूनही फायदा करून दिला. त्यामुळे त्याने शेती विकण्याचा विचार सोडून दिला. मला तो एवढंही बोलून गेला, तू शेती कसतो आहेस, तूच शेती घे, दुसऱ्याला देण्याची गरजही नाही.

Wednesday, September 21, 2016 AT 06:45 AM (IST)

आम्ही पाच भाऊ आहोत. आमची पाच एकर शेती आहे. शेती वडिलोपार्जित आहे. वडिलांना चार भाऊ होते. त्यांची पन्नास एकर शेती होती. त्यातील काही शेती सावकारी कर्जात गेली. वडिलांच्या भावांनी सावकारी कर्जात गेलेली शेती सोडविली आहे. त्यासाठी त्यांनी शेतीखेरीज इतरही उद्योगधंदे केले. त्यात त्यांना पैसाही मिळाला. त्यांनी ठरवलं होतं. आपली कर्जात गेलेली शेती परत मिळवायची. माझ्या वडिलांनी शेतीखेरीज कोणताही धंदा केला नाही.

Tuesday, September 20, 2016 AT 06:30 AM (IST)

महिलांचा बचत गट आहे. बचत गटात आता मोलमजुरी करणाऱ्या महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्याचा त्यांना फायदा होत आहे. आपला व्यवहार कसा करावा याची माहिती त्यांना बचत गटात सहभागी झाल्यापासून होत आहे. आपण जी कमाई करतो, त्यातील काही तरी बचत केली पाहिजे. ही जाणीव चांगलीच झाली आहे. पूर्वी असं घडत नव्हतं. रोज जी काही कमाई होते, ती कोणत्या ना कोणत्या कारणांनी खर्च होत होती. एवढेच नव्हे तर मजुरी करणाऱ्या अनेक महिलांना अंगावर उचलही घ्यावी लागत होती.

Monday, September 19, 2016 AT 07:45 AM (IST)

आमच्याकडे एक सालगडी बरीच वर्षे काम करतो. लहान वयात गुरं राखण्यासाठी राहिला. पुढं मोठा झाल्यावर त्यानं शेतातील कामं करणं सुरू केलं. त्याला तसं जवळचं कोणी नव्हतं, त्यामुळे जेथे काम करतो तेथेच त्यानं आपलं घर मानून आयुष्य काढलं. तो वयात आल्यावर त्याचं लग्नही आम्हीच केलं. त्या वेळी एक अडचण आली. लग्न ठरवताना आपली जात सांगावी लागते. तो अगदीच लहान वयात घरातून बाहेर पडल्यानं त्याला जात काही सांगता येत नव्हती.

Saturday, September 17, 2016 AT 06:15 AM (IST)

गावातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची यादी दर वर्षी केली जाते. यासाठी जे काही निकष आहेत, त्या कुटुंबाचा समावेश हा या यादीत होतो. अशांना काही सरकारी सवलती आहेत. त्याचा त्यांना लाभ होतो. सरकारच्या अनेक योजना अशा आहेत, की ज्या खऱ्या गरजूपर्यंत पोचतच नाहीत. जसं अनेक गावात घडतं तसं आमच्याही गावात घडत आहे. जे लोक या निकषात बसू शकणार नाहीत, त्यांचाही समावेश या यादीत आहे.

Thursday, September 15, 2016 AT 06:45 AM (IST)

मला दोन मुलं आहेत. एका पाठीवर एक झाली आहेत. माझं मत आपल्याला एकच मूल असावं असं होतं. आमच्या कुटुंबात किमान तीन-चार मुलं आहेत. माझे चार मोठे भाऊ आहेत. त्यांनाही अशीच मुलं आहेत. माझ्या वडलांना सात भाऊ होते. त्यांनी एकत्र राहून कुटुंबाला पुढं आणलं. त्यातील आता केवळ माझे वडीलच हयात आहेत. दोन नंबरचे कारभारी होते. ते दोन वर्षांपूर्वी वारले. त्यांनीच सगळ्यांच्या वाटण्या करून दिल्या.

Wednesday, September 14, 2016 AT 05:15 AM (IST)

शेतीसाठी अजूनही बैलांची गरज भासते. यंत्रे आली असली तरी अजून किती तरी काम बैलावाचून अडून राहतात. एक मात्र आहे, पर्याय निघाला आहे. त्याची मदत होते, तरी बैलांची शेती काही पूर्णपणे कमी झाली नाही. त्यातून लहान शेतकऱ्यांना बैलजोडीचा सांभाळ करणे परवडत नाही. कारण त्यासाठी एक माणूस पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यातून त्याला त्या कामाची आवड पाहिजे. असे लोक आता कमी होऊ लागले आहेत. गावात शेतकऱ्याची सेवा सोसायटी आहे. सोसायटीच्या वतीने शेतीसाठी मदत केली जाते.

Tuesday, September 13, 2016 AT 05:00 AM (IST)

सातवीपर्यंत शाळा आहे. पूर्वी चौथीपर्यंत होती. आमच्या परिसरात पहिल्यांदाच सातवीपर्यंत आमची शाळा झाली. ज्या वेळी गावोगावी शाळा मंदिरात भरत असत, त्याकाळीही गावाने शाळेची स्वतंत्र इमारत बांधली होती. शाळेचा परिसरही दहा एकरांचा आहे. ही दहा एकर एकाच गावकऱ्याने देणगी दिली. ही शेती गावाला लागून होती, त्याला मूलबाळ नव्हतं. दोन बायका होत्या. त्याने आपला वंश चालावा यासाठी कोणालाही दत्तक घेतलं नाही.

Monday, September 12, 2016 AT 06:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: