Chana Rate News : सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

तुरीचे दर टिकून राहण्याची शक्यता

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं दर वाढले आहेत. त्यातच आयातही कमी होतेय. आयात मालाचेही दर तेजीत आहेत. त्यामुळं तुरीच्या दराला आधार मिळतोय. देशात चालू खरिपातील तूर लागवड जवळपास ७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात ४४ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. तर तुरीला सध्या प्रतिक्विंटल ६ हजार ४०० ते ८ हजार रुपये दर मिळतोय. तर आयात मालाचेही दर ७ हजार २०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही तुरीचा पुरवठा जास्त वाढेल, असं वाटत नाही. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

Chana Rate
Tur : तूरडाळीचा साई गावराणी ब्रॅण्ड

उत्पादन घटूनही पेरुचे दर दबावात

राज्यात पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या बाजारात पेरूची आवक सुरु आहे. सध्याची आवक कमी असली तरी पेरुचा दर दबावात आहे. बदलत्या वातावरणामुळं पेरूला कमी उठाव असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. उठाव कमी असल्यानं राज्यातील बाजारांमध्ये नगण्य आवक असूनही शेतकऱ्यांना दर मिळत नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक बाजार समित्या सोडल्या तर आवक खूपच होतेय. सध्या राज्यातील बाजारात पेरूला प्रतिक्विंटल २ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात पेरूला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पेरुचे दरही सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Chana Rate
Urad : यंदा उडीद भाव खाण्याची शक्यता

उडदाला यंदा चांगला दर मिळण्याचा अंदाज

देशातील काही बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक सुरु झाली. मात्र चालू खरिपात उडदाची लागवड जवळपास ५ टक्क्यांनी घटली. २६ ऑगस्टपर्यंत देशात ३६ लाख हेक्टरवर उडदाचा पेरा झाला होता. तर पाऊस आणि कीड-रोगांचाही उडीद पिकाला फटका बसतोय. त्यामुळं यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. परिणामी उडादाला चांगला दर मिळतोय. जुन्या उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर नव्या मालात ओलावा अधिक येतोय. त्यामुळं नव्या मालाला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांचा दर मिळतोय. यंदा उडदाला चांगले दर मिळतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Chana Rate
Maize : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कमी आवकेमुळं वांग्याचे दर टिकून

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं वांगी पिकाचं मोठं नुकसान केलं. त्यामुळं बाजारात वांगी आवक खुपच कमी आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमध्ये दैनंदिन आवक २०० क्विंटलच्या आतच होतेय. तर इतर बाजार समित्यांतील आवक ही ५० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं वांग्याचे दर बरे आहेत. सध्या वांग्याला २ हजार ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पिकाचं नुकसान झाल्यानं पुढील काळात लगेच आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं वांग्याचे दर टिकून राहतील, अशा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

देशात चालू वर्षात हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन (Record Chana Production) झालं. सरकारने एकूण उत्पादनापैकी जवळपास १७ टक्के हरभरा खरेदी (Chana Procurement) केला. सरकारची खरेदी सुरु होती तोपर्यंत बाजारात हरभरा दरही (Chana Market Rate) प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी ५२३० रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जवळपास २३० रुपयांनी कमी दर मिळाला. मात्र सरकारची खरेदी बंद झाली आणि बाजारात घसरण होत गेली. नाफेडकडे हरभऱ्याचा जवळपास ३२ लाख टनांच्या दरम्यान साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने हा साठा बाजारात विकण्यास सुरुवातही केली. त्यामुळं पुढील काळात हरभरा दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा कमीच आहे. त्यामुळं हरभरा दर नरमले.

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर सरासरी दर हा ४ हजार ५०० रुपयांचा आहे. म्हणजेच सरासरी भाव हमीभावापेक्षा ७३० रुपयांनी कमी आहे. दर कमी असल्यानं बाजारातील आवकही कमीच आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बाजारांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या हरभऱ्याची आवक नगण्य असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सणांच्या काळात चांगल्या गुणवत्तेच्या हरभऱ्याचा तुटवडा जाणवू शकतो. तसंच मागणीही वाढेल. त्यामुळं हरभरा दराला काहीसा आधार मिळू शकतो. सणासुदीत हरभऱ्याचा भाव क्विंटलमागं १०० ते १५० रुपयांनी सुधारु शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com