Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 664
तब्बल आठशे प्रस्ताव प्राप्त प्रशासनाने हात आखडला मुंबई - दुष्काळी भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे या ठिकाणच्या चारा छावण्यांच्या बाबतीत प्रशासनाने हात आखडता घेण्यास सुरवात केली आहे. दुष्काळी बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांत सध्या अवघ्या बाराच चारा छावण्या सुरू आहेत. छावण्यांसाठी तब्बल आठशे प्रस्ताव आले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला छावण्या सुरू करण्याची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले जात आहे. पुरेशा चाऱ्याची उपलब्धता होईपर्यंत आणि समाधानकारक पाऊस पडेपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत, तरीही जिल्हा प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ही उदासीनता दुष्काळी शेतकरी आणि नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमधील चारा छावण्यांसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस कोटी एकतीस लाख रुपयांचा निधीही वितरित केला आहे. या वर्षी राज्यातील वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. दुष्काळाची सर्वाधिक झळ मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सोसावी लागत आहे.
Tuesday, October 13, 2015 AT 07:15 AM (IST)
- विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज - अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र ओसरले पुणे - अरबी समुदातील तीव्र कमी दाब क्षेत्र सोमवारी (ता. 12) सकाळी ओसरल्याने या भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र होते. वायव्येकडे सरकत असलेले कमी दाब क्षेत्र मंगळवारी सकाळपर्यंत निवळून जाण्याची शक्‍यता आहे. बुधवारपर्यंत राज्यात तुरळक पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस थांबणार आहे, तर विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागांत तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ वायव्येकडे सरकत असताना निवळून गेले आहे. या भागात असलेल्या ठळक कमी दाब क्षेत्राला लागूनच समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. तर पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागापासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे या भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती. तर दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. सोमवारी (ता. 12) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 31.2, जळगाव 37.0, कोल्हापूर 31.1, महाबळेश्‍वर 28.
Tuesday, October 13, 2015 AT 07:00 AM (IST)
पुणे - जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये रविवारी (ता. 11) सायंकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर जोरदार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांद्यासह भाजीपाला आणि फूल पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे रस्त्यांवरही तळी साचली होती. ओढे, नदी-नाल्यांना आलेले पाणी आणि धरणक्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. सोमवार (ता. 12) सकाळपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस : (मिलिमीटरमध्ये) : थेऊर 50, उरुळीकांचन 35, चिंचवड 34, वाघोली 15, पिरंगुट 27, किकवी 21, वेळू 15, तळेगाव 16, काले 21, वेल्हा 43, पानशेत 50, जुन्नर 18, निमगाव 37, राजूर 27, आपटाळे 40, कुडे 42, घोडेगाव 35, पारगाव 44, मंचर 65, टाकळी 36, मलठण 15, पाबळ 24, बारामती 20, मोरगाव 26, लोणी 40, अंथुर्णे 70, वरवंड 16, सासवड 45, भिवंडी 15, जेजुरी 27, परिंचे 35, वाल्हा 20.
Tuesday, October 13, 2015 AT 06:00 AM (IST)
दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक पातळीवर शेतीकामांचा अभाव शेणपूर, जि. धुळे - साक्री तालुक्‍यातील हजारो ऊसतोड मजूर दर वर्षी साधारणतः दसरा सणानंतर उदरनिर्वाहासाठी गुजरात राज्यामध्ये स्थलांतरित होत असतात. मात्र यंदा या मजुरांचे एक महिना अगोदरच स्थलांतर सुरू झाले आहे. उद्‌भवलेली दुष्काळी स्थिती आणि स्थानिक पातळीवर शेतीकामे उपलब्ध होत नसल्याचा हा परिणाम आहे. सध्या दररोज दोन ते तीन हजार मजूर स्थलांतरित होत आहेत. यंदा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामात स्थानिक पातळीवर मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. गावागावांतील मजूर दसऱ्याच्या आधीच स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्यातही यंदा स्थलांतरित होणाऱ्यांची संख्याही मोठी राहणार असल्याचे चित्र आहे.  शेतीशिवारात सध्या कापूस वेचणी, मका, बाजरी, ज्वारीची कापणी, भुईमूग काढणी आदी कामे सुरू आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थितीमुळे मजुरांना फारसे काम नाही. जेथे 10 मजूर लागतात तेथे 20 उपलब्ध होत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यावर पोट भरायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहत असल्याने स्थलांतराचा पर्याय मजुरांनी निवडला आहे.
Tuesday, October 13, 2015 AT 06:00 AM (IST)
भाजीपाला पिकांना फटका रोपवाटिकांनाही दणका पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागाताली जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांत अनेक ठिकाणी रविवारी (ता. ११) संध्याकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दोन तासांहून अधिक काळ संततधार सुरू होती, यामुळे वावरं (शेत) ओसंडून वाहिल्याने अनेक ठिकाणी बांध व बांधणी फुटून शेतातील माती वाहून गेली. वेलवर्गीय भाजीपाला, पालेभाज्या, फुलझाडे, कडवळ (चारापिके) व कांद्याच्या रोपांना या पावसाचा मोठा फटका बसल्याची शक्यता आहे. या भागात यंदा पडलेल्या पावसापैकी सुमारे ९० टक्क्यांहून अधिक पाऊस मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पडला आहे. रविवारी सकाळपासून पूर्वेकडून पश्चिम घाटाकडे आणि पश्चिम घाटाकडून पूर्वेकडे अशा दोन्ही दिशेने ढग सरकत होते. दुपारपर्यंत ढगांची गर्दी वाढली. ढगांच्या प्रमाणात वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वेगाने वाढ झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास घाटाच्या बाजूने पावसाला सुरवात झाली. यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाच्या सरी सरकत गेल्या व सर्वदूर संततधार पाऊस झाला.
Tuesday, October 13, 2015 AT 06:00 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: