इस्राईलमधील कृषी संशोधन संस्थांमध्ये जगभरातील संशोधक, शेतकरी आणि विद्यार्थांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. कुठल्याही देशाने त्यांना काय गरज आहे, हे सांगितल्यास तसा अभ्यासक्रम या संस्थेतील तज्ज्ञ तयार करतात. या अभ्यासक्रमासाठी फी आहे. विविध पीक पद्धती आणि पाणी व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, फळबाग, फुलशेती, मत्स्यशेती, त्याचबरोबरीने विविध पिकांचे लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत सुधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण या संस्थांमध्ये मिळते. इस्राईलमध्ये किबुत्स व्यवस्था, त्या जोडीला विविध प्रकारचे कृषिउद्योग आणि दुग्ध व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे. अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला किबुत्समध्ये राहण्याची संधी मिळाली. तेथील शेतकऱ्यांशी बोलता आले. प्रत्यक्षात शेती पाहता आली. गेल्या दहा वर्षांत इस्राईलच्या शेतीमध्ये खूप बदल झालेले आहेत. आम्ही अभ्यास दौऱ्यामध्ये "गॅलीली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट'ला भेट दिली. येथील संशोधन केंद्रात विविध पातळीवर विविध विषयांत सुधारित तंत्रज्ञानाबाबत संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संशोधनावर येथील तज्ज्ञाचा भर आहे.
Sunday, May 12, 2013 AT 12:00 AM (IST)